Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीMahendra Thorve : भुसे-थोरवे यांच्यातील वाद नेमका कशावरुन? थोरवेंनी स्पष्टच सांगितलं...

Mahendra Thorve : भुसे-थोरवे यांच्यातील वाद नेमका कशावरुन? थोरवेंनी स्पष्टच सांगितलं…

विधीमंडळाच्या लॉबीत झाली होती बाचाबाची

मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत आज शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची (Shivsena Shinde Group MLA Fight) झाली. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मध्यस्थी केल्यावर वाद थांबला. यानंतर शंभूराज देसाई यांनी वाद झालाच नाही, ते केवळ चर्चा करत होते असा दावा केला. मात्र, महेंद्र थोरवेंनी दादा भुसेंवर टीका करत नेमका कशामुळे वाद झाला हे स्पष्ट सांगितलं आहे.

महेंद्र थोरवे म्हणाले की, बाळासाहेबांनी शिकवलं आहे, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा. दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री आहे. माझ्या मतदारसंघातलं काम होत नाही हे विचारलं तर माझ्यावर आवाज चढवला. या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि श्रीकांत शिंदेंनी देखील फोन केला होता. आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार? आम्ही शिवसैनिक आहोत, स्वाभिमानी आहोत आम्ही सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो, असे ते म्हणाले.

मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे मी कामानिमित्त गेलो होतो. दोन महिन्यांपासून आमदार भरत गोगावले असतील किंवा मी स्वतः असेन, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामं झाली, त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेलं कामं, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतलं नाही.

मी काही तुमच्या घरी खायला येत नाही

मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदार दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशा पद्धतीने आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचं काम आहे. त्या ठिकाणी काम झालंच पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, असं त्यांना सांगितलं. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणून आमच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली, असं थोरवे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -