Saturday, July 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘जादूनगरीसे आया हैं कोई जादूगर!’

‘जादूनगरीसे आया हैं कोई जादूगर!’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

चित्रपटसृष्टीत वहिदा रहमानचे पदार्पण झाले १९५६ साली. तिचा पहिला सिनेमा राज खोसलांचा सी.आय.डी.! यात तिने गुन्हेगारी टोळीची सदस्य असलेल्या कामिनीची भूमिका केली होती. ‘सी.आय.डी.’ ही नावाप्रमाणेच एक रहस्यकथा होती. सी.आय.डी.च्या त्या टीममधले इतर सदस्य होते देव आनंद, शकिला, के. एन. सिंग, कुमकुम, मेहमूद, जॉनी वॉकर, टूनटून, शाम कपूर आणि शीला वाझ. राज खोसला प्रसिद्ध होते ते ‘अभिनेत्रींचे दिग्दर्शक’ म्हणूनच! त्यांच्या ‘वह कौन थी’मुळे साधनाला तिची ‘मिस्टरी गर्ल’ ही प्रतिमा मिळाली, ‘दो बदन’मुळे आशा पारेख नामांकित अभिनेत्री बनली, सिमी गरेवालला फिल्मफेयर मिळाले, तर १९७८ साली ‘मै तुलसी तेरे आंगनकी’मधील भूमिकेमुळे नूतन सर्वोत्तम अभिनेत्री ठरली होती!

सी.आय.डी.ची कथा अशी होती – मुंबईतील ‘बॉम्बे टाइम्स’ या वृत्तपत्राचा संपादक श्रीवास्तव, ‘धरमदास’ नावाच्या (बीर सखुजा) श्रीमंत व्यक्तीचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध उघडकीस आणणार असतो. त्याला आलेल्या धमक्यांबाबत तो सी.आय.डी. इन्स्पेक्टर शेखरशी (देव आनंद) बोलतो आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला होतो! शेखर घटनास्थळी पोहोचेपर्यंत श्रीवास्तवचा मृत्यू होतो. गुन्ह्याचा तपास करताना उलट शेखरवरच त्या खुनाबरोबर आणखी एका खुनाचा आरोप येतो. अटक टाळण्यासाठी त्याला नोकरीवरून पळून जावे लागते. दरम्यान या तपासातच शेखरचा संबंध पोलीस प्रमुखाची (के. एन. सिंग) मुलगी असलेल्या रेखाशी (शकिला) येतो आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे अनेक नाट्यमय घटना घडून गुन्हेगार सापडतात आणि रेखा व शेखरचे प्रेम यशस्वी होते, असे कथानक होते! सिनेमा हिट झाला. तो १९५६ सालचा सर्वात जास्त उत्पन्न मिळवणारा सिनेमा ठरला! खूश होऊन गुरुदत्तने राज खोसलांना एक परदेशी गाडी भेट दिली! सी.आय.डी.तील एक गाणे चौपाटीवर चित्रित झाले होते. त्यात शीला वाझ इतकी सुंदर नाचली की, तिच्यावरून क्षणभरही नजर हटत नाही. देव आनंद किंवा शकिलाकडेही लक्ष जात नाही. संगीतकार ओमप्रसाद नैयर यांनी गाण्यात हार्मोनियमचा सुंदर वापर केला होता. रस्त्यावर गाणी म्हणून, नाच करून, पोट भरणाऱ्या जोडीच्या भूमिकेत शाम कपूर यांनीही हार्मोनियम वाजविण्याचा उत्तम अभिनय केला. मजरूह सुलतानपुरींच्या त्या लोकप्रिय गाण्याचे शब्द होते –
‘लेके पहला पहला प्यार,
भरके आँखोंमे खुमार,
जादू नगरीसे आया हैं,
कोई जादूगर…’

देव आनंद आणि शकिलाच्या दरम्यान सुरू होणाऱ्या प्रेमाची कथा हे गाणे फक्त सूचित करत होते. देव आनंद शकिलाचा पाठलाग करतोय, त्या दोघांच्या पाठोपाठ हे दोघे नाचत-गात जाताहेत असे दृश्य होते. शकिला आणि देव आनंदाचे प्रेम आहेच असे गृहीत धरून शीला गात असते. शकिलाच्या घनदाट केसांना ती ‘जुल्फोकी बदली’ म्हणजे केशकलापाचा मेघ म्हणते. शकिलाच्या संकोचामुळे शीलाची धिटाई इतकी वाढते की ती चक्क शकिलाचे केस बाजूला
करून म्हणते –
मुखड़ेपे डाले हुए,
ज़ुल्फोकी बदली,
चली बलखाती कहाँ?
रुक जा, ओ पगली!

या नव्यानेच प्रेमात पडलेल्या जोडीने आपल्याला चांगली बिदागी द्यावी म्हणून ती देव आनंदची स्तुतीही करते. शकिलाला तिचे सांगणे आहे, ‘तुझा प्रेमी जादूगार आहे आणि तो तुझ्या दारात हजारो स्वप्न घेऊन आला आहे.’
नैनोवाली तेरे द्वार,
लेके सपने हज़ार…
जादू नगरीसे आया हैं,
कोई जादूगर…

हा जादूगार खूप किमयागार आहे, त्याच्यापासून वाचणे तुला अवघडच दिसते. इतर कुणी कितीही प्रभावी असो, हा जादूगार सर्वांच्या
वरचढ आहे-
चाहे कोई चमके,
जी चाहे कोई बरसे,
बचाना है मुश्कील,
पिया जादूगरसे…
‘हा जादूगार काहीतरी मंत्र फेकेल आणि तुला जिंकून घेईल,’ असा इशाराही शीला
शकिलाला देते –
देगा ऐसा मंतर मार,
आखिर होगी तेरी हार…
जादू नगरीसे आया हैं,
कोई जादूगर…

मग ती देव आनंदाला संबोधित करते आणि म्हणते, ‘तुझे बोलणे, तुझी आर्जवे ऐकून बघ तुझ्या प्रियेच्या चेहऱ्यावर कसे हसू विलसू लागले आहे ते –
सुन सुन बातें तेरी,
गोरी मुस्काई रे!
आई, आई देखो, देखो,
आई हँसी, आयी रे…

‘आधी ती रागावली होती. आता तुझ्या आर्जवांमुळे तिच्या चेहऱ्यावर नुसती फुले उमलत आहेत. तिच्या रागाचे रूपांतर प्रेमात होतेय कारण तू तर जादूनगरीहून आलेला जादूगारच आहेस ना!
खेले होठोंपे बहार,
निकला गुस्सेसे भी प्यार,
जादू नगरीसे आया हैं,
कोई जादूगर…

गाण्यात शीला पुन्हा शकिलाकडे वळते आणि तिचेच मनोगत सांगू लागते – ‘माझ्या नकळत मी कधी त्याच्याकडे ओढले गेले बाई, तो तर निघून गेला आणि मी मात्र स्वत:ला हरवून बसले. त्याची नजरानजर झाली तेव्हापासूनच मन कसे बैचेन झाले आहे.
उसकी दीवानी हाय,
कहुं कैसे हो गई…
जादूगर चला गया,
मैं तो यहाँ खो गई…
नैना जैसे हुए चार,
गया दिलका क़रार…
जादू नगरीसे आया हैं,
कोई जादूगर…

शकिला आकाशातल्या चांदण्यांना विनवते, ‘तुम्हाला तर तो उंचावरून नक्की दिसला असेल ना, मग तुम्हीही त्याला बोलवा! माझे मन त्याच्या प्रेमाला शोधते आहे –
तुमने तो देखा होगा,
उसको सितारों…
आओ, ज़रा मेरे संग,
मिलके पुकारो…
दोनों होके बेक़रार,
ढूंढे तुझको मेरा प्यार,
जादू नगरीसे आया,
है कोई जादूगर…

त्याचे प्रेम मनात इतके खोल उतरलेय की मला सगळीकडे तोच दिसतोय. जणू मी त्याच्या प्रेमाचे काजळच डोळ्यांत घातले आहे. पण त्यामुळे त्याच्या विरहाची रात्र किती बैचेनीची होऊन बसलीये! माझ्या कपाळावरची बिंदी आणि मी मनोमन केलेले सोळा शृंगार त्याचीच वाट पाहताहेत! त्याला बोलवा गं, चांदण्यानो!
जबसे लगाया तेरे,
प्यारका काजल…
काली काली बिरहाकी,
रतिया हैं बेकल,
आजा मनके सिंगार,
करे बिन्दिया पुकार,
जादूनगरीसे आया हैं,
कोई जादूगर…

प्रियकराला ‘जादूगार’ म्हणण्याची रित तशी जुनीच! लहानपणी शाळेत जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम असायचा तेव्हा आपल्यालाही जादूगार इतक्या अशक्य गोष्टी कशा काय करतो, याचे कोण आश्चर्य वाटायचे! पण अलीकडे तो अद्भुतरम्य मनोरंजनाचा प्रकार मागेच पडलेला आहे कारण कसलेही आश्चर्य वाटण्यासाठी, कसलाही निर्मळ आनंद घेण्यासाठी आधी मन नितळ, निरागस, पारदर्शी असावे लागते. तंत्रज्ञानाच्या बेफाट वापरामुळे हल्ली तर लहान मुलांनाही कसलेच आश्चर्य वाटेनासे झाले आहे. मोठ्यांनाही कसली अपूर्वाई राहिलेली नाही, अगदी प्रेमाच्या सफलतेचीही! मग कोणत्या जादूनगरीहून कोणता जादूगार येणार आणि कोणती जादू दाखवणार?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -