
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या नव्या राजकीय उलथापालथी?
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीत (MNS and Mahayuti) सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, यावर दोन्ही बाजूंनी ठोस स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. दोन्ही बाजूंकडील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सातत्याने होणाऱ्या बैठकांमुळे मनसे महायुतीला साथ देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील १ जागा महायुती मनसेला सोडणार आहे. याबाबत लवकरच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे.
मुंबईतल्या ६ जागांपैकी ५ जागांवर भाजपा तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार लढणार आहे. मात्र भाजपा आपल्या कोट्यातील १ जागा मनसेला सोडणार असल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई ज्याठिकाणी सध्या अरविंद सावंत (Arvind Sawant) हे ठाकरे गटाचे खासदार आहेत, ती जागा भाजपा मनसेला सोडण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई याठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठीबहुल भाग आहे. याठिकाणी मनसेचे वजनही तितकेच जास्त आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) हे लोकसभा मतदारसंघनिहाय दौरा करत शाखांना भेटी देत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. त्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तुम्ही लोकांपर्यंत पोहचा, संपर्क वाढवा, लोकसभा निवडणुकीबाबत येत्या ३-४ दिवसांत मी भूमिका स्पष्ट करतो असे सांगितले होते. त्यानंतर आता ही बातमी समोर येत आहे.
मनसे आणि आमच्या विचारधारेत काही फरक नाही
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांचं नाव भाजपाकडून चर्चेत होते. नार्वेकरांनी मतदारसंघात गाठीभेटीलाही सुरुवात केली होती. परंतु पहिल्या यादीत भाजपाने दक्षिण मुंबईतील जागेबाबत उमेदवारी घोषित केली नाही. मनसेला सोबत घेण्याबाबत भाजपा नेत्यांकडून सूचक विधाने काही दिवसांपासून येत होती. मनसे आणि आमच्या विचारधारेत काही फरक नाही. मनसेची प्रादेशिक अस्मिता आम्हालाही मान्य आहे. त्याचसोबत मनसेने घेतलेल्या व्यापक हिंदुत्वाच्या भूमिकेचेही भाजपाने कौतुक केले होते. त्यामुळे आगामी काळात मनसे भाजपासोबत महायुतीत जाणार का हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
राज ठाकरेंना 'तो' निर्णय अमान्य!
लोकसभेची निवडणूक मनसेने महायुतीसोबत लढवली नाही तर राज्यसभेचाही पर्याय मनसेला उपलब्ध करुन दिल्याचं समोर आलं आहे. मात्र, मनसेने महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे इंजिन नव्हे तर कमळ अथवा धनुष्यबाण या चिन्हावर मनसेला निवडणूक लढवावी लागेल. हा प्रस्ताव राज ठाकरेंना मान्य नाही. याबाबतच्या चर्चेसाठी राज ठाकरेंनी आपले सर्व दौरे रद्द केले आहेत. त्यामुळे भविष्यात काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.