थ्रिप्सचा ॲटॅक; आंबा, काजू कोमेजला...!

  121

माझे कोकण: संतोष वायंगणकर


कोकणातील शेतकरी यावेळी वेगळ्याच चिंतेत आहेत. कोकणातील आंबा, काजू, कोकम या बागायतदार शेतकऱ्यांना काय करावे हेच सूचत नाही, अशी स्थिती आहे. यावेळी बिघडलेल्या हवामान स्थितीतही आंबा, काजूचे पीक चांगले येईल असा बागायतदार शेतकऱ्यांचा अंदाज होता; परंतु थ्रिप्स नावाच्या कीटकाने या शेतकऱ्यांची झोपच उडवली आहे.कीटकनाशक फवारणी केल्यावर हा कीटक नाहीसा होईल, असा बागायतदार शेतकऱ्यांचा होरा होता; परंतु या फवारणीचा कोणताही परिणाम आंबा, काजू बागायतीत दिसत नाही. यामुळे पुढे काय होणार याची नुसती कल्पना करूनच बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी अवकाळी पाऊस पडल्यानंतर जी थंडी आली त्याने आंबा, काजू बागायतीत चांगला मोहरही आलेला, कणी तयार झाली, मात्र छोटी-छोटी फळं तयार झाल्यानंतर थ्रिप्सने जो ॲटॅक केला त्यात बागेतील आंबा, काजूची फळं ही झाडावरच कोमेजली. या संदर्भाने कोकणातील काही बागायतदारांशी बोलल्यावर या थ्रिप्सच संकट किती मोठे आहे, हे समजून आले.


देवगडातील आंबा बागायतदार प्रकाश गोगटे म्हणाले की, आंबा, काजू पुरता मर्यादेत या थ्रिप्सचा ॲटॅक नाही, तर त्याचा परिणाम फुलझाडांवरही दिसू लागला आहे. जास्वंदीच्या फुलांवरही याचा परिणाम झाला आहे. केवळ विशिष्ट फळांवर, फुलांवर थ्रिप्सचा परिणाम आहे असे नाही, तर तो सर्वत्रच परिणाम करीत आहे. आजवर कीटकनाशकाच्या फवारणीने त्याच अतिक्रमण रोखल जात होतं; परंतु यावेळी कोणत्याही कीटकनाशकाचा परिणाम होताना दिसत नाही. ही तर खरी चिंतेची बाब आहे. यामुळेच आमदार नितेश राणे यांनी देवगड - कणकवली - वैभववाडीतील आंबा, काजू बागायतदारांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली.


कोकणकृषी विद्यापीठातील संशोधकांशी संपर्क साधून यावरचे उपाय कोणते करायचे, याबाबत बागायतदार शेतकऱ्यांना आवश्यक आणि योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आ. नितेश राणे यांनी केल्या आहेत. यावेळी काजू पिकाच्या बाबतीतही एक विचित्रपणा घडत आहे. काजू बागायतीत एक वर्षाआड काजू पीक येत नाही, तर दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात बागायतीत काजू पीक होत असते; परंतु काजू बागायतदारांच्या म्हणण्यानुसार यावर्षी काजू बागायतीतील काही झाडांवर काजू आलाय, तर बाजूच्याच काही झाडांवर एकही काजू नाही. यापूर्वी असे कधी होत नव्हतं. हे असे का व्हायला लागले, असा प्रश्नही काजू बागायतदार शेतकऱ्यांना सतावू लागलाय.


एवढे सारे संकट कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांसमोर असतानाही कोकणातील शेतकरी हा रडत न बसता आपले प्रयत्न या बागायतदार शेतकऱ्यांनी सोडलेले नाहीत, तर ते सतत प्रयत्नशील आहेत. आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल - मेच्या हंगामात या थ्रिप्सच्या ॲटॅकने आंबा पिकच येणार नाही. मे महिन्यात येणारे आंबा पीक हे आंबा बागायतदार शेतकऱ्याला अधिकचे चार पैसे मिळून देते; परंतु आजच्या स्थितीनुसार एप्रिल - मेमध्ये आंबा हंगाम असेल की नाही, हेच ठरवणे अवघड आहे. जानेवारी - फेब्रुवारीमध्ये जो आंबा मार्केटमध्ये येतो त्याचे अधिकचे पैसे आले असे वाटले तरीही त्यात शेतकऱ्यांचा काही फायदा नसतो. कारण आंबा पीक मार्केटमध्ये यायला लागले तरीही विक्री व्यवस्था तितकीच अधिक असायला पाहिजे.


मेमध्ये कॅनिंग फॅक्टरीलाही आंबा खरेदी केला जातो. त्यामुळे आंबा पडून राहणार नाही. कमी-अधिक दराने आंबा जाऊ शकतो ही विश्वासाची भावना बागायतदार शेतकऱ्यांमध्ये असते. या थ्रिप्सवर डेअरीश नावाचे कीटकनाशक उपयोगी व्हायचे, आतातर त्याचा काही परिणामही जाणवत नाही. हा सारा आंबा, काजू बागायतदारांसाठी चिंतेचाच विषय आहे. आंबा, काजू, कोकम या फळ पिकांवर त्याचा जो परिणाम होत आहे त्यामुळे यावर्षी बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आंबा, काजू बागायतीत केलेला खर्चही बाहेर येणे अवघड आहे. यामुळे बागायतदार शेतकऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


थ्रिप्स हा सूक्ष्म कीटक आहे; परंतु थ्रिप्स फळातील रस शोषून घेत असल्याने आंबा, काजू फळ सुकल्यासारखी दिसतात. त्यामुळे थ्रिप्सच्या ॲटॅकने कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. बागायती शेतीत अगोदरच माकड, गवारेडा यांचा हैदोस आहेच, त्यातच थ्रिप्सच्या ॲटॅकची आणखी भर पडली आहे. निसर्गाने एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले असेच म्हणण्यासारखी स्थिती आहे.

Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने