Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखप्रदूषणावर आरूढ मुंबई नगरी...

प्रदूषणावर आरूढ मुंबई नगरी…

रूपाली केळस्कर

अथांग अशा अरबी समुद्राच्या कुशीत पहुडलेले निसर्गरम्य शहर म्हणजे मुंबई. मुंबई म्हणजे स्वप्न नगरी… चमचमती चंदेरी दुनिया… झगमटात न्हावून निघणारी मायानगरी. हीच मुंबई उन्हाळ्यात घामाच्या धारांनी ओलीचिंब भिजते, अन् पावसाळ्यात तिची तुंबई होते, हिवाळ्यात मात्र धुक्यात न हरवता धुरक्यात शिरते. मग या आर्थिक राजधानीच्या प्रदूषाणावर चर्वित चर्वण सुरू होते. ही चर्चा दरवर्षी ठरलेली. आता हीच मुंबापुरी अक्षरश: प्रदूषणावर आरूढ झाली आहे.

विस्तीर्ण अशा या मुंबई महानगरात आणि उपनगरात अनेक ठिकाणी हिरव्यागार टेकड्या डोकावत असल्या, तरीही या मायानगरीचा श्वास गुदमतोय. समुद्रावरून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे इथली हवा खेळती राहते, हे खरे असले तरी, आता प्रदूषणच या वाऱ्यांवर स्वार झाले आहे. इथल्या हवेत प्रदूषणाचा एक एक प्रकारचा दर्प नेहमीच दर्वळत असतो; परंतु प्रत्येक जण त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो आणि वेगावर आरूढ होतो.

मुंबईच्या हवेत सूक्ष्म धूलिकण आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकदा येथील हवा प्रदूषणात दिल्लीला देखील मागे टाकते. डोळ्यांचे पारणे फिटेल असे मुंबईचे भुरळ घालणारे बावनकशी सौंदर्य हे प्रदूषणामुळे गलीतगात्र झाले आहे. त्यामुळे आता प्रशासन खडबडून जागे झाले आणि या वर्षी मुंबापुरीच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहराच्या सर्वाधिक गर्दीच्या पाच भागांमध्ये एअर प्युरिफायर बसविण्याची योजना आखण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग संपण्याच्या मार्गावर आहे, तरी देखील या शहरातील लोकांच्या नाकाला मास्क लावलेले दिसतात. त्याचे कारण श्वसनाच्या विकारांबरोबरच इतर आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

या वर्षी प्रसारित झालेल्या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी प्रदूषणासाठी निधीची तरतूद केली आहे. १९८५ नंतर प्रथमच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२३ – २४ साठी ५२,६१९.०७ कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला, तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारींसाठी जनहित याचिकेच्या निमित्ताने सूचना दिल्या होत्या, त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई एअर’ नावाचे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर नागरिकांना तक्रार दाखल करता येतील. मात्र, ही यंत्रणा किती यशस्वी होईल, यावर आताच शंका नको.
दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते, हे दरवर्षीचे अगदी न चुकता सांगितले जाणारे कारण आहे. या वर्षी तर प्रदूषण कमी करण्यासाठी विमानातून पाऊस पाडण्याचा शासनाचा मानस होता; परंतु त्याला मूर्तस्वरूप मिळाले नाही. २०२२ सालापासून मुंबईच्या परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. सुमारे ३ कोटी लोकसंख्या असलेल्या या शहराची हवा उद्योग, वाहने आणि बांधकामांमुळे प्रदूषित होत असून, या शहरात येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे शहराचा श्वास गुदमरतोय, याकडे कानाडोळा करूनही चालणार नाही. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या तयार होत आहेत. धूम्रपान वाढते आहे, वाहनांची संख्या वाढत आहे, उद्योग वाढत आहेत, बांधकामेही वाढत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत गरजा वाढत आहेत, त्यामुळे बेसुमारपणे सुखसोयी वाढत आहेत.

काही भागांत तर हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०० च्या वरही जातो. एका अहवालानुसार, मुंबईतील वायू प्रदूषण २०१९ ते २०२३ पर्यंत दुपटीने वाढले आहे. लिव्हिंग सायन्सच्या अहवालानुसार, भारतातील ४ मोठ्या राज्यांमध्ये २०१९ ते २०२३ पर्यंत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. गेल्या काही वर्षांत येथील हवेचे प्रदूषण ४२.१ टक्क्यांनी वाढले आहे. यावर उपाय म्हणून यंदा शहरातील दहिसर टोल नाका, मुलुंड चेक नाका, मानखुर्द, कलानगर जंक्शन आणि हाजी-अली जंक्शन या शहरांच्या पाच सर्वांत गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर बसविण्याची नागरी संस्थाची योजना आहे.

प्रदूषण एकाग्रता रोखणे, बहुस्तरीय देखरेख धोरण सुरू करणे, वैयक्तिक जोखीम कमी करण्यासाठी नियोजन आणि सामूदायिक आरोग्य जागृतीचे विकेंद्रीकरण, पुढील आर्थिक वर्षात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन उपायांसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात रस्ते धुण्यासह बांधकाम व्यावसायिकांना विविध अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ उपक्रमाची सुरुवात या वर्षी अशा प्रकारे करण्यात येत आहे. वाहतूक उपायांमध्ये इलेक्ट्रिक बसेस खरेदीसह कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीवर भर देण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेचे ग्रीन बजेट तयार होत असून, त्यासाठी या वर्षी मुंबईतील हिरवेपट्टे जतन करण्यासाठी उद्यान विभागाला १७८.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, हीच गत वर्षी ३५४.३९ काटी रुपये इतकी होती, तर दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई एअर’ नावाचे ॲप विकसित केले. या ॲपवर नागरिकांना तक्रार दाखल करता येईल. तसेच विभागनिहाय तक्रार देखील दाखल करता येईल. त्याच्या विकसित डॅशबोर्डवर तक्रारींचा मागोवा घेता येणार आहे. एकूणच वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी मुंबई प्रशासन सज्ज झाले आहे. ३५० बसेसमध्ये एअर फिल्टर बसविण्यात आले आहेत, विशेष ठिकाणी हवा शुद्धीकरण बसविण्यात आले आहे. याशिवाय धुळीचे कण पकडण्यासाठी आणि दाबण्यासाठी अनेक ठिकाणी उंचीवरून पाण्याची फवारणी केली जात आहे. कोणत्याही शहराचा, महानगराचा विकास अपेक्षित आहेच; परंतु तिथले वातावरण भकास होता कामा नये, नाहीतर त्या विकासाला काहीच अर्थ नाही.

कोराेनामध्ये रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालवत होती, त्यामुळे हजारो जणांचा मृत्यू झाला. भविष्यात रस्त्यांनी चालताना शुद्ध हवेसाठी ऑक्सिजन सिलिंडर घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये. नुसती मुंबईच नव्हे, तर यावेळी दक्षिण भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. काही वर्षांपूर्वी कोलकाताची हवा बऱ्यापैकी स्वच्छ असायची, या वर्षी मात्र या ठिकाणी प्रदूषणात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. समुद्रकिनारी वसलेल्या अनेक शहरांची परिस्थिती आपल्या मुंबई सारखीच आहे. प्रदूषणात अग्रेसर असलेल्या दिल्ली, एनसीआर, गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम, कानपूरला देखील मुंबईने मागे टाकले आहे, हे विसरून चालणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -