लेखक : रमेश लांजेवार (माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
जगातील चिमण्यांची घटती संख्या लक्षात घेता जगातील देशांनी चिमण्यांना वाचविण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्याचे जाहीर केले. याकरिता २० मार्च ही तारीख ठरविण्यात आली आणि राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने पहिला जागतिक चिमणी दिवस २० मार्च २०१० ला साजरा करण्यात आला.
भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, माणसाच्या जवळपास वावरणारा व नेहमी डोळ्यांनी दिसणारा पक्षी म्हणून चिमणीची भारतभर चांगलीच ओळख आहे. जागतिक चिमणी दिवस साजरा करताना चिमण्यांना व संपूर्ण पशुपक्ष्यांना कशा पद्धतीने वाचविता येईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. चिमण्यांना राहण्याकरिता घरटे नाहीत याकरिता वृक्षारोपण व्हायला हवे, उन्हाळ्यात चिमण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, त्यामुळे आतापासूनच जिथे-जिथे चिमण्या येऊ शकतात तिथे-तिथे, आपल्या घराच्या भिंतीवर किंवा घरावर एखाद्या तबकड्यात पाणी अवश्य ठेवावे. सोबतच खाण्याकरिता थोडे तांदळाचे दाणे किंवा खाद्य टाकावे, कारण चिमण्यांना खरोखरच आपली नितांत गरज आहे. अन्यथा ज्या चिमण्या दिसतात त्या सुद्धा लुप्त होऊ शकतात, याला नाकारता येत नाही. कारण दिवसेंदिवस चिमण्यांचे प्रमाण कमी-कमी होताना दिसत आहे.
चिमण्यांचे आपल्या मानव जातीवर खूप मोठे उपकार आहेत, ते तर आपण फेडू शकत नाही; परंतु आज बदलत्या काळानुसार त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. त्यातून मुक्त करण्यासाठी थोडा हातभार आपण लावू शकतो, याकरिता पाण्याची सोय व खाद्यान्नाची सोय सर्वांनीच आपापल्या परीने केली पाहिजे. चिमण्यांच्या आनुषंगाने अनेक पक्षी पाण्याचा व खाद्यान्नाचा स्वाद अवश्य घेतील आणि आयुष्य वाढेल व चिमण्यांचा किलबिलाट सर्वत्र दिसून येईल. आज जगातील बदलत्या तापमानामुळे व हवामानामुळे, परमाणू परीक्षण, वाढते औद्योगिकीकरण, मोबाइलचे टॉवर, वाढते शहरीकरण, जंगलतोड, शेतातील रासायनिक खतांचा वापर व कीटकनाशके, वणवे लागणे, ध्वनी प्रदूषण, पाणथळ्यांच्या जागा नष्ट झाल्याने आणि जगातील युद्धजन्य परिस्थिती यामुळे चिमण्यांसह अन्य पशु-पक्ष्यांचे जगणे अत्यंत कठीण झाले असून, धोकादायक स्थितीत आहे. यामुळे अनेक पशु-पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आज जंगलतोडीमुळे जंगलातील पशु-पक्षी शहराकडे धाव घेतांना दिसतात. हा संपूर्ण प्रकार निसर्गाचा होत असलेल्या ऱ्हासामुळे दिसून येतो व मानवजातीच्या अतिक्रमणामुळे निर्माण झाला आहे.
पूर्वी कवलारू घर असायचे, मातीच्या भिंती असायच्या, त्यामुळे चिमण्या आपले घरटे कुठे तरी अवश्य बनवायचे. कारण कवलाचे घर व मातींच्या भिंती नेहमी थंड असतात, याचा सहारा घेऊन राहायचे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आपल्याला चिमण्यांचे घरटे अवश्य दिसायचे व चिमण्यांचा मधूर किलबिलाट ऐकू यायचा. यावरून सकाळचा काय वेळ झाला आणि संध्याकाळचा काय वेळ झाला हे त्यांच्या किलबिलाटावरून ताबडतोब सर्वांनाच लक्षात यायचे; परंतु आज चिमण्यांचा किलबिलाट नामशेष झाल्याचे दिसून येते.
आज चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही, पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते, अशी भयावह परिस्थिती चिमण्यांची झाली आहे. आज घरांचे सिमेंटीकरण झाल्याने चिमण्यांना घरटे बांधण्यास मोठा संघर्ष करावा लागतो आहे. वाढत्या प्रदूषणामुळे व उष्ण तापमानामुळे चिमण्या व इतर पशु-पक्ष्यांना हवेत मोकळा श्वास सुद्धा मिळू शकत नाही. अशी कठीण परिस्थिती पशु-पक्षांवर आल्याचे दिसून येते.
आपण चीनचा विचार केला तर १९५८ – १९६२ या कालावधीत चार कीटक मोहीम राबविण्यात आली, त्यात पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजे उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार नष्ट करायचे सरकारने ठरविले. यामुळे चीनमध्ये चिमण्या जवळपास संपुष्टात आल्याचे दिसून येते, त्यामुळे याचा गंभीर परिणाम चीनच्या पर्यावरणावर झाला आहे. यानंतर पक्षी तज्ज्ञांनी अभ्यासाच्या अंति सांगितले की, चिमणी पर्यावरणाच्या दृष्टीने जगाला आवश्यक आहे.
जगभरात २६ जातींच्या चिमण्यांची नोंद आहे, परंतु यातील अनेक चिमण्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगातील पक्षांचा विचार केला, तर ८६७ प्रजाती आहेत. परंतु गेल्या पंचवीस वर्षांत आतापर्यंत पक्षांच्या संख्येने सर्वात मोठी घट झाली आहे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. त्याचप्रमाणे कीटकभक्ष्यी चिमण्यांची संख्या कमी होणे हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. कारण चिमण्यांच्या घटती संख्यांचा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा आहे. कारण पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि कीटक चिमण्या खायच्या, परंतु चिमण्यांच्या घटत्या संख्येमुळे पिकांवर सुद्धा दुष्परिणाम होतांना दिसतो.
एकेकाळी चिमणी हा आपला अत्यंत महत्त्वाचा पक्षी होता, कारण लहान मुले जेवणाकरिता कंटाळा करायचे तेव्हा आपली आई किंवा आजी चिमणीची आठवण अवश्य करायची व लहान मुले पोटभर जेवण सुद्धा करायची. “चिव चिव ये, चारा खा, पाणी पी आणि भुर्र उडून जा”, तसेच चिमणीची गोष्ट चिऊताई चिऊताई दार उघड, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे…, असे म्हणत आपला घास भरत, यामुळे आपलं बालपण समृद्ध झाले. कारण आई व आजी इतर पक्षांची ओळख करून देतांना चिऊताईचा लाड जास्तच करायची. चिमण्यांनी आपल्याला बरेच काही दिले, त्यामुळे आज त्यांना आपल्याकडून फक्त पाण्याची अपेक्षा आहे, ती आपण अवश्य पूर्ण करूया.
जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून भारतासह जगातील संपूर्ण देशांनी आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा संकल्प करावा व वृक्षारोपण करावे. यामुळे गुरांना चारा, पशु-पक्ष्यांना राहण्यासाठी घरट्यांसाठी जागा उपलब्ध होईल, मानवाला शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल. यामुळे पर्यावरण सुधारण्यास मदत होईल व निसर्ग प्रफुल्लित राहील आणि जिकडे-तिकडे हिरवागार गालिचा पसरलेला दिसून येईल. आपण सर्वांनीच चिमण्या वाचविण्याचा संकल्प करूया.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…