दोनच शब्द : फक्त “अर्धा ग्लास”

Share

( डी डी कट्टा ग्रुप)

आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेलमध्ये गेलो होतो… विषय अर्थातच पाण्याचा होता, गप्पा चालू होत्या, विषय जसाजसा पुढे सरकत होता, तसं एक observe करत होतो, अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन् कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही… आमच्याही टेबलवर जाताना मला ४ ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे. मनाला काहीतरी खटकत होतं. मीटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेलमध्ये घुसलो. परवानगी घेतली अन् वेटर्सचा मॅनेजर होता त्याला भेटलो. म्हटलं, हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्ध ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं?”

तो म्हटला, “ज्या वेटरने टेबल क्लिअर केला असेल त्याने ते पाणी बेसिनमध्ये ओतून दिलं असणार, तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता…!”
म्हटलं वीक-डेज मध्ये तासाला अंदाजे किती लोक येत असतील?”
तो म्हटला, “नाही म्हटलं तरी १५ ते २० जण सरासरी. दुपारी लंचला अन् रात्री डिनरला जास्त.”
म्हटलं, म्हणजे १० तास हॉटेल चालू आहे असं पकडलं, तर साधारण सरासरी २५० जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार-रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार! म्हणजे सरासरी रोज ३५० जण. यातल्या साधारण २०० जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं तर अंदाजे १०० लिटर पाणी बेसिनमध्ये “रोज वाया”.

याचा अर्थ एक हॉटेल कमीतकमी १०० लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिनमध्ये रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेजमधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं.
पुण्यात सध्या अंदाजे छोटे-मोठे पकडून ६००० च्या वर हॉटेल्स आहेत. म्हणजे दिवसाला ६०००*१०० लिटर, म्हणजे ६ लाख लिटर प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला. हे झालं एका दिवसाचं, असं आठवड्याचं म्हटलं, तर ४२ लाख लिटर अन् वर्षांचं म्हटलं, तर २२ कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय. या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.

हे एका शहराचं, अशी महाराष्ट्रात कमीत कमी १५ मोठी शहरं आहेत. मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वगैरे वगैरे कित्येक. बरं हे कोणत्या देशात, कोणत्या राज्यात घडतंय? तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार जर ४ तासाला एकजण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरियासारख्या रोगाने मरतोय त्या राज्या-देशात. म्हणजे एका बाजूला लोक पाण्यावाचून तडपून मरतायत अन् दुसऱ्या बाजूला एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय. बरं हे पाणी येतं कुठून? तर आपल्या आसपासच्या डॅम्समधून. पुण्याच्या आसपास ७ डॅम्स आहेत, पुण्याला दरवर्षी साधारण १३ टीएमसी पाणी लागतं अन् यावर्षी उपलब्ध पाणी आहे १७ टीएमसी, उरलेलं ४ टीएमसी पाणी शेतीला.

यावर्षी मात्र पाऊस कमी झाल्याने अन् पुण्याची लोकसंख्या सतत वाढत असल्याने शेवटी राज्य सरकारने आदेश दिलेत की, १७ टीएमसी पाणी हे पुण्याला देण्यात यावं म्हणजे शेतीला उन्हाळी आवर्तनासाठी पाणी जवळ-जवळ नाहीच!! म्हणजे आपण जे वाया घालवतोय ते या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे. “उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय!” हा क्रूर विरोधाभास आहे! पण हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या ‘दोन’ शब्दांनी… मोजून दोन…! इथून पुढं कधीही वेटर समोर तुमच्या ग्लासमध्ये पाणी ओतत असेल, तर त्याला फक्त एवढंच म्हणा… “अर्धा ग्लास!!”
याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन् उरलेलं पाणी वाचेल, हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन् धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”

फार छोटी गोष्टंय, फक्त दोन शब्द उच्चारायचेत. पण तुमचे दोन शब्द तुमचेच २२ कोटी लिटर पाणी वाचवू शकतात… लक्षात ठेवा ज्या प्रगत मानवजातीने, सेकंदाच्या दहाव्या भागाच्या प्रिसीजनने परग्रहावर माणूस यशस्वी उतरवलाय. त्याच मानवजातीला अजूनपर्यंत ‘पाणी’ मात्र निर्माण करता आलेलं नाहीये… मग आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी की… तेही आपल्याच माणसांसाठी…!! 😊 सो, इथून पुढं हॉटेलमध्ये असलो की,
“अर्धाच ग्लास पाणी…!!!” (हे फक्त पुण्यातच घडतं असं समजून दुर्लक्ष करू नका…)

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

4 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

5 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago