दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
भारत देश हा अद्भूत लोकांचा देश आहे. साधू-संतांचा, विद्वानांचा, कलाकारांचा हा देश आहे. ‘लाथ मारू तिथे पाणी काढू’ अशी मानसिकता असलेल्या व्यक्तींचा देखील हा देश आहे. मेहनत-कष्ट करणाऱ्यांची कदर आपल्या देशात होते. कलाकारांना जातीधर्माच्या पलीकडे पाहिले जाते. प्रतिभा असणाऱ्या कलाकारास प्रोत्साहन दिले जाते. अशाच कलाकारांपैकी ती एक. भाजी विक्रेती ते आंतरराष्ट्रीय दर्जाची कोलाज कलाकार हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. ती कलाकार म्हणजे शकिला शेख.
१९७३ मध्ये जन्मलेल्या शकिला सहा भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिचे वडील कुटुंबाला सोडून बांगलादेशात निघून गेले, तेव्हा शकिला फक्त एक वर्षाची होती. तिने आपल्या पित्याला पुन्हा कधीच पाहिले नाही. तिची आई झहेरान बीबी मात्र कणखर स्वभावाची बाई होती. तिने बाप बनून आपल्या मुलांना वाढवलं. उदरनिर्वाहासाठी कोलकात्यात भाजीपाला विकला. अत्यंत पराकोटीची गरिबी शकिलाच्या कुटुंबाने अनुभवली. अनेकदा ते उपाशी पोटी झोपले. उत्पन्न फारच तुटपुंजे आणि खाणारी तोंडे जास्त अशी परिस्थिती होती.
शकिलाची आई मोग्राहाट येथील घरापासून कोलकातामध्ये भाजी विकण्यासाठी जात असे. हे अंतर जवळपास ४० किमी आहे. पोट भरण्याशिवाय बाकी कशाचाही विचार करायला तिला वेळ नव्हता. आर्थिक अडचणींमुळे शकिला आणि तिची भावंडे अभ्यास करू शकले नाही. शकिला सात वर्षांची असताना ती तिच्या आईसोबत भाजी मंडईत जाऊ लागली. शाकिलाची आई तिला काम करू देत नव्हती, पण तिला शहरात फिरायला घेऊन जायची. शकिलाला रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्राम आणि बसेस बघायला खूप आवडायचं. आई काम करत असताना चिमुरडी शकिला फुटपाथवरच झोपून जायची. अशाच एका प्रवासादरम्यान तिची एका माणसाशी भेट झाली ज्याने तिच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकला.
बलदेव राज पानेसर, निवृत्त सरकारी कर्मचारी आणि एक चित्रकार, ज्यांना ती प्रेमाने बाबा म्हणून हाक मारायची. पानेसर दररोज भाजी खरेदीसाठी बाजारात येत असत. ते लहान मुलांना चॉकलेट, अंडी, पेन्सिल आणि मासिके वाटायचे. लहान मुलं त्यांना प्रेमाने “डिमबाबू” (बंगालीमध्ये डिम म्हणजे अंडा) म्हणत आणि त्याच्या मागे फिरायचे. पानेसर यांची स्वतःची शैली होती. ते कुर्ता पायजामा घालत असत. खांद्याला शबनम कापडी पिशवी आणि दुखत असलेल्या गुडघ्यांना आधार देण्यासाठी छत्री बाळगत असत. शकिला त्यांना ८०च्या दशकाच्या सुरुवातीला बाजारात भेटली होती. पानेसर मुलांना चॉकलेट आणि अंडी वाटत होते. त्यांनी शकिलाला देखील अंडे आणि चॉकलेट दिले. पण शकिलाने ते घेण्यास नकार दिला. चिमुरड्या शकिलाचा तो बाणेदारपणा पाहून पानेसर प्रभावित झाले. त्यांनी तिचे नाव शाळेत दाखल करून घेतले. तिला अभ्यासाचे साहित्य पुरवले आणि तिच्या कुटुंबाची काळजी देखील घेऊ लागले.
“त्यांच्याशी झालेल्या भेटीने आमचे आयुष्य बदलून टाकले. त्यांनी मला केवळ शाळेतच प्रवेश दिला नाही, तर कुटुंबाला आर्थिक मदतही केली. सुरुवातीला, माझ्या आईला भीती वाटली आणि तिला वाटले की बाबा कदाचित तिच्या मुलीशी गैरव्यवहार करतील. पण नंतर त्यांच्या सचोटीबद्दल आईला खात्री पटली.” शकिला सांगते. शकिलाचं इयत्ता तिसरीपर्यंत कोलकात्यात शिक्षण झालं होतं. पानेसरांना वाटले की, मुलीसाठी दररोज शहरात जाणे सुरक्षित नाही. त्यांनी शकिलाचं मोग्राहाट गावात शिक्षण करायचं ठरवले. त्यांनी शकिलाच्या भावाला गावातील एका स्थानिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी ३०० रुपये दिले. पण तिच्या भावाने तिचं नाव शाळेत दाखल केलेच नाही. मात्र, तिने हे पानेसरांना सांगितले नाही. १९८७ मध्ये तिने अकबर शेख यांच्याशी लग्न केले, अकबर तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा होता आणि आधीच विवाहित होता.
अकबरने तिला सुरजापूर येथे आणले, जेथे हे जोडपे स्थायिक झाले. तो कोलकात्याला भाजी विकायला जायचा. पण त्याचे उत्पन्न त्याच्या दोन बायकांची काळजी घेण्यासाठी पुरेसे नव्हते. कौटुंबिक उत्पन्नाला हातभार म्हणून शकिला कागदी पिशव्या बनवण्याचे काम करायची. ती रोज २०-३० रुपये कमवत होती. १९८९ मध्ये, शकिला आणि अकबरला पानेसर यांनी कोलकाता येथील अकादमी ऑफ फाइन आर्ट्स येथे चित्रकला प्रदर्शनासाठी आमंत्रित केले होते.
ते दोघेही जाण्यास उत्साही नव्हते, कारण त्यांना कलेबद्दल काहीच माहिती नव्हती. पण पानेसरांमुळे जावे लागले. शकिलाने नुकतीच पेंटिंग्सकडे एक नजर टाकली. तिने बाबांना (पानेसरांना) सर्वात जास्त आवडलेली चार चित्रे सांगितली. असे दिसून आले की, ती समान चित्रे सर्वात लोकप्रिय आहेत. पानेसर खूप उत्साही आणि आनंदी होते की, त्यांच्या मानसकन्येचा कल कलेकडे आहे. त्या प्रदर्शनाने शकिलाच्या कलाकार बनण्याच्या स्वप्नांना जन्म दिला. घरी तिने वेगवेगळ्या आकाराचे कागद जोडण्यास सुरुवात केली आणि तिने देव, देवी आणि समकालीन कलेचे कोलाज बनवले.
अकबरने कोलाजांना कोलकात्याला नेले आणि पानेसरांना दाखवले. ते या कामाने इतके प्रभावित झाले की त्यांनी कोलाज बनवण्यासाठी फक्त आणखी वर्तमानपत्रे आणि मासिके दिली नाहीत, तर शकिलाचे काम प्रदर्शित करण्यासाठी एक प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णयही घेतला. १९९० मध्ये, शकिलाने कोलकाता येथे तिचे पहिले एकल प्रदर्शन भरवले. त्यातून तिने ७०,००० रुपये कमावले, ही त्या काळात मोठी रक्कम आणि निश्चितच तिच्या कुटुंबासाठी फार मोठा आधार होता. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिलेच नाही. ती आता तिच्या गावात साधारण पण आरामदायी घरात राहते आणि तिला तीन मुले आहेत. तिचा मुलगा बाप्पा शेख (२२) अधूनमधून कोलाजही करतो याचा तिला अभिमान आहे.
पानेसरने शकिलाची कोलकाता येथील CIMA (सेंटर ऑफ इंटरनॅशनल मॉडर्न आर्ट) आर्ट गॅलरीशी ओळख करून दिली जी आता तिचे काम सांभाळतात. तिचे कोलाज भारतात आणि परदेशात विकत आहे. आज तिचे कोलाज आर्ट फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये गेले आहेत. कलेसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल शकिला पानेसरांप्रति नेहमी कृतज्ञता व्यक्त करते. ती म्हणते, “मी खूप मेहनत आणि उत्कटतेने काम केले आहे, पण आज मी जे काही आहे त्यासाठी मी बाबांचे आभार मानते. माझ्या पतीने देखील मला आयुष्यभर साथ दिली आहे.” शकीलाला पश्चिम बंगालमधील नृत्य, संगीत आणि व्हिज्युअल आर्ट अकादमीचा चारुकला पुरस्कार आणि ललित कला अकादमीचा सत्कार यासह विविध सन्मान मिळाले आहेत. आयुष्यात काहीही अशक्य नाही याचा पुरावा म्हणजे शकिलाची जीवनगाथा आहे. आत्यंतिक गरिबी ते आज नावाजलेली कलाकार असा तिचा प्रवास म्हणजे एकप्रकारे कोलाजच आहे. कोलाज आर्ट या कलेतील शकिला शेख खऱ्या अर्थाने ‘लेडी बॉस’ आहे.
[email protected]