कोलकात्याच्या हुगळी नदीतील बोगद्यातून धावणार मेट्रो
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या काळात भारतात अनेक विकासकामे राबवण्यात आली. अटल सेतू (Atal Setu), सुदर्शन सेतू (Sudarshan Setu), मेट्रो (Metro) आणि बुलेट ट्रेन (Bullet train), तसेच वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) यांसारखे लोकांना अत्यंत सोयीचे पर्याय आणि देशाला विकसिततेकडे नेणारे मार्ग मोदी सरकारच्या काळात आले. यासोबतच आता देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो (Under Water Metro Train) धावणार आहे. याचे उद्घाटन आज कोलकात्यामध्ये (Kolkata) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले.
पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर (West Bengal) आहेत. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटने केली. यावेळेस त्यांनी कोलकाताच्या हुगळी नदीतील (Hooghly River) बोगद्यातून धावणाऱ्या देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला.
ही पाण्याखालील मेट्रो बोगदा हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागादरम्यान धावेल. कोलकाता मेट्रो हावडा मैदान-एस्प्लेनेड बोगदा हा भारतातील नदीखाली बांधला जाणारा पहिला वाहतूक बोगदा आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकाता मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला होता आणि आज पंतप्रधान मोदींनी पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेचं लोकार्पण केलं आहे.
पंतप्रधानांनी केला अंडरवॉटर मेट्रोने प्रवास
पंतप्रधान मोदी यांनी अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर त्यातून प्रवासही केला. या प्रवासादरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पुणे मेट्रोलाही दाखवला हिरवा झेंडा
कोलकाता येथून पंतप्रधानांनी ऑनलाईन पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमिपूजन केले. याबरोबरच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. कोलकातानंतर ते बिहारसाठी रवाना झाले आहेत. बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथे त्यांची आज मोठी सभा होणार आहे.