पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात
मेहसाणा : काँग्रेसचे नेते नकारात्मकतेच्या भावनेत जगत आहेत. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर बांधले गेले आहे, तरीदेखील त्यांचे नेते द्वेषाचा मार्ग सोडण्यास तयार नाहीत. हे तेच लोक आहेत, ज्यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता आणि मंदिराच्या उभारणीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या प्रवृत्तीवर घणाघाती हल्ला चढविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील तारभ येथील वलीनाथ महादेव मंदिराचे उद्घाटन केले. महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात जनतेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देवाचे आणि देशाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. यावेळी राम मंदिराचा उल्लेख करत पंतप्रधानांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचा उल्लेख करत म्हणाले की, आता भगवान श्रीरामाच्या जन्मभूमीत भव्य मंदिर बांधले गेले आहे. यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे. तरीदेखील हे लोक नकारात्मकता आणि द्वेषाचा मार्ग सोडत नाहीत. एकीकडे देशात मंदिरे बांधली जात आहेत तर दुसरीकडे गरिबांसाठी लाखो घरेही बांधली जात आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच, त्यांनी यावेळी ८,३५० कोटींहून अधिकच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारतात स्वातंत्र्यानंतर विकास आणि वारसा यांच्यात संघर्ष निर्माण झाला. भारताच्या विकासाच्या प्रवासातील हा एक अद्भुत काळ आहे. हा असा काळ आहे की देवाचे काम असो की देशाचे काम असो, दोन्ही कामे वेगाने होत आहेत. देवाची सेवाही केली जाते आणि देशसेवाही केली जाते.
विरोधकांचा राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार
गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्याला हजारो लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. यात विरोधी पक्षांचाही समावेश होता. पण, राम मंदिर सोहळा भाजपचा कार्यक्रम असल्याची टीका करत विरोधकांनी या सोहळ्यात न जाण्याचा निर्णय घेतला.
मंदिरे ही संस्कृती व परंपरेचे प्रतिक
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ‘आमची मंदिरे ही केवळ मंदिरे किंवा प्रार्थनास्थळे नाहीत, तर ती हजारो वर्षे जुन्या संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहेत. आपल्या देशात मंदिरे हे देश आणि समाजाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचे माध्यम राहिले आहे. आज देश सबका साथ, सबका विकास या मंत्रावर चालत आहे. ही भावना आपल्या देशात कशी रुजली आहे, हे आपण वलीनाथ धाममध्येही पाहू शकतो. समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या देशवासियांचेही जीवन बदलणे हा मोदींच्या हमीमागचा उद्देश आहे.