मुंबई : वीज कंपन्यांचे घोटाळे बाहेर येत असतानाच आता ८८ हजार वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा भविष्याचा पैसाही धोक्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक या संघटनेने म्हटले आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा ठेवा असणारे सीपीएफ ट्रस्टच्या विश्वस्थांनी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानेच वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. १३ हजार कोटीचा वीज कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा ट्रस्ट, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या नियमाप्रमाणे राज्य वीज कंपन्या स्वतः चालवितात. म्हणून या ट्रस्टवर अर्धे ट्रस्टी कंपनी प्रशासनाचे व अर्धे ट्रस्टी कर्मचारी संघटनेचे असतात. मात्र सद्याचे ट्रस्टी, ट्रस्टकडे दुर्लक्ष करीत असल्याने व काही ट्रस्टींना पूर्ण ज्ञान नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे, असे इंटकने म्हटले आहे.
गेल्या काही वर्षापासून वीज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ट्रस्टचा हा भोंगळ कारभार चालू असल्याने चांगल्या अवस्थेत असणारा ट्रस्ट अचानक तोट्यात आला आहे. याचे कारण ट्रस्टची गुंतवणूक राजकीय दबावाखाली चुकीच्या ठिकाणी झाली व होत आहे. या ट्रस्टने खास करून, दिवाण हौसिंग, ILFS म्हणजे इन्फ्रास्ट्रॅक्टर लिझनिंग फायनान्स सर्व्हिसेस, व रिलायन्स कॅपिटल या ठिकाणी वरील रक्कमेची गुंतवणूक केली होती. या तीनही वित्तीय कंपन्या डबघाईला आल्याने गुंतवलेले ५६९ कोटी रुपये अडचणीत म्हणजे तोट्यात आले आहेत.
सदर बाब म. रा. वि. म. भ. नि. नि. (महाराष्ट्र राज्य वीज मंडळ भविष्य निर्वाह निधी) ट्रस्टने आपल्या २०१९/२० च्या वार्षिक अहवालात नोंदविली आहे.
सदर गंभीर परिस्थिती पाहता पुढील काळात या ट्रस्टची काय परिस्थिती असेल व नक्की तोटा किती असणार याची चिंता कर्मचा-यांना लागली आहे. वर्षे २०२०/२१, २०२१/२२ व २०२२/२३ या वर्षांचे ताळेबंद तयार असताना देखील हे आर्थिक अहवाल MSEB CPF पोर्टलवर ट्रस्टने प्रसिद्ध केलेले नाही. तो लपविण्याचा प्रकार आहे, असा गंभीर आरोप इंटक संघटनेने केला आहे.
ही गंभीर बाब आहे, त्यामुळे सदरील ट्रस्ट बद्दल संशय अधिकच बळावला आहे. विशेष म्हणजे एवढे सर्व होऊनही वरिष्ठ पातळीवर सर्व सुरळीत असल्याचे चित्र दाखवले जात आहे. परंतू किमान १३ हजार कोटीचा हा ट्रस्ट ८८ हजार वीज कर्मचा-यांच्या कुटुंबियांशी निगडित असल्याने ही बाब अधिक चिंताजनक झाली आहे!
एकीकडे हजार-पाचशे रुपयांच्या विज बिलाच्या वसुलीसाठी बाहेर आमचा कर्मचारी मार खात आहे व इकडे आमच्याच ट्रस्टमध्ये अशी अनागॊदी चालु असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी व संबंधितांकडून पैसे वसूल करावे. जबाबदारी म्हणून सदरील तोटा कंपनी भरून देणार असली तरी, कंपनीचा पैसा हा कर्मचाऱ्यांचा असल्याने कुणाच्या चुकीमुळे या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग का? असा प्रश्नही संघटनेने केला आहे. म्हणून सध्याच्या सर्व ट्रस्टींना घरी पाठवावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक या संघटनेने दिला असल्याचे इंटकचे प्रवक्ते व उपाध्यक्ष राकेश जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…