मुंबई: दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी २०२४मध्ये अयोध्येत श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाली. तेव्हापासून अयोध्येत भक्तांची दरदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत एक महिन्यात तब्बल ५५ ते ६० लोकांनी अयोध्येत राम मंदिराला भेट दिली.तसेच राम मंदिरात श्रीरामांच्या चरणी कोट्यावधीचे दान करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार तब्बल इतक्या दिवसांमध्ये साधारण २५ कोटींचे दान श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात आले. या धनराशीमध्ये राम भक्तांनी चेक, ड्राफ्ट आणि रकमेचा समावेश आहे. तर दागिने आणि रत्नांबाबत बोलायचे झाल्यास मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दान या ठिकाणी करण्यात आले आहे.
सोन्या, चांदीपासून बनवलेले मुकूट ते हार, छत्र, रथ, बांगडी, खेळणी, पैंजण, दीपक तसेच अगरबत्ती स्टँड, धनुषबाण, विविध प्रकारची भांडीसह अनेक साहित्य आले आहे. चांदीचबाबत बोलायचे झाल्यास २५ किलोहून अधिक चांदी आतापर्यंत भक्तांनी दान केली आहे. तर सोन्याबाबत बोलायचे झाल्यास अद्याप ठोस वजन समजलेले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार साधारण १० किलो सोने अर्पण केले असल्याचे बोलले जात आहे.
६० लाख भक्तांनी केले राम मंदिराचे दर्शन
श्री रामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आतापर्यंत महिन्याभरात जवळपास ६० लाखाहून अधिक लोकांनी दर्शन घेतले. ही संख्या वाढतच आहे.