Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीकेंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या...

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या साकीनाका इथे बहुउद्देशीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्राची पायाभरणी

मुंबई : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मुंबईत साकीनाका इथे बहुउद्देशीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्राचा पायाभरणी समारंभ आज झाला. पुण्याच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास आणि सुविधा कार्यालय शाखेचे उद्घाटनही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सचिव एस सी एल दास, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीतकुमार, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उप महासंचालक अनुजा बापट, मुख्य स्थापत्य विशारद डी व्ही रामन राव या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जागतिक अर्थव्यवस्थेत 2030 पर्यंत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाबरोबरच उद्योजकांनी देखील प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले. मुंबई जागतिक दर्जाचे शहर आहे. मुंबई पर्यटनासाठी ओळखली जात असली तरी देशात उद्योगधंद्यांची प्रगती मुंबईमुळेच झाली आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी काढले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, अशा या मुंबईमध्ये हे केंद्र उभरे जात असल्याने त्या दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर बनले पाहिजे, त्या दर्जाची वास्तू उभारली गेली पाहिजे असे ते म्हणाले. एम एस एम ई च्या माध्यमातून मुंबईची उलाढाल हजारो कोटींपर्यंत पोहोचली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सर्वच क्षेत्रात मोठमोठे उद्योजक होणे गरजेचे आहे. मेहनतीला बुद्धिमत्तेची जोड दिल्यास सर्व काही शक्य आहे. प्रत्येक व्यवसायात स्पर्धेत उतरणे आवश्यक आहे. प्रवासात खर्च होणारा वेळ वाचवा, त्यामुळे नफ्यात वाढ होईल असेही राणे यांनी सांगितले. जगात नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे. उद्योजक आणि रोजगार देखील वाढणार आहेत. त्यासोबतच जीडीपी वाढावा, निर्यात वाढावी यासाठी एम एस एम ई ने आणखी प्रयत्न वाढवावेत असे ते म्हणाले. 2047 मध्ये आत्मनिर्भर भारत, विकसित भारताच्या उभारणीत एम एस एम ई चा सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि, त्यासाठी संबंधित सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर कार्याचा सल्ला देखील यावेळी राणे यांनी दिला. नुकतीच सिंधुदुर्गात भेट दिली असता लेमन ग्रास, बांबूवर आधारित उत्पादनांची निर्यात करणाऱ्या उद्योजकांची आपण प्रशंसा केल्याची माहिती त्यांनी दिली. एम एस एम ई च्या उद्योग, विकास आणि सुविधा कार्यालयाच्या माध्यमातून पुण्यात नवीन रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षाही राणे यांनी आपल्या संबोधनात व्यक्त केली.

पी एम विश्वकर्मा कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उत्पादित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शनही इथे आयोजित केले होते. पीएम विश्वकर्मा, खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि कॉयर मंडळाचे सुमारे 103 स्टॉल याठिकाणी मांडण्यात आले असून याप्रदर्शनात दीडशे छोटे-मोठे उद्योजक सहभागी झाले आहेत. नवउद्योजक, महिला उद्योजक तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उद्योजकांसाठी काही स्टॉल राखीव ठेवले आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हबच्या लाभार्थ्यांचाही यावेळी राणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17.09.2023 रोजी पी एम विश्वकर्मा योजनेची सुरुवात झाली होती. सुमारे 18 विविध प्रकारच्या कारागीर आणि हस्तव्यावसायिकांना संपूर्णपणे सहाय्य करण्याच्या हेतूने या योजनेला सुरुवात करण्यात आली असून दिनांक 07.03.2024 पर्यंत या योजनेअंतर्गत 6,46,164 अर्जांची यशस्वी नोंदणी झाली आहे. या योजनेबाबत सजगता पसरवण्यासाठी उद्योगांशी संबंधित अनुभवी केंद्रांची स्थापनाही या ठिकाणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विश्वकर्मा कार्यशाळेचेही आयोजन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -