Thursday, November 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमेलेल्या कुत्र्याची गोष्ट

मेलेल्या कुत्र्याची गोष्ट

संवाद: गुरुनाथ तेंडुलकर

साधारण एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास कोकणात घडलेली एक सत्यघटना…!
एका रासायनिक कंपनीतर्फे नवीन रसायनाच्या उत्पादनाचा कारखाना कोकणात सुरू करण्याची योजना आखण्यात येत होती. त्या कारखान्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्या कंपनीच्या मुंबईतील हेड ऑफिसचे बडे बडे अधिकारी तसेच त्या कंपनीबरोबर टेक्निकल कोलॅबरेशन करणाऱ्या परदेशी कंपनीचे काही प्रतिनिधी आणि काही परदेशी गुंतवणूकदार पाहुणे कोकणात गेले होते. जिथं तो कारखाना सुरू करण्यात येणार होता, ती जागा म्हणजे थोडसं सुधारलेलं खेडेगावच होतं. एका रिकाम्या बंगल्यावर सर्व मंडळींची राहण्याची सोय करण्यात आली होती. तिथे फाइव्ह स्टार हॉटेल वगैरे सोडाच. पण साध स्वच्छ उपाहारगृहसुद्धा नव्हतं. तेव्हा जेवणासाठी ज्या एक दोन साध्या खानावळी होत्या, त्यातलंच जेवण त्या पाहुण्यांना जेवावं लागणार होतं. मुंबईसारख्या शहरात राहणारे, बंद बाटलीतलं पाणी पिणारे बडे अधिकारी आणि त्यांच्याबरोबर जोडीला परदेशी पाहुणे… आणि ही खानावळ…?

खानावळ तर अगदीच कळकट होती. शेणानं सारवलेल्या जमिनीवर पडलले भाज्यांचे ढीग. भाजी चिरायला जुनी, गंजलेली विळी, पत्र्याच्या उघड्या पिंपात साठवलेलं पाणी. गोणीत ठेवलेलं धान्य, पीठ वगैरे, ॲल्युमिनिअमची कळकट भांडी. पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या प्लेट्स आणि या सगळ्या कळकटपणाला साजेसा मळकट आचारी. काळा कुरूप, दाढीचे खुंट वाढलेला. या माणसाच्या हातचं जेवायचं या कल्पनेनंही अनेकांना शिसारी आली होती, पण… पण संध्याकाळ उलटून गेली होती आणि रात्रीच्या जेवणाची दुसरी काहीच सोय होण्यासारखी नव्हती. शेवटी नाईलाजानं सगळ्यांनी त्याच खानावळीतून जेवण मागवण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळानं जेवण आलं.

जेवणातले दिसायला तरी सगळे पदार्थ सुंदर दिसत होते. मसाल्याचा खमंग वासही सुटला होता. शिवाय सगळ्यांना भूकही लागली होती. पण प्रत्यक्षात मात्र ती खानावळ आणि तो आचारी पाहिल्यामुळे कुणालाच जेवण्याचा धीर होईना.
तिथल्या एका जरा शहाण्या माणसाने युक्ती केली. त्या बंगल्याजवळ एक कुत्रा घुटमळत होता. आणलेल्या अन्नापैकी प्रत्येक पदार्थाचा काही भाग आधी त्या कुत्र्याला खायला घातला आणि थोडा वेळ थांबून तो कुत्रा व्यवस्थित असल्याची खात्री करून तासाभरानंतर हे सगळेजण जेवले.

जेवण मात्र खरोखरीच चवदार होतं. सगळेजण मिटक्या मारीत जेवले. सगळं अन्न अगदी चाटून पुसून संपवलं. पुन्हा दुसरे दिवशी दुपारी त्याच खानावळीतून जेवण मागवलं, तेव्हा सगळ्याजणांनी कालच्या त्या कुत्र्याला पुन्हा शोधायला सुरुवात केली. पण तो कुत्रा कुठंच दिसेना, शेवटी त्यांनी फार्महाऊसच्या नोकराला विचारलं, ‘काय रे, काल रात्रीचा तो कुत्रा कुठं दिसत नाही. बघ जरा त्याला शोधून आण.’

“तो कालचा कुत्रा ना? तो बिचारा मेला…! आज सकाळीच…! अचानकच…!” नोकरानं साळसूदपणं उत्तर दिलं.
काल आपण ज्याला खायला घातलं तो कुत्रा मेला. ही बातमी सगळीकडे पसरली आणि सगळ्या पाहुण्यांच्या तब्येती अचानक बिघडल्या. कुणाला उलट्या सुरू झाल्या, तर कुणाला जुलाब, कुणाच्या पोटात मळमळायला लागलं, कुणाला ताप चढला, तर कुणाचं डोकं दुखायला सुरुवात झाली.

तालुक्याच्या शहरातून डॉक्टरला तातडीनं बोलावलं. डॉक्टरने उपचार तर सुरू केलेच, पण त्याचबरोबर त्या मेलेल्या कुत्र्याच्या पोटात कोणत्या प्रकारचं विष सापडतं, याची पाहणी करण्यासाठी त्या नोकराला बोलावलं आणि म्हणाले, “मला त्या कुत्र्याचं प्रेत पाहायचंय. तो मेलेला कुत्रा कुठाय? तो कुत्रा कशामुळं मेला त्याची तपासणी करायचीय…”
नोकरानं कपाळावर हात मारला अन् म्हणाला, “तो कुत्रा ना, तो काय अजून तिथंच रस्त्यात पडलाय, पण आता कसली तपासणी करणार तुम्ही डॉक्टर साहेब? आता काय राहिलंय? त्याच्या शरीराचा पार लगदा झाला साहेब. हवं तर जाऊन बघा तिथं हायवेवर… कावळे टोचून टोचून खाताहेत त्याला.”

“म्हणजे?” डॉक्टरांनी आश्चर्यानं विचारलं.
“म्हणजे काय…? आज सकाळीच त्याला ट्रकनं उडवला आणि आमचा बिचारा नाम्या जागच्या जागीच मेला की हो…!”
डॉक्टरांनीच नव्हे तर उपस्थित सर्वच पाहुण्यांचे डोळे आश्चर्यानं विस्फारले. आजारी पडलेले सर्वजण औषधाशिवायच खडखडीत बरे झाले, हे वेगळं सांगायला नकोच…! कोकणात घडलेली ही सत्यघटना…!

आजदेखील वैद्यक शास्त्रातील मोठमोठे तज्ज्ञ ठामपणे सांगतात की, माणसाला होणाऱ्या आजारांपैकी निम्मे आजार केवळ मानसिकच असतात, माणसाला होणाऱ्या व्याधींपैकी जवळजवळ पन्नास टक्के व्याधी केवळ कमकुवत मनामुळं, कसल्या तरी भीतीमुळं आणि मानसिक तणावामुळं होतात. डोकेदुखी, अर्धशिशी, ॲसिडिटी, अपचन, स्थूलता, पाठदुखी, स्त्रियांच्या बाबतीतली कंबरदुखी, मासिक पाळीतील अनियमितपणा, भूक न लागणे वगैरे प्रकारात बहुतेकदा बिघाड मनात झालेला असतो आणि मनातल्या बिघाडाचे पडसाद शरीरावर उमटतात.

अर्थात मी असं म्हणणार नाही की, सगळेच आजार मानसिक असतात. बाहेरून शरीरात शिरलेले रोगजंतू आणि शरीर रचनेतीलअंतर्गत बिघाड यांना काहीच महत्त्व नाही असं नाही. पण तरी देखील खंबीर मनानं आजाराचा मुकाबला केला, तर बरेचसे शारीरिक आजारसुद्धा बरे होऊ शकतात. निदान त्यांतील वेदनांची तीव्रता तरी बरीच कमी करता येऊ शकते. सुसह्य करता येऊ शकते. म्हणूनच औषधोपचारांच्या बरोबरीनेच आजारी माणसाच्या मनाची ताकद वाढवणं हे सर्वात महत्त्वाचं, त्याला धीर देणं अत्यंत आवश्यक ठरतं. आणि केवळ आजारपणातच नव्हे, तर अगदी इतर वेळीदेखील ज्याला आपण ‘नॉर्मल कंडिशन’ म्हणतो ना, त्यावेळी देखील मनाची उभारी असेल, तर नेहमीचीच कामं अधिक चांगल्या रीतीनं होतात हा अनुभव आपण सर्वांनीच अनुभवलेला असतो.

मनानं ठरवलं, तर नेहमीचाच रटाळ दिवस देखील काहीतरी वेगळा भासतो. सगळं वातावरण काहीतरी वेगळ्याच आनंदानं भरलेलं आहे असं वाटू लागतं. मनाचा हा तजेला डोळ्यांत उतरतो आणि मग नेहमीचीच झाडं अधिक हिरवीगार दिसू लागतात. एवढंच नव्हे तर भर दुपारी उन्हानं अंगातून घामाच्या धारा वाहात असतानासुद्धा मनात चांदणं फुलून येतं. आपलं आपल्यालाच एकदम झकास वाटू लागतं. जगणं अधिक अर्थपूर्ण होतं. या झक्कास जगण्याचा उगम बाहेर कुठंही नसतो, तो असतो आपल्या मनात…

याच्याच नेमकं उलट म्हणजे मनानं खचलेल्या माणसाला सुखसुद्धा सलतं. आजारी माणसाच्या तोंडाला चव नसते ना तशीच नैराश्यानं ग्रासलेल्या मनाला सगळंच बेचव लागतं, इंद्रधनुष्याचे रंग देखील त्याला काजळासारखे काळे दिसतात. जगात काहीच राम नाही असं म्हणणारी माणसं जरी शरीरानं जगत असली तरी मनानं त्यांनी कधीच राम म्हटलेला असतो. मनानं रोगट माणसाला सुखातसुद्धा दुःखच सापडतं, तर मनानं नि माणूस दुःखात देखील सुख शोधतो.
एक सत्यकथा सांगतो.

कारगील युद्धावर गेलेल्या आणि शत्रूबरोबर लढताना जायबंदी होऊन तीन महिने हॉस्पिटलमध्ये पडून राहावं लागलेल्या एका सैनिकाला आम्ही भेटायला गेलो होतो. त्यावेळी तो अगदी आनंदी दिसला. एक पाय कायमचा तुटलेला आणि दुसरा पाय प्लॅस्टरमध्ये अशा अवस्थेत त्याला पाहून आम्ही कळवळलो, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाचा लवलेशही नव्हता. बोलता बोलता तो म्हणाला, “आता निदान सहा महिने तरी घरीच असणार आहे. बरीच वर्षे हार्मोनिअम शिकायचं मनात होतं. पण वेळच मिळत नव्हता. आता घरी गेलो की…”

मनाची ही निकोपता माणसाला दुःखात देखील सुख शोधायला शिकवते आणि मग शारीरिक वेदना देखील सुसह्य होतात.
असं उभार मनानं जगण्यासाठी आपल्याला काही फार मोठं, असामान्य वगैरे असण्याची गरज नसते. अगदी तुमच्या आमच्या सारख्या अगदी सर्वसामान्य माणसालादेखील असं आनंदानं जगणं सहज शक्य आहे. असं जगण्यासाठी फार काही साधनसामग्रीची आवश्यकता नसते, त्यासाठी फारसा खर्चही येत नाही. काही शारीरिक कष्टदेखील फारसे घ्यावे लागत नाहीत. फक्त सकाळी डोळे उघडल्यानंतर आपण फक्त ठरवायचं की आजचा दिवस आपण मजेत जगायचं. बस्स…! एकदा मनाने ठरवलं की, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -