मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली सात-आठ महिने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे – पाटील यांचा सरकारवर टीका करताना तोल सुटला, हे सर्व राज्यातील जनतेने टीव्हीच्या पडद्यावर बघितले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एवढेच नव्हे तर देशाचे पंतप्रधान यांचा एकेरी उल्लेख करणे हे कोणालाच आवडले नाही. त्यांचा राग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त आहे हे लपून राहिलेले नाही. फडणवीस यांची जात काढून त्यांना टार्गेट करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्यांच्या राजकीय विरोधकांनीही त्यांच्यावर त्यांच्या जातीचा उल्लेख करून कधी टीका केलेली नाही. पण जरांगे – पाटील यांनी टीव्हीच्या कॅमेऱ्यापुढे सर्व मर्यादा ओलांडल्या व आपणच सुरू केलेल्या आंदोलनाला स्वत:च्या बेताल बोलण्याने गालबोट लावले.
राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम गृहखात्याचे आहे. कायदा सर्वांना समान आहे, कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस बघ्याची भूमिका घेऊ शकत नाहीत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे – पाटील यांनी काहीही कोणाबद्दल बोलावे व आंदोलकांनीही कायदा हाती घ्यावा, हे आता महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर त्यांनी काही शहाणपण घेतले, तर ते समाजाच्या हिताचे होईल; पण कोणाच्या सांगण्यावरून ते प्रक्षोभक भाषणे करणार असतील, तर त्याचे परिणामही त्यांना यापुढे भोगावे लागतील.
आठ वर्षांपूर्वी राज्यात ५८ मूक मोर्चे निघाले व त्यात लाखोंच्या संख्येने मराठा सहभागी झाले. तेव्हा कायदा- सुव्यवस्थेला किंचितही गालबोट लागले नव्हते. मग जरांगे – पाटील यांनी उद्युक्त केलेल्या आंदोलनात जाळपोळ का व्हावी?, पोलिसांवर दगडफेक व हल्ले का व्हावेत?, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले का व्हावेत?, याची उत्तरे स्वत: जरांगे – पाटील यांनी कधीच दिली नाहीत, दंगल करणारे लोक आमचे नव्हते, असे सांगून त्यांना हात झटकता येणार नाहीत.
सुरुवातीपासून त्यांच्या मागण्यांविषयी सरकारने सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवला. स्वत: मुख्यमंत्री व सात – आठ मंत्री हे गेले काही महिने जरांगे – पाटील यांच्या सतत संपर्कात होते. जालन्यातील अंतरवाली सराटीत जाऊन सरकारमधील व सत्ताधारी युतीमधील अनेक आमदार – खासदारांनीही त्यांच्या भेटी घेऊन समर्थन दिले. कुणबी समाजाची नोंद असलेल्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक लाख कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून निर्धारित वेळेत सर्वेक्षण केले व मागासवर्ग आयोगाचा अहवालही तप्तरतेने सरकारला सादर झाला. त्या आधारे महायुती सरकारने मराठा समाजाला विधिमंडळात एकमताने ठराव करून १० टक्के आरक्षण दिले. तरीही जरांगे का हट्टाला पेटले आहेत? सग्या-सोयऱ्यांसह ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सरकारला व समाजाला वेठीला धरण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे. त्यांचे आंदोलन शांततेने सुरू होते, तोपर्यंत सरकारने त्यांना साथ दिली.
राज्यात आजवर विविध मागण्यांसाठी हजारो आंदोलने झालीत, पण आंदोलक नेत्यांकडे अध्यादेश घेऊन मुख्यमंत्री कधी स्वत: गेले नव्हते. पण मराठा आरक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे वाशीला जरांगे यांना भेटायला गेले व त्यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन जरांगे – पाटील यांनी उपोषण सोडले. मग त्याच शिंदे सरकारच्या विरोधात कशासाठी रस्त्यावर उतरले आहेत? पोलिसांवर हल्ले करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाला, त्या घटनेपासून जरांगे – पाटील हे प्रसिद्धीच्या उंचीवर पोहोचले. त्या घटनेत पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबन व बदलीची कारवाई तर झालीच, पण सरकारने लाठीमाराबद्दल माफी मागितल्याने जरांगे – पाटील यांचे महत्त्व वाढले. अंतरवाली सराटी येथे मंत्री व नेत्यांची रोज रिघ लागायची. त्यातून जरांगे हे कोणी व्हीआयपी नेते आहेत अशी प्रतिमा मीडियातून तयार झाली.
जरांगे – पाटील हे फडणवीसांना का टार्गेट करीत आहेत?, ते कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत का?, त्यांचा बोलविता धनी कोण आहे?, असे प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत. जरांगे – पाटील हे शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे स्क्रिप्ट वापरत आहे, असा आरोप स्वत: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीच केला आहे. जरांगे – पाटील यांच्या आंदोलनाचा खर्च कोण करतो?, त्यांच्या मागे – पुढे आलिशान गाड्यांचा ताफा कोण पाठवितो?, त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची वृष्टी कोणाच्या पैशातून केली जाते?, या प्रश्नांची उत्तरे बाहेर येतीलच. लेकरांची व त्यांच्या भविष्याची भावनिक भाषा वापरून त्यांनी मराठा समाजाची माता – भगिनींची सहानुभूती मिळविली आहे, पण त्यातून जो अहंकार निर्माण झाला तोच द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे.
फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे काही केले, त्याची इतिहासात नोंद आहेच. मराठा समाजाला आर्थिक मदत व शिष्यवृत्तीसाठी त्यांनी घेतलेले निर्णयही मोठे आहेत. पण त्यांना ब्राह्मण म्हणून टार्गेट केले जाणार असेल, तर ते मराठा समाजातील बहुसंख्यांनाही पसंत पडणार नाही. फडणवीस आपला एन्काऊंटर करून मारण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा सलाइनमधून विष देऊन आपल्याला कायमचे संपविण्याचे फडणवीसांनी षडयंत्र रचले, असे आरोप करणे अतिशय गंभीर तर आहेच, पण राज्यात, समाजात द्वेष आणि तेढ उत्पन्न निर्माण करणारे आहे. इतकी खुमखुमी असेल तर मुंबईतील सागर बंगल्यावर येतो, मला संपवून दाखवा, असे फडणवीसांना आव्हान देत जरांगे – पाटील अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे निघाले. याचा अर्थ आणि परिणाम काय होतो, याचे त्यांना भान नाही का? सरकारच्या संयमाचा अंत बघू नका असे, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, यातून जरांगे – पाटील यांनी काही बोध घ्यावा आणि फडणवीसांची बदनामी करणारे स्क्रिप्ट बंद करावे.