माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमच राहते


  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


जगात दोन प्रकारचे रोग माणसाला सतावीत असतात. एक रोग असा की, त्याने भूकच लागत नाही. कितीही औषधपाणी करा, काही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वानाचे जेवण तयार असूनही काय फायदा? तो म्हणतो, “खायला खूप आहे, परंतु मला भूकच नाही, त्याला काय करू?”



दुसरा रोग असा की, कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पुरी होत नाही. काहीही खा, त्याचे भस्म होते. तद्वत् आपले आहे. मात्र, आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हाट भरला आहे, भजन-पूजन चालू आहे; परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही. त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. उलटपक्षी, भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिले. बायको, मुले, नोकरी-धंदा, घरदार इ. कितीतरी गोष्टी, की ज्यांपासून सुख मिळेल असे आपल्याला वाटते, त्या गोष्टी पुरविल्या; पण अजून आपली हाव या सर्वांना पुरून, या सर्वांचे भस्म करून, कायमच आहे आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस चालणार?



आपण नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही, हे खरे. पण याचे कारण, वाईट वागलो तर आपल्याला लोक नावे ठेवतील ही भीती ! असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा काय कामाची? मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची ! उलट आजची स्थिती पाहावी तर ‘सुधारणा’ जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे.



परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असे नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही.



आपण दरवर्षी वारी करतो आणि जन्मभर वारी करीतच राहणार; परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. खरोखर, मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरेल. परमार्थ ‘समजून’ जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजाअर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल, पण सवयीने ते तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. ‘मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे’, असे वाटणे जरूर आहे.



तात्पर्य : ज्याची हाव, म्हणजे वासना, पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो. या कारणाने त्याला समाधान मिळत नाही.


Comments
Add Comment

जीवनप्रवास सुखाचा

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै आपण प्रबोधनाचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे संचित ते नशीब. या विषयाशी संबंधित

कपटफुलांच्या रानगंधात

ऋतुराज-ऋतुजा केळकर एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक...” दुरून येणारे आशा दीदींचे

धार्मिक जीवन

आत्मज्ञान -प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या गुंतागुंतीत ‘धार्मिक जीवन’ ही संकल्पना अत्यंत प्राचीन, परंतु

काश्मिरी स्त्रीसंत लल्लेश्वरी

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी एका काश्मिरी पंडिताच्या पोटी, श्रीनगरजवळील सिमपूर येथे इ. स. १३२० मध्ये

प्रारब्ध ते पाप- पुण्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै मी या आधी श्रीमंत माणसाचे उदाहरण दिले. आता दुसरे उदाहरण घेऊ, ‘सत्ता’.

दवबिंदूतून झिरपणारा प्रकाश

ऋतुराज-ऋतुजा केळकर काळच्या दवबिंदूतून झिरपणारा सूर्यकिरण जसा पाण्याच्या थेंबात चमकतो, तसा आत्मा हा