Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीGanesh Chandanshive : देश-विदेशात लोककला पोहोचवणारे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

Ganesh Chandanshive : देश-विदेशात लोककला पोहोचवणारे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

खडतर परिस्थितीवर मात करून देश-विदेशात लोककला पोहोचविण्याचे काम मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे अविरतपणे करत आहेत. त्यांनी आपल्या जीवनप्रवासाबद्दल प्रहार आयोजित ‘गजाली’ कार्यक्रमात प्रहार टीमसोबत संवाद साधला. यावेळी प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

लोककलेचा आवाज सातासमुद्रापार

तेजस वाघमारे

वडील फिजिकल टीचर होते. कडक शिस्तीचे. त्या संस्कारामध्ये मी वाढलो. सुदैवाने आई पाहण्यास मिळाली नाही. दहावीला असताना वडील सुद्धा गेले. जगण्याचा संघर्ष तिथून सुरू झाला. आता काय करायचे हा प्रश्न सतावू लागला. मी एका ग्रामीण रुग्णालयात स्वीपरचे काम करण्यास गेलो. सर्व मेडिकल ऑफिसरांना माझ्यात वेगळेपण दिसले. त्यांनी मला पुढील शिक्षणासाठी जाफराबादमधील सिद्धार्थ महाविद्यालयात बारावीनंतर प्रवेश घेऊन दिला. बस प्रवासासाठी ते दर महिन्याला ४० रुपये देत असत. काॅलेजमध्ये मला चांगले गुरू लाभले. हाॅस्पिटलचे काम सकाळी सातपर्यंत पूर्ण करून ७.३० वाजता कॉलेजला पोहोचायचो. १२ वाजेपर्यंत कॉलेज करायचो. तिथल्या शिक्षकांमध्येही मी रमलो. दिवाळी आली की, मुंबईत येऊन नाक्यावर काम करायचो. बिगाऱ्याची कामे करत होतो. पुन्हा गावी जाऊन एक महिना पूर्ण वेळ तमाशात काम करायचो. गाणे वडिलोपार्जित माझ्याकडे आले आहे. कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. मी लहान असल्याने माझ्या आवाजाला मुलीच्या आवाजाचा किनारा होता. त्यामुळे लावणी मलाच गायला लावायचे. मी वेगवेगळ्या लावण्या गायलो. बैठकीची, छक्कड, चौकाची, शृंगारिक, भेदीक लावणी, कटाव, शिलकाव कुठला, हे ज्ञान तिथे मला प्रॅक्टिकली मिळाले. ही गाणी घेऊन मी युथ फेस्टिव्हल करण्यास सुरुवात केली. घरातच वडिलोपार्जित तमाशा होता. माझे वडील नाच्याचे काम करायचे. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची चळवळ सुरू झाली.

तेव्हा माझे चुलते माझ्या वडिलांना म्हणाले की, डोळ्यांत काजळ घालून नाचण्यात आपल्या सात पिढ्या बरबाद झाल्या. तेव्हा आमच्या वडिलांनी तमाशात काम करणे बंद केले. आम्ही ३५ चुलत भाऊ आहोत. सगळे चांगल्या मोठमोठ्या पदांवर आहेत. तरीही शिमग्याला तमाशा करतो. पण आज आई-वडील नाहीत ही खंत आहे. वडिलांमध्ये मानवतावादी धर्म होता. त्यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. आज आई-वडील असते तर माझ्यासोबत विमानातून फिरले असते, एसी गाडीतून फिरले असते.

आताची लावणी बिभिस्तपणे सादर केली जाते. ते आयटम साँग करतात. डोईवरचा पदर ढळू न देता यापूर्वी लावणी सादर होत असे. गायिका सुलोचना चव्हाण यांचे चिरंजीव विजय चव्हाण यांना झाकीर हुसेन यांचे भाऊ तैफिक भाई यांनी फॉरेस्ट अल्बमसाठी मराठी फोक गाणारा व्यक्ती पाहण्यात आहे का? अशी विचारणा केली. त्यांनी माझे नाव सुचवले. त्याप्रमाणे महालक्ष्मी येथील स्टुडिओमध्ये पोहोचलो. रिसेप्शनिस्टने मला ओळखले नाही. तैफिक भाई दर पाच मिनिटांनी मी आलोय का हे विचारत होते. ते रिसेप्शनिस्टवर चिडले हाेते. मला फोन लावण्यास सांगत होते, पण माझ्याकडे फोन नव्हता. त्यांना मीच चंदनशिवे असल्याचे सांगितले. ते मला म्हणाले, तुम्ही रिसेप्शनिस्टला सांगायचे होते आलोय म्हणून,मी स्टुडिओत गेलो.मी आयुष्यात कधीही रेकॉर्डिंगसाठी गेलो नव्हतो. पण गाणे लहानपणापासूनच माझ्या कंठात आहे.

मी त्यांना नम्रपणे सांगितले की, मी असे कधी गायलो नाही. पण त्यांनी गाण्याची विनंती केली. मी गेलो आणि तो आल्बम इतका हिट झाला की, आताही आपण परदेशात जाण्यासाठी विमानात बसलो तर ‘द फॉरेस्ट’ नावाचा आल्बम लागतो. त्याच्यावर परदेशात ‘योगा’ करतात. या आल्बमच्या पार्टीमध्ये जॉकी श्रॉफ आले होते. ते म्हणाले, मेरे गाव का ये बंदा है, म्हणत मला गाणे गाण्यास सांगितले. रणजित बरोठ हे शैताण नावाचा चित्रपट करत होते, त्यासाठी दहीहंडीचे गाणे केले. या चित्रपटाने माझी हिंदी चित्रपटात इन्ट्री झाली. मग शंकर महादेवन यांची ओळख झाली. त्यांच्याबरोबर लाइफ टाइम बॉण्ड केला आहे. आम्ही ‘माय कंट्री माय म्युझिक’ हा कॅन्सर्ट करतो.

आतापर्यंत सिंगापूर, मॉरिशस, मस्कत, दुबई, यूके अशा बऱ्याच ठिकाणी बरेच कॅन्सर्ट केले आहेत. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी चित्रपटासाठी १०० लोकांकडून गीत गाऊन घेतले होते. तरी त्यांचे समाधान होत नव्हते. माझा १०० वा नंबर आला. या चित्रपटाच्या प्रेसेसवर आम्ही तीन वर्षे काम करत होतो. एक दिवस त्यांच्या ऑफिसमध्ये दीपिका पदुकोण बसल्या होत्या. भन्साळी यांनी मला विचारले की, दीपिका आपको कैसी दिखती है. मी ‘अच्छे दिखते है’ म्हणालो. ते म्हणाले, आताच्या आता मला हिच्यावर काही तरी लिहून द्या. तिथेच ‘नवतुनी आली अप्सरा… अशी सुंदरा… हे बोल लिहिले आणि गायलेही. ते बाजीराव मस्तानीमधले गाणे खूपच हिट झाले.

लोककलेशी नाळ जुळवणारे : प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

वैष्णवी भोगले

करिअर म्हटले की, इंजिनीयर, डॉक्टर, हॉटेल मॅनेजमेंट, स्पर्धा परीक्षा अशा काही बोटांवर मोजण्याइतक्याच संधी आपल्याला माहीत असतात. पण सध्या करिअरच्या कक्षा चांगल्याच रुंदावल्या आहेत. लोककला हा करिअरचा मार्ग असू शकतो. हे आपल्याकडे स्वीकारणे थोडे जड जाते. म्हणून जेव्हा मुले कलेजमध्ये करिअर करू पाहतात, तेव्हा त्यांना प्रचंड विरोध होतो. त्यातही कला म्हणजे अभिनय असाही अनेकांचा भ्रम आहे. पण त्यापलीकडे जाऊन कला शाखेमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये कलांचे शास्त्रोक्त शिक्षण आज दिले जात आहे आणि त्यात रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध आहेत. अशीच एक करिअरची संधी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. ज्याबद्दल अनेकांना माहीत नसेल. ती संधी म्हणजे आपल्याच ‘महाराष्ट्राची लोककला’. मुंबई विद्यापीठातील लोककला विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांमध्ये लोककलेची नाळ जुळविण्याचा विडा उचलला आहे.

महाराष्ट्राची लोकलला म्हणजेच लावणी, पोवाडा, भारूड, तमाशा, गोंधळ, दशावतार अशा आजवर दुर्लक्षित राहिलेल्या कला लोककलेच्या माध्यमातून तरुण मुलांना करिअरची एक नवी संधी मिळत आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत एक खास अभ्यासक्रम चालवला जातो, तो म्हणजे ‘महाराष्ट्रातील लोककला’ या विषयावर ‘पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम’(Diploma In Folk Art of Maharashtra). या अभ्यासक्रमात वादन, नृत्य, लेखन, नाट्य, सादरीकरण यांचे प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकांसोबतच महाराष्ट्रातल्या विविध भागांतून कसलेले लोककलावंत येतात आणि प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना लोककलेचे धडे देतात. यामुळे आता कोकणातला दशावतार मराठवाड्यातला कलाकार सादर करू शकतो. एकूणच या शिक्षणामुळे लोककलेची देवाण-घेवाण होण्यास मदत झाली आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढीत विद्यार्थिंनी देखील ढोलकी वाजवू लागल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने जागरण-गोंधळ, लावणी, तमाशा, भारूड, दशावतार, पोवाडा या लोककला शिकवल्या जातात. या कलांची पार्श्वभूमी, त्यातील समज-गैरसमज, तात्त्विक मांडणी आणि सादरीकरण याचे सर्वांगीण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. वादन प्रकारात ढोलकी, दिमडी, संबळ, पखवाज आदी तालवाद्ये इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवली जातात; तर नृत्यामध्ये मुरळी नृत्य, गोंधळ्यांची करपल्लवी, लावणीनृत्य, मुजरानृत्य, दशावतारी नृत्य आदी नृत्य प्रकार आणि गायनामध्ये एकूणच लोककलेतील गायकी, गायन पद्धती शिकवली जाते. एका वर्षांमध्ये विद्यार्थी जे कला प्रकार शिकले, त्यावर आधारित एक वार्षिक संमेलनही घेण्यात येते.

या अभ्यासक्रमानंतर इथे शिकलेले विद्यार्थी ‘पेट’ परीक्षा देऊन पीएच. डी. देखील करू शकतात. तसेच एखाद्या कलेत प्रावीण्य मिळवून त्याचे प्रशिक्षक होऊ शकतात. याशिवाय आपली स्वतःची शैली विकसित करून लोककलेच्या सादरीकरणातून अर्थार्जन करू शकतात. लोककला अकादमीत २००६ पासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे लोकनाट्यातील अभिनयाचे मार्गदर्शन करीत आहेत. ज्यांना आपल्या संस्कृतीशी नाळ जुळवायला आवडतेय, नव्या क्षितिजाला गवसणी घालायला मन तत्पर आहे आणि आपल्या करिअरच्या कळीला बहरण्यासाठी योग्य दिशा द्यायची असेल, तर ‘लोककला अकादमी’ ही एक पर्वणीच आहे. चंदनशिवे वगळता सर्व प्राध्यापक, कर्मचारी कंत्राटी आहेत. त्यांना अत्यल्प मानधन मिळते, या विभागाला राजाश्रय मिळावा यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र अजून अनुदान नाही. ही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

‘बिलोरी’ मुसाफीर

रूपाली केळस्कर

मराठवाड्यातून एक तरुण भाकरीचा चंद्र शोधायला निघाला अन् आव्हानांचे डोंगर पार करत मुंबईत पोहोचला. अखेर इथे त्याला ‘चंद्र’ सापडला. तो भाग्यवान तरुण म्हणजे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे. ते मुंबई विद्यापीठात आज लोककला अकादमीत विभाग प्रमुखपदी विराजमान आहेत. प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे म्हणजे ‘बिलोरी’ व्यक्तिमत्त्व. ‘बिलोरी’ म्हणजे एक प्रकारची उंची, जी स्फटिकासारखी असते. त्यातून प्रकाश आरपार गेला तर सप्तरंग पसरतात. त्या रंगांची पखरण अवघा आसमंत उजळून टाकते.

सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत स्पष्ट आणि परखड आहे. त्यातून एक शिघ्र कवी, गीतकार आणि पहाडी आवाजातला गायक, प्रतिभावंत डोकावतो. त्यांचे गाणे रोमांचित करणारे आणि जगणे अत्यंत रोमहर्षक. एक कुटुंबवत्सल आणि सहृय बाप माणूस ही त्यांची एक वेगळी ओळख. त्यांना लोककलेवर प्रेम करणारा आणि तिला जगविण्यासाठी झटणारा एक मुसाफीर म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. लोककलेचे प्रकार, तिचा इतिहास, नृत्याचे प्रकार, गाण्याचे प्रकार, बदलणारे शब्द, भाषेचा लहेजा आणि तिची जन्मभूमी या सगळ्यांचा ठेवा त्यांनी जपून ठेवला आहे, त्यांच्या संशोधनातून, शोधनिबंधातून आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून. चित्रपटसृष्टीतले दिग्गज आणि मोठे गायक, नर्तक, लेखक, गीतकारांचा त्यांना सहवास लाभला असून, त्यातूनच त्यांचे जगणे समृद्ध होत गेले. त्यांच्या पहाडी आवाजाची भुरळ चित्रपटसृष्टीला पडली आणि अप्सरा देखील त्यांच्या गाण्यावर दिवानी होऊन थिरकू लागली. डफावर एका रांगड्या हाताची थाप पडताच, ढोलकीने कडकडून उठावे आणि रसिकांचे काळीज चिरून नवरसात चिंब भिजावे इतकी महाराष्ट्राची लोककला अलौकिक अन् तृप्त करणारी. शृंगार, हास्य, रौद्र, करुण, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत अशा नवसात रसात न्हाऊन-माखून श्रोत्यांना अपार आनंद देणारी ही संस्कृती जपण्याचे काम कोणी तरी करायलाच हवे होते. ते काम मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ. गणेश चंदनशिवे करत आहेत. आपल्याच मायभूमीत गावंढळ म्हणून हेटाळणी होणारी हीच लोककला आता सातासमुदापार गेली असून, परदेशात तिच्यावर संशोधन सुरू आहे. अगदी आॅक्सफर्ड विद्यापीठही त्याला अपवाद नाही.

आज मुंबई विद्यापीठातून लोककला विभागातून याचे धडे गिरवले जात आहेत. पूर्वीपासूनच तबला, पेटी म्हणजे हर्मोनियमला एसीच्या हवेत बसायला मिळायचे. आता मात्र लाल-काळ्या मातीत, उघड्या माळरानावर, वड-बाभळीच्या सावलीत, वाऱ्याच्या झुळकीवर कडाडणारी ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज, सारंगी, तंबुरी अन् घुंगरूही या निमित्ताने एसीमध्ये बसू लागले आहेत, हा काळाचा महिमा म्हणावा लागेल. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान, दशावतार म्हणजे कोकणची मेजवानी, जागरण-गोंधळ म्हणजे कुलदैवतांची भक्ती हा वारसा टिकवून ठेवणे गरजेचे होते. लोककलेच्या उपासकांनी दिलेली ही ललकारी दाही दिशा उजळून टाकेल यात शंकाच नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -