Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखIndian Railway : भारतीय रेल्वेची वेगवान प्रगती

Indian Railway : भारतीय रेल्वेची वेगवान प्रगती

आज आपण भारतीय अमृत भारत, वंदे भारत, मेट्रोसारख्या रेल्वेतून प्रवास करत आहोत. जगातल्या प्रगत रेल्वे व्यवस्थेमध्ये आज भारताचे नाव एका वेगळ्याच उंचीवर आहे. एकेकाळी भारतीय रेल्वे व्यवस्थेबाबत फारसे चांगले बोलले जात नसायचे, आज तीच भारतीय रेल्वे वंदे भारतच्या रेल्वे गाड्या अन्य देशांना निर्यात करण्याची तयारी करू लागली आहे.

भारतीय रेल्वे म्हणजे विलंबाने धावणारी, अनेकदा अपघात होणारी, जुनाट गाड्यांमध्ये कोंदट वास अशी प्रतिमा या रेल्वेची निर्माण झाली होती, पण आता ही प्रतिमा कालबाह्य झाली असून, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रेल्वेने आपले स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. अर्थात ते सहजासहजी घडलेले नाही. त्यासाठी परिश्रमपूर्वक वाटचाल करत भारतीय रेल्वेने आपली प्रतिमा बदलली आहे. एकेकाळी संथगतीने धावणारी भारतीय रेल्वे आता बुलेट ट्रेन चालविण्याची चाचपणी करू लागली आहे. इतकेच नाही तर ताशी २५० किमी वेगाने धावणारी रेल्वे बनविण्याचे कामही भारताने सुरू केले आहे. २०१४ पूर्वीची भारतीय रेल्वे आणि आज १० वर्षांनंतर २०२४ची रेल्वे यात जमीन आसमानचा झालेला फरक पाहावयास मिळत आहे आणि तो भारतीय प्रवाशांना अनुभवयास मिळत आहे.

आपल्या देशामध्ये ब्रिटिशकालीन राज्यव्यवस्था कार्यरत असताना प्रथम रेल्वे धावली. दि. १८ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरिबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली; परंतु ही रेल्वे धावण्यासाठी त्या अगोदर तत्कालीन रेल्वे व्यवस्थेला २० वर्षे नियोजन करावे लागले होते. ज्यावेळी भारतात सर्वप्रथम रेल्वे धावली, त्यावेळी भारतीयांमध्ये कमालीचे कुतूहल होते. ‘साहेबाचा पोरगा कसा अकली, बिन बैलाची रे गाडी त्यानी हाकली’ असे कौतुकाने त्यावेळी रेल्वेबाबत बोलले जात असायचे. आजही भारतातील रेल्वे वाहतुकीमध्ये प्रामुख्याने एकात्मिक रेल्वे नेटवर्कसह प्रवासी आणि मालवाहतुकीचा समावेश असतो.

भारतीय रेल्वे, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या मालकीची एक वैधानिक संस्था, भारताची राष्ट्रीय रेल्वे व्यवस्था चालवते. हे प्रमुख महानगरांमधील उपनगरीय रेल्वेसह देशभरातील रेल्वे ऑपरेशनचे प्राथमिक मालक आणि ऑपरेटर आहे. बहुतेक मेट्रो शहरी रेल्वे नेटवर्क संबंधित ऑपरेशन्सच्या उद्देशाने स्थापन केलेल्या स्वतंत्र संस्थांद्वारे चालवले जातात. खासगी मालकीच्या रेल्वे काही ठिकाणी अस्तित्वात आहेत, ज्याचा वापर मुख्यतः एकात्मिक रेल्वे नेटवर्कशी मालवाहतूक करण्यासाठी केला जातो. आंतर-शहर रेल्वे सेवा प्रामुख्याने भारतीय रेल्वेद्वारे चालविल्या जातात, तरीही अलीकडे २०२२ मध्ये खासगीरीत्या चालविल्या जाणाऱ्या गाड्या सुरू करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत.

१७१ वर्षांच्या भारतीय रेल्वे प्रवासामध्ये रेल्वेने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एकेकाळी भारतीय रेल्वे व्यवस्थेबाबत भारतीयच नाके मुरडत असायचे, दूषणे देत असायचे. भारतीय प्रवासी रेल्वेचा प्रवास रखडत, विलंबाने होत असल्याने नोकरदारांच्या नशिबी लेटमार्क हा पाचवीलाच पुजलेला असायचा. पण आता त्याच रेल्वे व्यवस्थेबाबत भारतीय अभिमानाने भरभरून बोलत आहेत. हा बदल २०१४ नंतर झालेला आहे.

ज्या राज्यकर्त्यांकडे प्रगतीची दूरदृष्टी असते, बदल करण्याची महत्त्वाकांक्षा असते. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असते, त्या देशाला विकास होण्यापासून कोणीही अडथळा बनू शकत नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. काँग्रेसी राजवटीतही रेल्वे व्यवस्था कार्यरत होती, पण त्या व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याची मानसिकता काँग्रेसी लोकांनी कधीही दाखविली नाही, त्यामुळे रेल्वे व्यवस्थेला प्रवाशांकडून दूषणांचीच शाबासकी मिळत गेली. पण २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या राजवटीत भारतीय रेल्वेने मारलेली गरुड भरारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पकतेची, विकासात्मक महत्त्वाकांक्षेची, दूरदृष्टीची पोहोचपावतीच म्हणावी लागेल.

मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने मोठी कामगिरी केली आहे. वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन यांना अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळाली. रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे, मालवाहतुकीवर भर दिला जात आहे. तसेच आगामी काळात रेल्वेकडे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत, ज्यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलू शकतो. यातच गेली १० वर्षांत भारतीय रेल्वेचे अतिशय चांगली प्रगती केल्याचे भारतीयांना अनुभवयास मिळत आहे.

येत्या काही वर्षांत भारत किमान एक हजार नवीन अमृत भारत ट्रेन तयार करेल. तसेच ताशी २५० किमी वेगाने धावणारी ट्रेन बनविण्याचे काम सुरू आहे. रेल्वेने वंदे भारत ट्रेन निर्यातीच्या प्रक्रियेसंदर्भात आधीच काम सुरू केले आहे. जगातील सर्वांत उंच चिनाब पूल आणि कोलकाता मेट्रोसाठी पाण्यातून बोगदा या अशा गोष्टी रेल्वेने अनेकविध आघाड्यांवर केलेली प्रगती दर्शविते.

रेल्वेची मोठी सामाजिक जबाबदारी आहे. भारतीय रेल्वेतून प्रतिवर्षी सुमारे ७०० कोटी प्रवासी प्रवास करतात. तिकीटदरांची रचना अशी आहे की, एका व्यक्तीला घेऊन जाण्याचा खर्च १०० रुपये असेल, तर रेल्वे केवळ ४५ रुपये आकारते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरासरी ५५ टक्के सूट देण्यात येते. अमृत भारत ही जागतिक दर्जाची ट्रेन तयार केली आहे. या ट्रेनने फक्त ४५४ रुपये तिकीट दरात एक हजार किमीचा प्रवास करता येतो. दोन दिवसांनी दि. ६ मार्च रोजी पंतप्रधान मोदी कोलकाता येथील भारतातील पहिल्या नदीखालून बांधण्यात आलेल्या रेल्वे मेट्रो बोगद्याचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींचा भर हा पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आहे, त्यामुळे २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र नक्कीच बनेल आणि त्यात भारतीय रेल्वेचा वाटा मोलाचा असेल, यात काही शंकाच नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -