Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सMastermind : अभिनयातील कुरघोडींचा थरार : मास्टर माईंड

Mastermind : अभिनयातील कुरघोडींचा थरार : मास्टर माईंड

  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

अमेरिकन लेखक आणि अभ्यासक एरिक आर. विल्यम्सचा थरार कथांबाबतचा एक सिद्धांत फार प्रसिद्ध आहे. ते म्हणतात जीवनाला धोक्यात आणले की, निर्माण होतो तो थरार… ही एक मानवी मनाची रिअॅक्शन असून लेखन शैलीत परावर्तीत करताना छुप्या गृहितकांना प्राधान्य दिले जाते. कथानकात थरार निर्माण करायचा असेल तर कथानकातील महत्त्वाचे प्रासंगिक घटक लपविणे ही त्या थरारकाची गरज असते. त्यातून रहस्य निर्माण केले जाते व कथानकाचा परमोच्च उत्कंठा बिंदू साधला जातो. थराराचा आणि नऊ रसांपैकी (खरंतर आठ) अद्भुत, भयानक आणि बिभत्स रसांशी संबंध येतो, पैकी लेखन शैलीतील काल्पनिकता हा सर्व थरारक कथानकातील काॅमन एलिमेंट असतो आणि तो असावाच लागतो. मराठी साहित्यात थरार लेखनाचा अभाव आहे. अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मराठी लेखकांनी ही शैली हाताळली. याची महत्त्वाची दोन कारणे म्हणजे आपली जीवन पद्धती. आपल्या जीवनात परकीय विचारांच्या गुंतागुंतीचा दबाव नाही आणि भारतीय समाजिक जीवनाला धर्म, कर्म आणि अर्थामुळे प्राप्त झालेली शिस्त. ह्या दोन कारणांमुळे गुन्हेगारी वृत्तीच्या मानसिकतेचा अभाव भारतीय साहित्यात आढळून येतो. त्यामुळेच थरारपटाला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेलेल्या सादराकृती आपल्याकडे कमी आढळतात आणि हीच कमतरता त्या सादराकृतीस लोकप्रिय ठरवते. मुळात थरारक कथांची मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण मराठी नाट्यसृष्टीसाठी व्यस्त आहे. त्यामुळे साहजिकच ‘परफेक्ट मर्डर’, ‘२१७ पद्मिनी धाम’ आणि ‘आता मास्टर माईंड’ या नाटकांचे दिवस चांगले असतील. वेबसिरीजमध्ये अशा कथानकांचे उदंड पीक घेतले गेल्यामुळे त्या माध्यमावरील थरारजन्य प्रेक्षक उत्साह कमी झालेला आढळून येईल; मात्र मराठी नाटकांना याचा विचार करण्याची गरज नाही. अस्मय थिएटर्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘मास्टर माईंड’ हे नवे कोरे नाटक अशाच थरार पठडीतील असून खुर्चीला खिळवून ठेवणे म्हणजे नेमकं काय? याचा प्रत्यय आणि अनुभव हे नाटक पाहताना येतो.

काही वर्षांपूर्वी अब्बास मस्तानचा हिंदी चित्रपट ‘रेस’ (साल २००८) अशाच थरारपटापैकी एक होता. ज्याचे पटकथा तंत्र अत्यंत आधुनिक व अपारंपरिक होते. दर दहा मिनिटाला एक धक्का द्यायचाच असे ठरवून पटकथेचे फॅब्रिकेशन किरण कोट्रीयाल आणि शिराज अहमद यांनी पहिल्यांदा केले आणि नंतर त्याचे अनुकरण सर्रास होऊ लागले. थरारक कथानकातील धक्का तंत्र हे कथानकाचे अविभाज्य अंग म्हणून ट्रीट करायचे ठरविल्यास एका लेखन शैलीची ती परिभाषा होऊन जाते, याचा अभ्यास सुरेश जयराम या ज्येष्ठ लेखकाकडे नक्कीच जास्त आहे.

