Tuesday, July 9, 2024

पैज

  • कथा : रमेश तांबे

विजय विज्ञानवादी होता. विज्ञानात भरपूर मार्क्स मिळवायचा. पण त्याची विज्ञाननिष्ठता सिद्ध करण्याची एकही कसोटी त्याने पार केली नव्हती आणि आता त्याला सिद्ध करायचे होते की, तो विज्ञानवादी आहे. या जगात भुतंं-खेतं नसतात, हे त्याला आपल्या मित्रांना दाखवून द्यायचं होतं. म्हणून आज त्याला मित्रांबरोबर लावलेली पैज पूर्ण करायची होती.

सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. दूरवरून देवळातल्या घंटेचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. विजय घराबाहेर पडण्याची तयारी करू लागला. आज त्याला मित्रांबरोबर लावलेली पैज पूर्ण करायची होती. पैज म्हणाल तर खूप सोपी आणि म्हणाल तर तशी अवघड! कारण पैज होती अमावस्येच्या रात्री गावातल्या स्मशानभूमीत एक रात्र मुक्काम करायचा आणि तोही एकट्याने. पैज पंधरा दिवसांपूर्वीच ठरली होती. विजयचे सारे वर्गमित्र भूत असते या विचारावर ठाम होते. पण विजयला मात्र ते पटत नव्हते. त्याचं म्हणणं होतं की, “भुतं-खेतं हा सगळा मनाचा खेळ असतो.” खूप चर्चा झाली पाच विरुद्ध एक असा गप्पांचा फड रंगला, पण विजय काही माघार घेईना. तेव्हा मित्रांनी ठरवले, “ठीक आहे तू तुझं म्हणणं कृतीतून सिद्ध कर. अमावस्येच्या रात्री गावाच्या स्मशानभूमीत एक रात्र एकट्याने मुक्काम करायचा” आणि ही पैज विजयने सहज हसत हसत स्वीकारली.

अमावास्येची रात्र जवळ येऊ लागली अन् विजयच्या मनात विचारांचा कल्लोळ माजू लागला. खरंच आपल्याला हे जमेल का? खरंच आपण हे करू शकतो का? याशिवाय त्याचा मित्र अनिल त्याला रोज सांगत असे, “विजय भलते धाडस करू नकोस.” पण विजय माघार घेणे शक्य नव्हते. कारण पैज लागली होती. अमावास्येची रात्र उजाडली. विजय घराच्या बाहेर पडला. सर्वत्र मिट्ट काळोख आणि त्या काळोखातून ऐकू येणारे कुत्र्यांचे विव्हळणे. त्याची नजर भिरभिरू लागली. वाऱ्यावर हलणारी झाडाची पानं सळसळत होती. इतक्यात त्याच्या पायाला कुठला तरी प्राणी येऊन धडकला. ते मांजर असावं असं म्हणून तो पुढे निघाला. खरं तर विजय विज्ञानवादी होता. विज्ञानात भरपूर मार्क्स मिळवायचा. पण त्याची विज्ञाननिष्ठता सिद्ध करण्याची एकही कसोटी त्याने पार केली नव्हती आणि आता त्याला सिद्ध करायचे होते की, तो विज्ञानवादी आहे. या जगात भुतंं-खेतं नसतात हे त्याला आपल्या मित्रांना दाखवून द्यायचं होतं.

तो हळूहळू स्मशानाच्या दिशेने पुढे निघाला. स्मशानभूमीत उंचावर एक मंद दिवा मिणमिणत होता. त्या दिव्याखालीच बसून रात्र काढूया, असा विचार त्याने केला. आजूबाजूची जागा साफ करून तो तिथेच बसला. त्याच्या समोरच एक प्रेत जळत होतं. त्या जळणाऱ्या प्रेताकडे बघत विजय विचार करू लागला. काय वेडी लोकं आहेत. म्हणे स्मशानात भुतं असतात अन् तेवढ्यात प्रेताची कवठी फुटल्याचा मोठा आवाज आला. तो आवाज ऐकून विजयच्या अंगावर सर्रकन काटा आला. समोरचे प्रेत आणखी जोरात जळू लागले. आता मात्र विजय अंग चोरून बसला. तेवढ्यात त्याच्या डोक्यावरून कुणीतरी हात फिरवत असल्याचा त्याला भास झाला. त्याने झर्रकन मान फिरवली. पण त्याला कुणीच दिसले नाही. दोन मिनिटे शांततेत गेली अन् पुन्हा कुणीतरी पाठीवरून हात फिरवत असल्याचा भास त्याला झाला. आता मात्र विजय चांगलाच घाबरला. तो झटकन उठला अन् मागे वळून पाहू लागला. पण त्या मिट्ट अंधारात त्याला कुणीच दिसले नाही. घड्याळात आताशी मध्यरात्रीचे २ वाजले होते. तो पुन्हा खाली बसला. तोच समोरून कुणीतरी धावत गेल्याचे त्याने पाहिले अन् तो ओरडला, “कोण आहे रे तिकडे?” आता अंधारातून हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आता मात्र विजयची बोबडीच वळली. तो स्मशानातून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण पळण्याच्या प्रयत्नात तो धाडदिशी आपटला. नेमका डोक्यावरच आपटल्याने त्याची शुद्ध हरपली. मग कितीतरी वेळ तो तसाच पडून होता.

विजयला जाग आली तेव्हा त्याने पाहिले की, तो एका हॉस्पिटलात भरती झाला आहे. पैज लावणारे मित्र बाजूलाच बसले होते. अन् विजयकडे बघून गालातल्या गालात हसत होते. विजय काही बोलणार तोच विजयचे मित्र त्याला म्हणाले, “अरे विजय तू म्हणतोस तेच खरे आहे बघ. अमावास्येच्या रात्री आम्हीदेखील तुझ्या पाठोपाठ आलो होतो. पण आम्हाला काही भूत दिसलंच नाही बघ कुठे.” आता विजयच्या लक्षात आले. अरेच्चा! म्हणजे स्मशानात मला जे भास होत होते, ती या मित्रांंची करामत होती तर! अन् आपण विज्ञानवादी असूनही भुताच्या जाणिवेने घाबरलो. हे कळताच विजयने खजील होऊन मान खाली घातली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -