इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
गेल्याच आठवड्यात कवी अरुण म्हात्रे हे मुंबईच्या ‘दै. प्रहार’च्या कार्यालयात प्रहार गजाली कार्यक्रमात मनमोकळा संवाद साधण्यासाठी आले होते. आठवणी सांगताना, नारायण राणेसाहेबांबद्दल त्यांनी नितांत आदर व्यक्त केला. सर्वांना भेटणारा, सर्वांसाठी आपले दरवाजे सतत उघडे ठेवणारा व नेहमी दुसऱ्याला मदत करणारा नेता, अशा शब्दांत त्यांनी राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले. राणेसाहेबांच्या तत्परतेने निर्णय घेण्याच्या गुणांचेही त्यांनी कौतुक केले.
अरुण म्हात्रे यांचा साहित्य व काव्य क्षेत्रात सर्वत्र वावर असतो. ते जरी ठाण्याला राहायला गेले असले तरी पक्के मुलुंडकर आहेत. त्यांचा मोठा मित्र परिवार मुलुंडमध्येच आहे. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री असतानाची एक घटना त्यांनी आवर्जून सांगितली. मुलुंडमधील दोन सहकारी कार्यकर्त्यांबरोबर ते राणेसाहेबांना भेटायला रात्री वर्षा निवासस्थानावर गेले होते. तेव्हा आजच्यासारख्या सुरक्षा व्यवस्थेचा गराडा नव्हता. त्यांची साहेबांशी थेट भेट झाली. बरोबर असलेल्या मुलुंडकरांनी एका मराठी शाळेला मुलुंडमध्ये जागा पाहिजे आहे, पण त्या अपेक्षित जागेवर अनेकांचा डोळा कसा आहे, हे सविस्तर सांगितले. मराठी शाळा आणि मुंबईत जागा हा तर नेहमीच संवेदनशील विषय असतो. राणेसाहेबांनी त्याचे गांभीर्य ओळखले. त्यांनाही मुलुंडची उत्तम माहिती होतीच. त्यांनी तत्काळ प्लॉट क्रमांक सांगून मुलुंडमधील तो भूखंड त्या शाळेला देण्याचे आदेश जारी केले. आज त्या जागेवर ती शाळेची भव्य इमारत उभी आहे व त्या शाळेने गुणवत्तेत व विविध क्षेत्रांत मोठा लौकिक कमावला आहे.
दै. प्रहारमध्ये संपादक म्हणून काम करीत असताना राणेसाहेबांशी थेट संवाद करण्याचा अनेकदा योग येतो. संवादातून त्यांची मानसिकता समजतेच, पण आपल्या लेखणीला धारदार शिदोरीही प्राप्त होते. मी नुकताच प्रहारमध्ये रूजू झालो होतो, महिनाही झाला नव्हता.
२२ जानेवारीला रात्री आठ वाजता माझे राणेसाहेबांशी काही संपादकीय कामाविषयी बोलणे झाले. त्यांच्या सूचना घेऊन मी पुढे कामाला सुरुवात केली. अवघ्या पाच मिनिटांतच माझ्या मोबाइलवर त्यांचा फोन आला. उद्या २३ जानेवारी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे, लक्षात आहे ना, त्यांचा पहिल्या पानावर मोठा फोटो घ्या आणि प्रहारच्या वतीने त्यांना अभिवादन करा…
दरवर्षी २३ जानेवारीला नारायण राणेसाहेब हे दै. प्रहारमधून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण करीत असतात. त्यांच्या निष्ठा त्यांच्यावर आहेतच, पण त्यांच्या जीवनात शिवसेनाप्रमुख हेच त्यांचे सर्वस्व आहे, हे त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी जाणवते. सार्वजनिक जीवनात आपणास जे काही मिळाले ते सर्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळेच, हे ते आवर्जून नेहमी सांगत असतात. राणेसाहेब म्हणतात – त्यांनी आम्हा सैनिकांना घरातल्या वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे जे अपार प्रेम दिले, त्यामुळे आमचेही त्यांच्यावर वेड्यासारखे प्रेम होते. फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या आधारावरच ते माणसांची पारख करीत असत. रस्त्यावरचा सामान्य माणूस ते मुख्यमंत्री… खुनाच्या खोट्या का होईना, पण आरोपात गोवल्या गेलेल्या माणसाचे सत्य ओळखून त्याला मुख्यमंत्रीपदावर संधी देण्याचे राजकीय धारिष्ट्य फक्त साहेबच करू शकतात…
नारायण राणेसाहेब म्हणतात – मला स्वत:ला साहेबांचे खूप प्रेम मिळाले. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला. मी आज जो आहे, माझ्या राजकीय यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माणसाने विचाराने श्रीमंत असावे व ही श्रीमंती त्याने वाटत राहिली पाहिजे, हा त्यांचा विचार माझी नेहमीच पाठराखण करत राहील. या जगातील माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे, असे मला कोणी विचारले तर मी बेधडकपणे बाळासाहेब ठाकरे हेच नाव घेईन… मी आयुष्यात त्यांना कधीही विसरू शकणार नाही…
नारायण राणे राज्याचे महसूलमंत्री असताना मी त्यांना भेटायला मंत्रालयात गेलो होतो. त्यांच्या कार्यालयातून एक महिला बाहेर आली व साहेबांनी आमच्यावर फार मोठे उपकार केले, असे सांगू लागली. मी कार्यालयात गेल्यावर साहेबांना मोठ्या उत्सुकतेने त्या महिलेविषयी विचारले, तेव्हा ते म्हणाले, ती आमच्या चेंबूरच्या कार्यकर्त्याची पत्नी आहे. त्या कार्यकर्त्याचे नुकतेच निधन झाले. त्याला शाळेत जाणारी मुलगी आहे. त्याच्या मुलीची आबाळ होता कामा नये, असा मी विचार केला. त्या मुलीच्या नावावर बँकेत किंवा अन्य वित्तीय संस्थेत मुदत ठेवीची रक्कम गुंतवण्याचा मी निर्णय घेतलाय. ती मुलगी जेव्हा सज्ञान होईल, तेव्हा तिला शिक्षणाला व तिच्या लग्नाला काही कमी पडू नये, अशी मी व्यवस्था केली आहे.
आजची नेते मंडळी, मग ती कुठच्याही पक्षाची असोत, ते त्यांच्या मोबाइवर व त्यांच्या मर्सिडीजमध्ये एवढे बिझी असतात की, त्यांना कार्यकर्त्यांशी बोलायला, भेटायलाच नव्हे, तर त्यांच्याकडे बघायलाही वेळच नसतो. नारायण राणे मात्र आपल्या कार्यकर्त्यांची कशी कौटुंबिक काळजी घेतात, हेच या प्रसंगातून जाणवले.
मुख्यमंत्री असताना राणेसाहेब दर गुरुवारी जनता दरबार भरवत असत. तेथे कोणीही सामान्य माणूस त्यांना भेटून त्याची कैफियत मांडत असे. एकदा एक सोळा-सतरा वर्षांची कांबळे नावाची मुलगी आपल्या विधवा आईला बरोबर घेऊन त्यांना भेटायला आली. तिचे वडील म्हाडामध्ये नोकरीला होते. ते गेल्यानंतर म्हाडाने तिच्या आईला नोकरीवर घेतले, पण नंतर काढून टाकले. एवढेच नव्हे तर म्हाडातर्फे त्यांना मिळालेले घरही काढून घेतले. ऐन पावसाळ्यात ती मुलगी आईसह बस स्टॉपवर राहत होती. जनता दरबारात तिने आपली दु:खद कहाणी ऐकवताना, येथे आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे सांगितले. तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून नारायण राणेसाहेबांना प्रशासनातील अधिकाऱ्यांविषयी संताप आला. त्यांनी म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांना फोन लावला. मी आपल्याकडे कांबळे नावाची फॅमिली पाठवतोय, त्यांना २४ तासांत घर देण्याची व्यवस्था करा, असे आदेश दिले.
साहेबांच्या फोननंतर त्या माय-लेकीला सुरक्षित निवारा मिळालाच, पण तिच्या आईला म्हाडामध्ये पुन्हा नोकरीही मिळाली… मुख्यमंत्री मिळालेल्या अधिकाराचा सदुपयोग केला, तर गोरगरिबांना कसा न्याय देता येतो, त्याचे हे उदाहरण आहे. हा प्रसंग राणेसाहेबांच्या स्मरणात कायम आहे व त्याचे आजही त्यांना समाधान आहे.
एकदा राणेसाहेबांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेतले. त्या दिवशीचा दै. प्रहारचा अंक माझ्यापुढे ठेवला. पहिल्या पानावर काय चुकले आहे, असे त्यांनी मला विचारले. मी कमालीचा भांबावून गेलो. त्या दिवशी हेडलाइन महाराष्ट्राची होती. एका मंत्र्यांच्या फोटोसह मोठी बातमी होती आणि खालच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींची बातमी होती. त्यांनी कोणाला कसे महत्त्व दिले पाहिजे, हे लक्षात आणून दिले. त्यांचा मुद्दा शंभर टक्के बरोबर होता. पंतप्रधान व राष्ट्रपती यांना पहिल्या पानावर प्राधान्याचे वरचे स्थान मिळाले पाहिजे, हे पथ्य आम्ही दै. प्रहारमध्ये कटाक्षाने पाळत आलो आहोत. कोणाला किती महत्त्व द्यायचे व कोणाला द्यायचे नाही, याचे धडे मी संपादक म्हणून साहेबांकडून घेतले आहेत. वाचकांना काय द्यायचे व समाजापुढे काय मांडायचे यासंबंधी त्यांचे निरीक्षण अचूक आणि अभ्यासपूर्ण असते. वृत्तपत्रात वायफळ गोष्टींना महत्त्व मिळता कामा नये, असे त्यांचे नेहमी सांगणे असते. वृत्तपत्रातील जागा मौल्यवान असते. त्या जागेचा वापर बातमी किंवा फोटो देताना योग्य पद्धतीने झाला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. दै. प्रहार ते नियमित वाचतात, याची जाणीव ठेवूनच आम्ही काम करीत असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कमी पडता कामा नये, त्यांच्या राजकीय भूमिकेला छेद जाईल, असे दै. प्रहारमध्ये काहीही प्रसिद्ध होता कामा नये याविषयी आम्ही काळजी घेत असतो. त्यांचा विचार व त्यांची भूमिका तत्कालिक नसते, तर त्यामागे दूरदृष्टी असते, भविष्याचा वेध असतो आणि समाजाच्या हिताचा विचार असतो, याचा अनुभव वेळोवेळी येतो.
राणेसाहेब जेव्हा जवळच्या सहकाऱ्यांवर रागावून बोलतात. कधी कडक शब्दांत कानउघाडणी करतात, तेव्हा ऐकणाऱ्यांचाही थरकाप उडतो. पण त्यामागे त्यांची तळमळ असते. प्रत्येक गोष्ट ही अचूक, वेळेवर, नीटनेटकी, वास्तवतेला धरून व शिस्तबद्ध असली पाहिजे, हीच त्यांची त्यामागे भावना असते. कोकणचे वैभव म्हणून ओळखले जाणाऱ्या नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांची भरभराट होवो व मनोकामना पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.