‘ऊब’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका रूबिना चव्हाण यांनी प्रहार आयोजित ‘गजाली’ कार्यक्रमात प्रहार टीमसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. ‘दै प्रहार’चे सहसंपादक महेश पांचाळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या आपल्या उपक्रमाची भूमिका विषद केली. त्यांच्या ‘गाेधडी’च्या टाक्यांमुळे काेराेनाच्या कठीण काळातही महिलांच्या हाताला काम मिळाले अन् ते कठीण दिवस सरले…!
स्वावलंबनाची ‘ऊब’
तेजस वाघमारे
अपना सहकारी बँकेत नोकरी करत असताना २०१८ मध्ये माझी कोकणमधील संगमेश्वर तालुक्यातील छोटे गाव असलेल्या देवरूख येथे बदली झाली. ती कोकणातील पहिली ब्रँच होती. मला कोकणात जाऊन काम करण्याची इच्छा होती. कोणते काम करायचे हे अस्पष्ट होते. बँकेत नोकरी करत असताना घरा-घरात जाऊन संपर्क वाढविणे आणि बँक खाती निर्माण करण्याचे लक्ष्य होते. हळूहळू बँक मोठी झाली, नाव मोठे झाले. २०१९ च्या डिसेंबरमध्ये मी सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर मार्चमध्ये कोरोना सुरू झाला. मला गावातच काही तरी करावे, अशी इच्छा होती. पण काय करावे हे निश्चित नव्हते. त्याबद्दलची स्पष्टता नव्हती. एकदा पुण्याला मी आणि माझी बहीण आम्ही गोधडीच्या दुकानात गेलो. मग असे लक्षात आले की, महिलांना हे काम घरोघरी देता येईल. माझे माहेर मिरझोइ हे हमीद दलवाई यांचे गाव. ते माझे वडील. त्या गावात माझ्या सर्व आत्यांनी बारीक टाक्याच्या गोधड्या शिवून संसार चालवले आहेत.
कोरोना काळात सर्व काही ठप्प होते. तेव्हा महिलांच्या हाताला काम पाहिजे हे लक्षात आले. देशभरातील रोजगार ठप्प होते. कोरोना काळात मी तिथे रोजगार केंद्र सुरू केले. तिथे मशीन वर्कचा एक वर्ग होता, त्यामध्ये २०-२५ महिला काम करत होत्या. त्यामध्ये सुती पायपुसणी शिवण्यास सुरुवात केली. तिथे अनेक महिला जुन्या कपड्यापासून पायपुसणी शिवण्याचे काम करत होत्या. तिथेच वयोवृद्ध महिलांचा एक गट असा निर्माण झाला की, आम्हाला काम द्या, अशी मागणी त्यांच्याकडून झाली. मग मी विचारले तुम्हाला काय येते, तर त्या म्हणाल्या. आम्ही गोधडी शिवतो. मग त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यात गोधडीचे दुकान असलेल्या व्यक्तीला बोलवले. या सर्व प्रक्रियेला सप्टेंबर २०२० उजाडला. प्रशिक्षणानंतर आमचे गोधडीचे केंद्र सुरू झाले. या दरम्यान अनेकांनी हेटाळणी केली, आता कोण गोधडी वापरतो, असे टोमणे मारले. पण एका व्यक्तीने आम्हाला त्याची इमारत मोफत वापरण्यास दिली. येथे ४०-५० महिला गोधडी शिवण्यास येऊ लागल्या. यातूनच गोधडी शिवण्याचा बाज ठरला. विविध भागांतील गोधडी शिवण्याचा बाज वेगळा आहे. गोधडीसाठी जुने कपडे न वापरता नवीन कपडे वापरण्याचे ठरले.
गोधडीसाठी आतील, बाहेरील नवीन कपडा, त्याची सुसंगती आणि त्याचे डिझाइन यावर भर दिला. जुने कपडे वापरण्याऐवजी नवीन कपडे असले पाहिजेत हा आग्रह ठेवून सेंटर सुरू केले. आता या केंद्रात १० ते १५ महिला फक्त गोधड्या शिवतात. घरगुती शेतीमध्ये काम करणाऱ्या या महिला आहेत. केंद्रासाठी जुन्या शिलाई मशीन घेतल्या आहेत. सकाळी शेतात जाऊन पालापाचोळा उचलून या महिला पुन्हा गोधडी शिवण्यासाठी केंद्रात येतात. एक्झिबिशनच्या माध्यमातून मी या गोधड्या विविध शहरांमध्ये विकत आहे. आज याला चार वर्षे झाली आहेत. जेव्हा गोधडी केंद्र सुरू केले तेव्हा मी महिलांना एकच सांगितले होते की, मी तुम्हाला अर्धा किलो भाजी आणि अर्धा लिटर दूध याचे पैसे देऊ शकते. हे माझ्या सेवानिवृत्तीच्या पैशांमधून होत होते. मी सेवानिवृत्तीतून मिळणारा पैसा त्यामध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आईचे एकच म्हणणे होते की, सोशल वर्क स्वतःच्या पगारातून, स्वतःच्या पैशातून सुरू करून मोठे व्हा. महिलांना त्यांच्या कलेतून पैसे मिळणार आहेत. उद्या माझे गोधडी केंद्र बंद केले, तर महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, हा माझा हेतू आहे.
नवी कोरी ‘ऊबदार’ गोधडी
सीमा पवार
कोकणात जाऊन उद्योग सुरू करायचा मनाशी पक्क केलं आणि देवरुखमध्ये गोधडीचा व्यवसाय सुरू केला. पण इतरांच्या स्पर्धेत उतरायचं नाही. माझं प्रॉडक्ट हे इतरांपेक्षा किती चांगलं आहे हे मला कोणालाही सांगण्याची गरज नाही. कारण ते पाहताचक्षणी समोरच्याला कळेल. आपल्या या छोट्याशा व्यवसायाबद्दल सांगताना रूबिना यांच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता. आपली गोधडी ही नव्या कपड्याची, नव्या डिझाईनची, नव्या युगाच्या तोलामोलाची कशी असेल यावर त्यांनी अधिक भर दिला. अभ्यास, प्रशिक्षण आणि अनुभव होता, त्यामुळे ही गोधडी अनुभवातून मिळालेली असल्याने याची ऊबही तितकीच मायेची आहे यात शंकाच नाही. प्रहारच्या गझाली या कार्यक्रमात आपल्या गोधडीच्या व्यवसायाविषयी रूबिना बोलत होत्या.
निवृत्तीनंतर गावातील महिलांसाठी त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय. पण गोधडी हा व्यवसाय असू शकतो का, असे अनेकांनी प्रश्न विचारले. पण त्यातूनही मदतीचे हात पुढे आले. त्यानंतर गोधडीचं पॅटर्न ठरलं. ४० महिलांना हाताशी घेत व्यवसाय सुरू केला. कोरोनाकाळात व्यवसाय सुरू केल्यामुळे घरातून दिलेल्या चादरी, साड्या यांची मिळून होणारी गोधडी मला शिवायचीच नाही असं ठरलं. गोधडीचा संपूर्ण आतला, बाहेरचा कपडा नवा, त्याची सुसंगती, त्याचं कॉम्बिनेशन आणि त्याची डिझाइन याच्यावर विशेष भर दिला आणि ठरवलं अशाच प्रकारची आपली गोधडी असेल.
रूबिना यांना गोधडीची किंमत ऐकून ग्राहक ती घेणार की नाही याची त्यांना फिकीर नाही. कारण ज्याला त्याचं महत्त्व कळेल तोच ती घेईल, इतका विश्वास त्यांना आहे. त्यामुळे जेव्हा एखादा ग्राहक ती गोधडी परदेशातही आपल्या नातेवाइकाला गिफ्ट देतो. त्यावेळी त्यांचा हा विश्वास नक्कीच सार्थकी ठरतो. पण हे देखील तितकच खरं की, परदेशात माझं प्रॉडक्ट जातं म्हणून त्या अजिबात हुरळून जात नाहीत. कारण त्यांच्या मते त्यांच्या देशात त्यांना मिळालेला ग्राहकही त्यांच्यासाठी तितकाच महत्त्वाचा वाटतो. त्या म्हणतात, अनेकदा माझं प्रॉडक्ट विकलं जाणार नाही, असं सांगितलं गेलं. पण माझी गोधडी ही ‘ऊब’ देणारीच आहे आणि महिलांच्या खिशालाही ती ‘ऊब’ देणारीच असेल. त्यामुळे माझ्या प्रोडक्टचं नावही ‘ऊब’ आहे.
अनेकदा विक्री होत नाही. पण त्याचं दुःख नाही. आज नाही तर उद्या नक्की मिळेल. हा त्यांचा विश्वास आहे. कारण ही कला आहे. जशी ती बनवण्याची आहे तशी ती विकण्याचीही. काही वर्षांनी मी जर माझं सेंटर बंद केलं, तरी या महिला स्वतःचा रोजगार उभा करू शकतील इतकी आपली तयारी असल्याचं त्या ठामपणे सांगतात. प्रदर्शनात माझा माल खपणं हे माझं यश आहे असं मी मानत नाही, तर या माध्यमातून मी तिथे येणाऱ्या कितीजणांपर्यंत पोहोचले हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे जिथे एक्झिबिशन लागायलाच हवे असे मला वाटते अशा ठिकाणी ते लागण्यासाठी माझी धडपड असते. कारण मला बाजारात उतरायचं असेल तर तिथे मी योग्य आहे की नाही हे मला पडताळून पाहायचं आहे. कोणत्याही प्रकारची घासाघीस न करता तिथे माझं प्रॉडक्ट विकलं जात तेव्हा वेगळंच समाधान मिळतं.
रोजगाराच्या नव्या ‘पायघड्या’
वैष्णवी भोगले
घराच्या प्रवेश द्वाराजवळ पायपुसणे ठेवलेले असते. घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते. या पायपुसण्यांमुळे घरात केवळ धुळीला, घाणीला प्रतिबंध होतो असे नाही, तर मनात एक सकारात्मकता तयार होते. तर बाथरूमच्या बाहेरही ओले पायपुसण्यासाठी पायपुसण्याचा वापर केला जातो. ते जर आकर्षक रंगसंगतीत असेल, सुती असेल, तर ओल्या पायांचे पाणी चांगले टिपले जाते आणि पाय घसरण्याची शक्यताही नसते. अशी आकर्षक पायपुसणी ‘ऊब’ केंद्रात तयार केली जातात. त्यांच्यावर आकर्षक अशी शिलाई मशीनने डिझाईन तयार केली जाते. या पायपुसण्यांच्या माध्यमांतून महिलांसाठी नव्या रोजगाराच्या पायघड्या घालण्यात रूबिना चव्हाण यशस्वी झाल्या आहेत असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
या सुती पायपुसण्यांची किंमत १०० रुपयांपासून आहे. ही पायपुसणी मात्र जुन्या कापडांपासून शिवली जातात. ‘ऊब’ केंद्रात गोधडी, दुपटी, प्रवासी पिशव्या मागणीनुसार शिवल्या जातात. एका गोधडीची किंमत २५०० रु. पासून पुढे ३०००, ४००० अशी क्वालिटीनुसार ठरविली जाते. गोधडी ७.५ , ८.६, ९.६ या साईजमध्ये शिवली जाते. ७.५ साईजच्या गोधड्यांना बाजारात खप आहे. गोधडी शिवण्यासाठी मांजरपाट हा सुती कपडा वापरला जातो. उन्हाळा असला की, गोधडीचा लेअर कमी केला जातो, तर थंडीच्या दिवसांत लेअर वाढविला जातो. मुंबईत जास्त घरांमध्ये एसी असल्यामुळे गोधडी ५ ते ६ लेअरची असते. दिवाळीच्या आधी गोधडी, पायपुसणी, पिशव्या यांचे ५०-५० चे गट तयार ठेवले जातात. दिवाळीत विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनामध्ये गावातील प्रशिक्षण घेतलेल्या महिला स्टॅालवर पुढाकार घेऊन गोधड्या विकल्या जातात. मुंबई, पुणे, रत्नागिरी प्रदर्शनामध्ये जास्त गोधड्यांची विक्री होते. संगमेश्वर, देवरूख, रत्नागिरीमध्ये गोधडीची ‘ऊब’ हे नाव लौकिक आहे. मला देणगी नको, या प्रोडक्ट बघा, आवडल्यास विकत घ्या. माझं प्रोडक्ट विकलं गेलं तर महिलांचा पगार होईल. माझ्या प्रोडक्टचा लोगो ऊब आहे आणि नेहमीच गोधडीच्या मार्फत लोकांना ऊबच मिळणार असे रूबिना चव्हाण सांगतात.
आई किंवा आजीच्या साडीची प्रेमाने शिवलेली ‘गोधडी’ ही सर्वसाधारण गोधडी नसते, तर अशा गोधडीतून मिळणारी ‘ऊब’ ही ‘मायेची ऊब’ असते. पण या नवीन कापडातून तयार केलेल्या देवरुखच्या गोधाडीचा बाज वेगळा आहे. तर संगमेश्वरचा बाज वेगळा आहे. संगमेश्वरचा गोधडीचा टाका मोठा तर मिरझोईचा टाका हा लहान असतो. त्यामुळे गोधडीचा पारंपरिक बाज कायम ठेवत रूबिना चव्हाण यांनी पॅटर्नमध्ये आधुनिकता आणली. गोधडी शिवणे हा कलेचा प्रकार आहे. त्यामुळे गोधडी सर्वांच्याच घरी उपजत असल्याने तसेच अनेकजण जुने कपडे वापरत नसल्याने गोधडीचा पॅटर्न लोकांच्या पसंतीस उतरला. रॉमटेरियल निवड, त्यातील रंगसंगती, टाक्यांचे प्रकार, पॅचवर्क पद्धती, लेअर ऑर्डर म्हणजे अस्तरीकरण, जुन्या फॅब्रिकची योग्य निवड, चिंध्या, कापडाचे तुकडे किंवा थोडासा आऊटडेटेड झालेला माल याकडे बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक तेथे कॉस्टकटिंगचा विचार करून पण गुणवत्तापूर्ण क्वीलटिंग स्किल्स आत्मसात करून गोधडी उद्योगात सुयोग्य व्यवस्थापन व विपणन कौशल्याने स्वतःची वेगळी ओळख रूबिना चव्हाण यांनी गोधडी व्यवसायातून निर्माण केली आहे.