Old Hindi song : नीला असमान सो गया…

Share
  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

अमिताभच्या गाजलेल्या चित्रपटात यश चोप्रांच्या ‘सिलसिला’ (१९८१)चा उल्लेख करावाच लागेल. अमिताभबरोबर, संजीवकुमार, जया भादुरी आणि रेखा असे दिग्गज होते. सिलसिला रेखाचा अमिताभबरोबरचा शेवटचा चित्रपट! जया भादुरीबरोबरचाही शेवटचाच! बॉक्स ऑफिसवर ‘सिलसिला’ फार चमकला नाही. मात्र रसिकांच्या एका वर्गासाठी तो आजही एक हळवी आठवण बनून राहिला आहे. खुद्द यश चोप्रांनी त्यांच्या आवडीचे चित्रपट सांगताना ‘लम्हे’बरोबर फक्त ‘सिलसिला’चा उल्लेख केला होता.

संगीतप्रेमींना मेजवानीच ठरलेल्या सिल्सिलाचे संगीत होते आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दोन क्लासिक संगीतकारांचे – शिवकुमार शर्मा आणि हरीप्रसाद चौरासिया! चोप्रांनी सिलसिलासाठी चक्क ६ गीतकार निवडले – जावेद अख्तर, हसन कमाल, राजेंद्र कृष्णन, निदा फाजली, हरिवंशराय बच्चन आणि चक्क संत मीराबाई! यातील काहीशा सवंग अभिरुचीचे ‘रंग बरसे भिगे चुनरिया’ अजूनही दरवर्षी होळीला सगळीकडे वाजते. सिनेमाचे नितांत सुंदर थीम साँग होते जावेद अख्तर यांचे ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए.’ सिनेमाला तीन फिल्मफेयर नामांकने मिळाली – सर्वोत्कृष्ट अभिनेता – अमिताभ बच्चन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – जया बच्चन आणि सर्वोत्तम संगीतकार- शिव-हरी!

सिलसिलाच्या संगीताने लोकांना वेड लावले. मात्र ते जावेद अख्तर आणि हरिवंशराय बच्चन यांच्या मनस्वी गीतांमुळे होते की, शिवहरी यांच्या कर्णमधुर संगीतामुळे, हे सांगणे अवघड! बासरीच्या सतत सुरू असलेल्या सुरांमुळे एक रोमँटिक आणि हुरहूर लावणारा मूड तयार व्हायचा.

सिलसिला ही एका अर्धवट राहून गेलेल्या प्रेमाची कथा. तब्बल ४३ वर्षांपूर्वीच्या तरुण पिढीसाठी अगदी कॉमन; परंतु चोप्राजींनी लग्नानंतरही जुनी प्रेमकथा सुरू राहिल्याचे दाखविले! तेव्हाच्या भारतीय मानसिकतेला धक्का देणारीच ही गोष्ट! चोप्राजींनी कथा इतक्या हळुवारपणे हाताळली होती की, प्रेक्षकांनी ही वेगळ्या वळणाची कथाही नकळत स्वीकारली. रेखा-अमिताभच्या विवाहबाह्य प्रेमाचे उदात्तीकरण न करताही त्यांनी प्रेक्षकांना या जोडीचे सहानुभूतीदार करून टाकले! तसा तो तत्कालीन पिढीच्या सार्वत्रिक वेदनेचाच विषय होता, हेही कारण असेल!

सिलसिलाने त्यावेळच्या संयत समाजाच्या जखमेवर जणू एक हळुवार फुंकर घातली. अभिताभच्या आवाजातील ‘मै और मेरी तनहाई अक्सर ये बाते करते है.’ ही हरिवंशरायजींची कविता, तर सर्व काळच्या विफल प्रेमिकांची मनस्थिती सांगणारी आपबितीच होती! त्यावेळी आई-वडील, समाज, भावंडे यांच्यासाठी मूकपणे आपल्या प्रेमाचा त्याग करणे कॉमन होते. फार थोड्या प्रेमकथा यशस्वी होते!

सिलसिलाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सिनेक्षेत्रातील क्रमांक एकच्या नायकाच्या कथित प्रेमकथेबद्दल चक्क तीच पात्रे घेऊन यशजींनी हा सिनेमा काढला होता! अशा कथेत भूमिका करायला त्यांनी रेखा, अमिताभबरोबर चक्क जया भादुरीला कसे तयार केले असेल, देव जाणे!

प्रामुख्याने कथा, पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या जावेद अख्तर यांनी आपले पहिले गाणे लिहिले ते ‘सिलसिला’साठी! चित्रीकरणासाठी दिग्दर्शकांनी जी पार्श्वभूमी निवडली होती ती केवळ अप्रतिम होती. नेदरलँडमधील डवरलेल्या ट्युलिप फुलांच्या विस्तीर्ण बागा आणि काश्मीरचे निसर्गसौंदर्य आपली नजर पडद्यावरून क्षणभरही हलू देत नाहीत. बहुतेक गाण्यात रेखाचे लोभस सौंदर्य प्रेक्षकांना वेड लावते. ऐन तारुण्यातला अभिताभही खूप देखणा दिसला आहे.

एका गाण्यात लतादीदीबरोबर चक्क अमिताभ गायला आहे. जावेद अख्तर यांच्या त्या गीताचे शब्द होते –
‘नीला आसमाँ सो गया…’

गाण्याचा आशय फार मुग्ध होता. अनावर प्रेमाच्या एका आत्ममग्न अवस्थेत रेखा आणि अमिताभ हातात हात घालून निसर्गरम्य पार्श्वभूमी असलेल्या रस्त्यावरून चालत आहेत. आपल्या डोळ्यांसमोर सूर्यास्त होतो आणि अंधार पडू लागतो. अंधुक प्रकाशात दोघे प्रेमाने हात हातात घेत चालताहेत.

दोघांची त्यांच्या मनाविरुद्ध लग्ने झालेली! त्यामुळे याक्षणी जरी ते बरोबर असले तरी नशिबात पुढे वाढून ठेवलेल्या कायमच्या विरहाची त्यांना तीव्र जाणीव आहे. म्हणून ती म्हणते, ‘चंद्र माझ्या अश्रूंत बुडाला आहे आणि रात्र सुकून गेली आहे. आता आयुष्यात केवळ एकटेपणच पसरले आहे. तुझ्या विरहाचा हाच ऋतू आता कायमचा आयुष्यात राहणार आणि तो ‘वरचा’ कठोर मात्र शांतपणे सगळे बघतोय! इथे कवीला ‘आकाश’ हे बहुधा विधात्याचे प्रतीक म्हणूनच अभिप्रेत असावे. आकाश निजले आहे म्हणजे देव आमच्या बाबतीत तटस्थ आहे.

आँसुओंमें चाँद डूबा, रात मुरझाई,
ज़िंदगीमें दूरतक फैली है तन्हाई.
जो गुज़रे हमपे वो कम है,
तुम्हारे ग़मका मौसम है…
नीला आसमाँ सो गया…

त्यावेळी येणारे लतादीदींच्या आवाजातले शब्द मनात केवढी उदासी पसरवतात –
यादकी वादीमें गूँजे बीते अफ़साने,
हमसफ़र जो कल थे,
अब ठहरे वो बेगाने…
मोहब्बत आज प्यासी है,
बड़ी गहरी उदासी है…
नीला आसमाँ सो गया…

ती म्हणते, ‘आठवणीच्या दरीत घडून गेलेल्या कथांचे स्वर अजून घुमत आहेत. काल जे जन्मभराचे साथी होते ते किती परके होऊन गेलेत. मनातली प्रेमाची तहान मात्र अजून तशीच आहे. किती खोल गेलेली ही उदासी! आणि आकाश मात्र माझ्या दु:खाबाबत किती परके, ते किती शांतपणे निद्रिस्त झालेय!

या पाठोपाठ येणाऱ्या अमिताभ बच्चनच्या आवाजातल्या ओळी दोघांचे दु:ख अजून गडद करून टाकतात –
ओस बरसे, रात भीगे, होंठ थर्राएँ…
धड़कनें कुछ कहना चाहें, कह नहीं पाएँ…
हवाका गीत मद्धम है,
समयकी चाल भी कम है,
नीला आसमाँ सो गया…

रात्रीच्या या उशिराच्या प्रहरी दवबिंदू पडत आहेत, त्यात जी रात्र भिजते आहे, मनाला काहीतरी बोलायचे आहे, ओठ थरथरताहेत पण बोलता येत नाही. हळुवार झुळुका येतात पण काळ पुढे सरतच नाही. कसा हा विरहाचा काळ! आणि आकाश मात्र आमच्या दु:खाबाबत किती तटस्थ!

या प्रेमी युगुलाची ती गुप्त भेट त्याला एकीकडे कल्पांताचा आनंदही देते, तर दुसरीकडे कायमच्या दुराव्याची आठवणही देत राहते. तरीही सुखाचा तो दुर्मीळ क्षण त्याला साजरा करावासा वाटतो –
मेरी बाहोंमें शर्माते लजाते ऐसे तुम आए,
के जैसे बादलोंमें चाँद,
धीरे धीरे आ जाए…
ये तन्हाई ये मैं और तुम,
ज़मीं भी हो गई गुमसुम,
नीला आसमाँ सो गया…

तू कशी माझ्या मिठीत संकोचत लाजत आलीस, जसे आकाशात ढग तरंगत असतात आणि चंद्र अचानक त्यांच्यात गायब होतो तशी तू माझ्याजवळ आलीयेस. आताचा हा फक्त आपल्या दोघातला एकांत केवढा सुखदायक आहे. सगळा आसमंत अबोल आणि शांत आणि वर आकाशाची सुंदर निळी चादर पांघरलेली!

फारसे न गाजलेले हे गाणेही सिलसिलाची सगळी कथा, सगळा मूड कवेत घेणारे होते. ‘नॉस्टॅल्जिया’ म्हणजे असेच मागे जाणे, आठवणीत रमणेच तर असते, दुसरे काय!

Recent Posts

रेणुका माता छात्रावास, चिपळूण

सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…

1 hour ago

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

4 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

5 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

6 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

6 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

6 hours ago