Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपाकिस्तानातील निवडणुकीचा अन्वयार्थ

पाकिस्तानातील निवडणुकीचा अन्वयार्थ

आपला शेजारी देश पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानात यंदा सर्वाधिक संख्येने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाने समर्थन दिलेले अनेक अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. इम्रान खान यांना निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी नवाझ शरीफ यांचा ‘पाकिस्तान मुस्लीम लीग’ आणि ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ या दोन पक्षांनी जंग जंग पछाडले. पण पाकिस्तानातील युवा मतदारांनी इम्रान यांच्या पक्षाला पसंती दिली आहे. त्यामुळेच पाकिस्तानात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पाकिस्तान हा खूप लहान देश असला तरीही तेथे सारी सत्ता लष्कराची असते. त्यामुळे लष्कराला वाटेल तोच पंतप्रधान होतो. त्याला लष्कराच्या तालावर नाचावे लागते. इम्रान खानही त्याला अपवाद नव्हते. पण नवाझ शरीफ किंवा बिलावल भुत्तो या गणगांपेक्षा इम्रान खान तेथे आजही लोकप्रिय आहेत, याचेही प्रत्यंतर निवडणूक निकालांनी दाखवून दिले आहे.

इम्रान यांचा पक्ष म्हणजे ‘पीटीआय’ने समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवारांमुळे पाकिस्तानातील पक्षीय राजकारणातील पारंपरिक गतिशीलतेला आव्हान दिले गेले आहे. तीव्र अशा स्वरूपाच्या राजकीय तिकडमबाजीला या निकालांनी तेज केले आहे. परिणामी पीपीपी आणि शरीफ यांचा पीएमएल एन या पक्षांनी आता औपचारिकपणे एकत्र येण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. त्यांच्यात पहिली औपचारिक बैठकही झाली. कोणत्याही परिस्थितीत इम्रान यांना आपल्याला आव्हान देण्याच्या स्थितीत राहू द्यायचे नाही, असा प्रयत्न या पक्षांनी केला आहे. त्यांची पोटदुखी ही आहे की इम्रान हे फार कर्तृत्ववान नसले तरीही युवा पिढीसाठी तेच सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांना हर तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांनी केला. पण त्याला जनतेने धूप घातले नाही. पाकिस्तानातील निकालांनी राजकीय परिस्थितीत भूकंपीय बदलाचे संकेत दिले आहेत. हाच नाट्यपूर्ण आणि अचानक बदल झालेल्या संज्ञेचा अर्थ आहे.

देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने अपक्ष निवडून आले आहेत. इम्रान यांच्या पक्षाला तर निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उभे केले होते. पाकिस्तानातील राजकीय आकांना वाटले की, इम्रान यांच्या पक्षाचे चिन्ह गोठवले आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तर निवडणुकीचे निकाल बदलू शकतील. पण पाकिस्तानातील मतदारांनी शरीफ किंवा भुत्तो यांच्या संस्थानिक मानसिकतेत असलेल्या पक्षांना नाकारले आणि इम्रान यांना सर्वाधिक संख्येने आपले अपक्ष निवडून आणता आले. इम्रान हेही काही महान नेते नाहीत. पण इतर पक्षांनी त्यांना तुरुंगात टाकले आणि त्यांचे निवडणूक चिन्ह गोठवून त्यांच्यावर मात करता येईल, असा जो भ्रम बाळगला होता, त्याला मतदारांनी अस्मान दाखवले.

पाकिस्तानात आता घोडेबाजाराला ऊत येणार आहे आणि इम्रान यांच्यासमोर मुख्य प्रश्न हा आहे की, या अपक्षांना ते आपल्याकडे किती काळ ठेवू शकतील. त्यांना इतर दोन पक्षांच्या प्रलोभनांपासून किती दिवस अलिप्त ठेवू शकतील. कारण पाकिस्तानातील उमेदवारही स्खलनशीलच आहेत. येथे स्थिती भारतासारखीच आहे. मंत्रीपदे, अध्यक्षपदे आणि इतर लाभ यांच्या प्रलोभनांपासून दूर राहणे अवघड आहे. त्याला अपक्ष बळी पडणार नाहीत, हे अशक्य आहे. विविध अदृश्य थरांतून आणला जाणारा दबाव हा फार मोठे काम करत असतो. जे निवडून आले आहेत त्या अपक्षांमध्ये काहीजण पीटीआयशी जोडले गेले नाहीत, त्यांना इम्रान यांना आपल्याकडे राखणे अवघड आहे.

पीपीपी आणि पीएमएल (एन) यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले, तर अपक्ष इकडून तिकडे जाऊ शकतात. या अपक्षांच्या निष्ठा आणि बाह्य दबावापासून अलिप्त राहण्याची त्यांची क्षमता आणि ताकद ही त्यांचे राजकीय वजन सिद्ध करणारी आहे. आपल्याकडे जसे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर अपक्षांचा घोडेबाजार तेजीत येतो, तसेच पाकिस्तानात होण्याची शक्यता आहे. कारण राजकीय व्यक्तींचे विशिष्ट परिस्थितीत वर्तन सारखेच असते. त्यात काही अपवाद नसतात. त्यामुळे पाकिस्तानातही अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली असून अपक्ष इकडून तिकडे जाण्याची शक्यता आहे आणि ते जरी या किंवा त्या पक्षात गेले तरीही तेथे किती दिवस राहतील, हा वेगळाच मुद्दा आहे.

कोणत्याही अस्थिर राजकीय परिस्थितीत संधीसाधूपणाला ऊत येत असतो आणि पाकिस्तान आता त्या दिशेने निघाला आहे. पाकिस्तान आधीच कंगाल अवस्थेत आहे. त्यांना कुणी मदतही करत नाही आणि दहशतवादाला सर्व प्रकारची मदत दिल्याने बदनाम झालेल्या या देशाला कुणी उभेही करत नाही. अशा परिस्थितीत अस्थिर राजकीय सरकार पाकिस्तानच्या अगोदरच कंगाल अवस्थेत भरच घालेल. हे अपक्ष जो मार्ग निवडतील, त्यामुळे पाकमधील राजकीय चित्र स्पष्ट तर होईल, पण भवितव्याची दिशाही ठरवतील. एकेकाळी भारतात असे आघाड्यांचे युग होते आणि भारतातही हीच स्थिती होती. त्यामुळे अपक्ष आणि लहान प्रादेशिक पक्षांची चांदी होत असे. मोदी सरकार आल्यावर ती परिस्थिती बदलली आणि या परिस्थितीचा लाभ उठवणारे राजकीय पक्ष डब्यात गेले आहेत. पाकिस्तानात लोकशाही कधीच नव्हती. पण जे काह लोकशाहीचे कलेवर तेथे आहे, त्याचा आकारही या अपक्ष उमेदवारांच्या निर्णयाने स्पष्ट होईल. इम्रान आणि भुत्तो किंवा शरीफ यांचे जे काय व्हायचे ते होईल, पण पाकिस्तानला नवी दिशा मिळणार नाही आणि या निवडणुकीने पाकिस्तानला कसलीही दिशा दिलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -