पुणे : राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक करुन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी राज्यभिषेक केला; परंतु राजा म्हणून एकही दिवस विश्रांती घेतली नाही. त्यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जो पर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार या भारत भूमीत होतच राहील. माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या मूलमंत्राचे रोपण केले. समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करून, त्यामधील पुरुषत्व जागृत केले. मुगलासारख्या बलाढ्य शत्रूचा नि:पात केला. शिवरायांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली, असेही त्यांनी सांगितले.