Lavani : अप्सरा आली...


  • हलकं-फुलकं : राजश्री वटे


रंगमंचावरील मंद प्रकाशात शांततेला भेदत... एक घुंगरू बोलतं... मग दुसरं... मग तिसरं...
अन् पडते ढोलकीवर हलकीच थाप! पायांना बांधलेलंं जड घुंगरांचं ओझं संभाळत... छम... छम... छम...



लयदार ठेका सुरू होतो आणि एक ठुमका झोकात... पाठमोऱ्या सम्राज्ञीचा!!



हळूहळू सगळे घुंगरू ताल धरत बोलायला, डोलायला, हसायला लागतात. छम... छम... छम्माक... छम... तशी तशी ढोलकीवरची थापही ठेका देत वाढत जाते अन् सुरू होते घुंगरू व ढोलकीची जुगलबंदी!



कमरेची लयदार हालचाल... मोराच्या पिसाऱ्यासारखा फुललेला पदर डोक्यावरून कमरेवर घरंगळतो अलगद! केसांच्या बांधलेल्या बुचड्यावर गजऱ्याची सुंदर आरास हळुवार हसते... अन् ती वळते... देखणं रूप साकारतंं... त्या रूपाला सौंदर्याची जोड लाभते शृंगाराने... लावण्य खुलत जातं... वातावरणात जल्लोष... अप्सरा आली !!!



तो ऐटबाज नखरा... अहाहा... नखशिखांत नजर भिरभिरते... प्रथम लक्ष वेधते भाळावरील ठसठशीत कुंकवावर... पौर्णिमेच्या गोल लालसर चंद्रासारखं भासतं! तर कधी अमावस्येनंतर दिसणाऱ्या नाजूक चंद्राची कोरच जणू!! काजळाने डोळ्यांच्या रेखीवपणात भरच घातली असते, टपोऱ्या डोळ्यांवरील पापण्यांची तोरणं खालीवर झुलवत ठेवण्यासाठी!!



धनुष्याकृती ओठांवरची लाली... मादकतेची सूचक अनुभूतीच... हनुवटीवरील हिरवं गोंदण देखणेपणात भरच घालत होतं... डोळ्यांचं पारणंं फिटेल असं ते रूप!



‘या रावजी... तुम्ही बसा भावजी...’



हा सूर भानावर आणतो...ते हळुवार मधाळ आर्जव... मानेचा झटका व लाडीक मुरका... अहाहा !! हाताची बोटं हनुवटीपर्यंत नेऊन, थोडं झुकून मुजरा करत स्वागत करण्याची तऱ्हाच न्यारी! अप्रतिम!!
चेहऱ्याच्या हालचालींवर झुलणाऱ्या झुमक्यांचा डौल नजर खिळवून ठेवतो...चाफेकळी नाकातील नथीचा नखरा तोरा दाखवितो... आरसपानी गळ्याला मिठी मारत कमरेपर्यंत झेपावणाऱ्या दागिन्यांची नजाकत भारीच... कमरेच्या लयदार ठुमक्यावर लचकणारा कंबरपट्टा/मेखला खासच... काचोळीच्या दंडावर वाकीचा दिमाख... आगळाच! कळीदार नऊवारी कमनीय बांध्यावर चपखल बसलेली!! गालाशी लगट करू पाहणाऱ्या लडिवाळ बटा, तसेच... कमानदार उडत्या भुवयांचे इशारे... कलेजा खलास!!



अशी ही घुंगरांवर साम्राज्य करणारी सौंदर्यसम्राज्ञी चांदणं शिंपडत अवतरते! विनंतीवजा लाडीक मागणी...
‘एक हौस पुरवा महाराज...’ असे नाजूक हावभाव...
फेटे उडालेच बघा... शब्दांचे तीर सुटून काळजाचा ठाव घेतात, बाण उरी लागतो... गडी घायाळ! सवाल-जवाब होतात... कधी कुरघोडी... कधी हार-जीतही! हळूच विचारणाही होते...
‘कसं काय पाटील, बरं हाय का?’
अशा नटखट प्रश्नाने पाव्हणं दचकलंच म्हून समजा... झालं... गाडी पलटी...
घोडे फरार !! ढोलकीच्या तालावर... घुंगराच्या नादावर... शिट्यांचा गजर असतो... उत्साहाचा बहर असतो...
इष्काचा भर असतो... खट्याळपणाचा कहर असतो!!!



कधी डोळ्यांत आभाळ असतं... कधी मोकळे आकाश असतं... कुणी छळणारं असतं... कुणी तारणारं ही असतं !!! ‘आता वाजले की बारा...’ अशी घराची ओढ असते!



सुलोचना बाईंच्या भरदार करड्या आवाजापासून बेला शेंडेच्या गोड मधुर आवाजापर्यंतचा... गावंढळ भाषेतील लावण्यांचा हा प्रवास! पिंजरा ते नटरंग, चंद्रमुखी... कधी कथा असते तर... कधी व्यथा असते...



घुंगरावर जीव ओवाळून टाकणारं हे लावण्य... गातंसुद्धा! तरी... हे सौंदर्य मर्यादा राखून असतं...
‘हात नका लावू माझ्या साडीला......!’

Comments
Add Comment

चिंपांझींची मैत्रीण

विशेष : उमेश कुलकर्णी चिंपाझींवर संशोधन करणारी लोकविलक्षण संशोधक जेन गुडॉल यांनी नव्वदीत जगाचा निरोप घेतला.

ऋषितुल्य रामकृष्ण भांडारकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना

अल्बेनियातला रोबो मंत्री

डॉ. दीपक शिकारपूर अलीकडेच अल्बेनियाने जगातील पहिले एआय मंत्री डिएला यांची नियुक्ती केली. याबाबत जगभर चर्चा सुरू

कैलास गुंफा मंदिर शिल्पकलेचा अद्वितीय नमुना

विशेष : लता गुठे महाराष्ट्रामध्ये पुरातन काळापासून देव, धर्म, संस्कृती आणि परंपरेला विशेष स्थान आहे हे आपल्या

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे फक्त हिंदी चित्रपटांचे रिमेक इतर भारतीय भाषात होतात असे नाही. आपल्या मराठीतही

तुंबरू

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे नारायण! नारायण! करीत त्रिलोकांत भ्रमण करणाऱ्या देवर्षी नारदमुनींची