महाराष्ट्राची भूमी म्हणजे कलाकारांची, कलावंतांची खाणच आहे. अवघ्या जगात नावाजलेल्या चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हेही आपल्याच राज्याचे मानबिंदू आहेत. आपले राज्य जसे देशाचे आर्थिक शक्तिकेंद्र आहे, तसेच ते सांस्कृतिक शक्तिकेंद्रही आहे. अशा सांस्कृतिक, कलात्मकदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या या महान सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यात सर्वात मोठा वाटा हा विविध क्षेत्रातील कलावंतांचा आहे. यातील एक कलाशिरेमणी आणि अष्टपैलू हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने लागू होतो ते नाव म्हणजे अभिनय सम्राट अशोक सराफ. मराठी म्हणू नका, हिंदी म्हणून नका. अगदी भोजपुरी सिनेमांनाही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: सजवले. कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन हसू, कधी आशयघन अभिनयाने डोळ्यांत टचकन पाणी आणणारे, तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे असे अशोक सराफ यांनी माध्यमांचे जवळपास सर्वच प्लॅटफॉर्म भारावून टाकले. त्यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले. काही चित्रपटांत नायक, कधी सहनायक तर कधी खलनायक अशा नानाविध भूमिकांची तोरणे त्यांनी मनोरंजन विश्वावर बांधली. महत्त्वाचे म्हणजे, फक्त अभिनयच नाही तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये गाणीही गाऊन त्यांनी प्रेक्षकांना सूरमयी अनुभव दिला आहे. आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटांचा पडदा, नाटकांचे व्यासपीठ, टीव्हीचे स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेला सुवर्णझळाळी बहाल करणाऱ्या अशोक सराफ यांना गुरुवारी एका बहारदार सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट सुरूच ठेवला होता. या आभाळभर कौतुकाने अशोक सराफ हे खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात दादा कोंडके यांच्या सोबतचा ‘पांडु हवालदार’ हा सिनेमा प्रचंड गाजला. त्यातील अशोक सराफ यांच्या खाटकाच्या भूमिकेने उभ्या महाराष्ट्रला वेड लावले आणि यापुढेही ते कायम राहिले.
आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच, नवरी मिळे नवऱ्याला, अशी ही बनवाबनवी आणि गंमत जंमत आदी मराठी चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी काम केले. तसेच त्यांनी हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग आणि व्हॅक्यूम क्लीनर यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘दामाद’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘करण अर्जुन’ आणि ‘जोडी नं १’ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरून हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमिनीशी असलेले घट्ट नाते त्यांनी तोडले नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत.
गेली सलग ५० वर्षे नानाविध असंख्य भूमिका जिवंत करूनही त्यांच्यात अभिनयाची आणि नवे काही तरी करून दाखविण्याची भूक अजूनही कायम आहे. योगायोगाची बाब म्हणजे आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे व अशा महत्त्वाच्या टप्प्यात अशोक सराफ हे सुद्धा वयाचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत आणि असा हा सर्वत्र अमृत काळ सुरू असतानाच राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. त्यामुळेच हा अवघ्या महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड असा क्षण आहे असे म्हणायला हवे. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमिनीशी नाते तोडलेले नाही. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश वाडकर यांना मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगितिक कारकीर्द उभी केली. मराठी आणि हिंदीच नव्हे तर अन्य विविध भाषांतील त्यांची गाणीही विशेष गाजली आहेत. वाडकर यांचा धीर – गंभीर व तितकाच सुरेल आवाज आजही सर्वांना मंत्रमुग्ध करतो.
खरं म्हणजे हा दिवस सगळ्यांसाठीच एक आनंदाचा दिवस ठरला. कारण एकाच दिवशी, एकाच व्यासपीठावर अनेक दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढण्यात आला. आज आपले कलाविश्व समृद्ध करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्षे योगदान देत रसिकांची आणि कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. चित्रपटसृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृद्ध करणारी ही मंडळी आहेत. यावेळी २०२० सालासाठीचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांना, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री हेलन असा तिघांना प्रदान करण्यात आला. तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा असा तिघांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आला. सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रवींद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्या लोकांनी आपले सर्वांचे जीवन आनंदमय केले, अशा अस्सल हिऱ्यांचा यथोचित आणि योग्यवेळी सन्मान करून महायुती सरकारने खूपच चांगला पायंडा पाडला आहे.