मूळ लेखक जरी प्रकाश बोर्डवेकर असले तरी सुरेश जयराम यांनी तयार केलेली रंगावृत्ती इतकी गतीमान आहे की प्रेक्षकांना एका धक्क्यातून सावरण्याअगोदरच दुसरा धक्का द्यायचा किंवा विचार करायला वेळच द्यायचा नाही की, ज्यामुळे कथानकाबाबत असंख्य प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे ‘मास्टर माईंड’ बघताना कथानकातील पकड पहिल्या वाक्यापासून आहे. एका ठरावीक इंटर्व्हल्सने बसणारे धक्के ही जरी गतीमान नाट्याची परिभाषा असली तरीही प्रत्येक धक्क्याचे निरसन करूनच पुढील धक्का हे तंत्र आधुनिक लेखनशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर हे दोन तगडे कलाकार या ‘मास्टर माईंड’संहितेत आपले अभिनय कसब दाखवतात. दोन कलावंतानी पूर्ण नाटकाचा डोलारा सांभाळणे हे मुळातच अत्यंत जिकिरीचे काम आहे. नाटकाची रचनाच मुळी अशी आहे की दोघेही पूर्ण नाटकभर फ्रंटफुटवरच बॅटींग करतात. म्हणजे काही प्रसंगात आस्तादने तर काही प्रसंगात अदितीने, एकमेकांवर केलेल्या अभिनय कुरघोडी इतक्या लाजबाब आहेत की, नव्या पिढीसाठी तो अभिनयाचा वस्तुपाठ ठरावा. अदितीच्या करीअरमधले महत्त्वाचे अभिनय पाहिलेल्या प्रेक्षकांपैकी मी आहे. रूइयाची ‘मंजुळा’ असो वा प्रपोजल किंवा विक्रम भागवत लिखित, सहकलाकार चिन्मय मांडलेकर आणि विनय आपटे दिग्दर्शित, एक न गाजलेलं नाटक (नाव विसरलोय, आठवत नाहिये) असो, अदिती आपल्या अभिनयाच्या व्हेरिएशन्सनी चर्चेत राहिली. तीच गत आस्तादची. फुटकळ गोष्टींचे सोने कसे करायचे हे अनुभवायचे असेल तर आस्तादच्या काही मोजक्याच पण लक्षात राहणाऱ्या भूमिकांची नोंद घ्यावीच लागते. या नाटकातही क्लायमॅक्समध्ये जेव्हा रश्मी (अदिती) सारा डाव आपल्या हाती घेते तेव्हा काहीच शिल्लक नसलेला ऋषभ (आस्ताद) केवळ देहबोलीतून अभिनय वस्तुपाठ देत राहतो.

दोन स्पेशल या नाटकानंतर अभिनय जुगलबंदीचे नाटक म्हणून याचे वर्णन करता येईल. पहिल्या अंकात नवऱ्याने तिच्या मुलीवर केलेल्या अत्याचाराबाबत बोलताना रश्मी तोंडात शिवी येऊनही ती उच्चारत नाही, मात्र दुसऱ्या अंकात दोघांच्याही तोंडी असलेल्या शिव्यांची भडीमार अभिव्यक्ती (एक्सप्रेशन या अर्थी) व्यक्त करण्याचे साधन आहे, जे जबरदस्त परिणामकारक ठरते. नको त्या मजकुरावर आक्षेप घेणाऱ्या मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे याबाबत कौतुक करावे लागेल.
गेली अनेक वर्षे अश्लील, अश्लाघ्य आणि अपारंपरिक मराठी साहित्यावर होणाऱ्या भाषिक कुरघोडींपासून मराठी भाषा वाचविण्याचे महत्कार्य या मंडळातील सदस्यांमार्फत केले जाते. या नाटकातील दुसऱ्या अंकातील काही वाक्यांवर अथवा शब्दांवर नक्कीच आक्षेप घेतले गेले असते; परंतु ते तसे न करता ही संहिता ‘कुठलाही भाग न वगळता मंजूर’ केल्याबद्दल मंडळातील सदस्यांच्या विचारसरणीत अामूलाग्र बदल घडून आल्याचा प्रत्यय ‘मास्टर माईंड’ देत राहाते.

नाटकाचे संगीत अशोक पत्कींचे आहे. साधारण ऋषभची व्यक्तिरेखा पाहता आस्तादच्या तोंडी एखादे गाणे असावे अशी पुसटशी शंका येऊन जाते, मात्र दिग्दर्शकी विचारान्वये ते नाटकास स्पीडब्रेकर ठरले असते का? ज्यामुळे प्रेक्षक रिलॅक्स झाला असता व कथासूत्राची पकड ढिली झाली असती? अशा प्रश्नांवर अशोक पत्की या संगीतकाराने रचलेल्या उर्वरित पार्श्वसंगीत ‘ठीक आहे’ या कॅटेगरीत मोडणारे आहे. ढॅण्ण… झाल्यावर शीतल तळपदे यांनी योजलेली प्रकाशयोजना मात्र परिणामकारक ठरते. नाटकाच्या तांत्रिकबाबींमध्ये मुरलेल्या रंगकर्मींना ही प्रकाशयोजना कदाचित हास्यास्पद वाटू शकते, परंतु परिणाम साधून झाल्यावर अलगद त्या पारलाईट्सना प्रेक्षकांच्या नकळत कमी करून नाटकाच्या मूळ मूडवर आणून ठेवण्याचे तळपदे यांचे कसब वाखाणण्याजोगे हे मान्य करावेच लागेल. प्रदीप मुळ्येंचे नेपथ्य जरी गुढता निर्माण करणारे असले तरी मढ आयलंडच्या पडीक बंगल्याचे संदर्भ असल्याने, सहमत होणे थोडे कठीण जाते. मढ आयलंडचा एखादा बंगला अमुकच एका पद्धतीने बांधला गेला जावा असे काही बंधनकारक नाही, परंतु प्रवेशद्वारानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला उभारलेल्या आर्चेस अकारण आणि फॅब्रिकेटेड वाटतात. केवळ नेत्रसुखद फाॅर्म त्यातून मिळतो एवढेच काय ते प्रयोजन. परंतु तांत्रिक बाजूंवर विचार न करता केवळ आणि केवळ दोन घटका थरार अनुभवण्यासाठी निर्माता अजय विचारेंचे ‘मास्टर माईंड’ मराठी प्रेक्षक नक्कीच लक्षात ठेवतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -