माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका पंतप्रधान मोदींची मुत्सद्देगिरी

Share

देशात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत ‘एनडीए’चे सरकार स्थानापन्न झाले आणि देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्षेत्रांमध्ये बदलाचे वारे वाहू लागल्याचे दिसू लागले. देशात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल या तोडीचा दुसरा नेताच दूर-दूरपर्यंत दिसत नाही. तीच बाब जागतिक स्तरावर आपल्याला दिसत आहे आणि काही घटनांवरून ते वारंवार सिद्धही झाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात जागतिक राजकारणात भारताचे स्थान बळकट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताची स्वच्छ प्रतिमा असून एखाद्या देशाचा विरोध आहे, म्हणून दुसऱ्या देशाला मदत करण्यापासून भारत मागे हटत नाही आणि आपली भूमिकाही बदलत नाही. ठामपणे त्या देशामागे उभा राहतो. त्यातूनच आखाती देश आता भारताचे चांगले मित्र बनले आहेत, हे विशेष.

अबुधाबी येथे स्वामी नारायण मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर मोदी हे कतारला जेव्हा पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कतार सरकारने स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. मोदी यांचा हा दुसरा कतार दौरा आहे. या आधी जून २०१६ मध्ये ते कतारला गेले होते. कतार आणि भारत यांच्यातील संबंध आधीपासूनच चांगले होते. पण मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारत-कतार संबंध आता अधिक दृढ होत चालले आहेत, ही बाब अत्यंत महत्त्वाची. हे नुकत्याच घडलेल्या एका मोठ्या घटनेवरून सिद्ध होत आहे. कतारमध्ये प्रथम देहान्त शासन ठोठावलेल्या आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची घरवापसी, हे परराष्ट्र खात्याची मुत्सद्देगिरी तसेच मोदी व कतारचे आमिर तमिम बिन हमाद अल थानी यांच्या मैत्रीचे यश मानावे लागेल.

दोन वर्षांपासून कतारमध्ये जीवनमृत्यूच्या हिंदोळ्यावर झुलत असलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली अन् केवळ त्यांच्या आप्तांनीच नव्हे, तर संपूर्ण देशाने सुटकेचा निश्वास सोडला. त्यासाठी मोदी सरकारची मुत्सद्देगिरी कामी आली. त्यामुळे सरकारचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. एखाद्या थरारक चित्रपटाचे कथानक शोभावे, असा हा एकूण घटनाक्रम होता. त्यामध्ये नौदलात काम केलेल्या माजी अधिकारी कथानायक होते, आंतरराष्ट्रीय हेरगिरी केल्याचा आरोप होता. त्यामुळे साहजिकच उभय बाजूंनी संशय आणि राजकीय ताणतणाव होता. अशा वेळी राजनैतिक संबंधांचा योग्य वापर करून सातत्यपूर्ण कूटनीती करण्यात आली. या घटनाक्रमाचा प्रारंभ झाला होता ऑगस्ट २०२२ मध्ये.

भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेले आठ अधिकारी कतारची राजधानी दोहातील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज नामक कंपनीत काम करीत होते. संरक्षण, एअरोस्पेस, माहिती-तंत्रज्ञान, दळणवळण इत्यादी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या त्या कंपनीत एका पाणबुडीवर संशोधन सुरू होते आणि त्या संदर्भातील काही गुपिते त्या आठ भारतीयांनी इस्रायलला पुरविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. कतारमधील कनिष्ठ न्यायालयाने त्या सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. या वृत्ताने देशभरात खळबळ उडाली आणि सर्वांच्याच चिंतेत भर पडली. त्यावेळी प्रत्येक भारतीयाला हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण जाधव यांचे प्रकरण आठवले. दोन्ही प्रकरणांत बरेच साम्य होते.

कतारमधील आठ जणांप्रमाणेच जाधव हेदेखील नौदलाचे माजी अधिकारी होते. त्यांच्यावरही हेरगिरीचाच आरोप होता. त्यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यासाठी भारत सरकारने सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले होते. भारतातील सर्वोत्तम विधिज्ञांमध्ये गणना होणाऱ्या हरीश साळवे यांची सेवा घेऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधव यांच्यासाठी लढा देण्यात आला. शेवटी त्या न्यायालयाच्या आदेशानुसार पाकिस्तानला जाधव यांची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करावी लागली होती. त्यामुळे या प्रकरणासोबत तुलना होऊन, कतारमधील या आठ भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारने आपली प्रतिष्ठा पणाला लावली. सरकारनेही संपूर्ण ताकदीनिशी झोकून देत प्रयत्नांची बाजी लावून देशवासीयांच्या अपेक्षेला तडा जाऊ दिला नाही. त्याची फलश्रुती म्हणजे त्या आठही जणांची सुटका झाली आणि ते सर्वजण देशात सुखरूप परतले.

मध्यपूर्व आखातातील मुस्लीम देश बरेचसे पुराणमतवादी आहेत. दगडाने ठेचून मारण्यासारख्या मध्ययुगीन शिक्षा अनेक देशांमध्ये आजही अस्तित्वात आहेत. मृत्युदंडाची शिक्षा सौम्य होण्याचे प्रमाणही त्या देशांमध्ये नगण्य आहे. अशा एका देशातून तब्बल आठ जणांची मृत्युदंडाची शिक्षा सौम्य करून घेणे आणि नंतर त्यांची चक्क सुटका करवून घेणे, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्यासाठी मोदी, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पंतप्रधान मोदींनी कतारचे राजे शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यासोबतच्या वैयक्तिक स्नेहाचा त्यासाठी वापर केला. त्याशिवाय अजित डोवाल यांनी पडद्याआडून शक्य ते सारे काही प्रयत्न केले. अशक्यप्राय वाटणाऱ्या या एका प्रकरणाने भारताच्या मुत्सद्देगिरीचा जगाला जसा परिचय झाला, तशीच भारताच्या वाढत्या शक्तीचीही झलक दिसली. त्यामुळेच चीन, पाकिस्तान यांचा अपवाद वगळता जगातील प्रत्येक देशाला भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत. कारण भारत ही एक झेपावणारी आर्थिक आणि लष्करी महाशक्ती असल्याची जगाची खात्री पटली आहे.

देशात असलेली मोठी तरुण लोकसंख्या आणि वाढती क्रयशक्ती, यामुळे भारत म्हणजे एक मोठी बाजारपेठ बनली असून हा पैलूही कतारसोबतचा पेच सोडविताना महत्त्वाचा ठरला आहे. भारताने गेल्याच आठवड्यात कतारसोबत नैसर्गिक वायू खरेदीचा तब्बल ७८ अब्ज डॉलर्सचा करार केला आणि त्यानंतर आठच दिवसांत कतारने आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली, हा निव्वळ योगायोग खचितच असू शकत नाही. शेवटी कोणताही प्रयत्न फलद्रूप ठरला. असो. विदेशात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या भारतीयांची केवळ शिक्षाच रद्द झाली नाही, तर ते सुखरूपपणे मायदेशातही परतले. या घटनेमुळे संपर्ण जग आता भारताकडे मोठ्या आदराने पाहात आहे. तमाम भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

Recent Posts

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

10 minutes ago

Mumbai Crime : नवरा नाईट शिफ्टवरुन घरी येताच पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून…

मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…

16 minutes ago

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

38 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

40 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

1 hour ago