वृत्तनिवेदिका, उद्योजिका ते चित्रपट निर्मिती या क्षेत्रात अमृता राव यांनी नावलौकिक मिळवला आहे. समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी सामाजिक संदेश देणाऱ्या तब्बल नऊ चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी त्यांनी दैनिक ‘प्रहार’ आयोजित गजाली कार्यक्रमात प्रहारच्या टीमसोबत संवाद साधला. यावेळी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, प्रशासन व लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
‘ती’ची दुर्दम्य इच्छाशक्ती
तेजस वाघमारे
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे झाल्यास व्यक्तीकडे इच्छाशक्ती लागते. मनाची एकाग्रता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या जोरावर निवेदिका, निर्मात्या आणि उद्योजिका म्हणून अमृता राव यांनी नावलौकिक मिळवला आहे. कर्नाटकमध्ये चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण कानडी भाषेतून झाले. शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वडिलांनी त्यांना मुंबईत आणले. कानडी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले असल्याने त्यांना मुंबईतील शाळांमध्ये प्रवेश मिळेना. कानडी शाळेत आठवीनंतर मुलींना ए, बी, सी, डी शिकवले जायचे. तर मुंबईत मराठी माध्यमात पाचवीपासून इंग्रजी होते. त्यामुळे त्यांना एक वर्ष महानगरपालिकेच्या शाळेत जावे लागले. आई-वडिलांनी घरी अभ्यास करून घेतल्यानंतर त्यांना दादरमधील किंग्ज जॉर्जमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर रूपारेल महाविद्यालयात बीएस्सी केले. पुढे खालसा महाविद्यालयातून एमएस्सी केले. त्यानंतर ‘लॉ’चे शिक्षण घेऊन तीन वर्षे प्रॅक्टिस केली.
वृत्तनिवेदिका म्हणून प्रवास थांबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा ‘लॉ’ची प्रॅक्टिस सुरू करण्याचे ठरवले. पण त्यामध्ये त्यांचे मन रमेना. त्यामुळे ‘लॉ’ सोडले. सतत कामात व्यस्त राहण्याची सवय झाल्याने त्यांना घरात स्वस्थ बसवेना. खूप विचार केल्यानंतर एखादी मालिका, चित्रपट करण्याचा निश्चय केला. त्यांनी ‘मानिनी’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला १२ अॅवॉर्ड मिळाले. माणसाच्या चेहऱ्याला एकदा मेकअप लागला, तर त्या कलाकाराला दुसरे कोणतेच क्षेत्र आवडणार नाही, असे त्या सांगतात. हळूहळू त्या चित्रपट क्षेत्रात रमल्या. अभिनय ही एक कला आहे. ती सर्वांना जमतेच असे नाही. तुम्ही दिसायला चांगले असाल पण कलाकार म्हणून चांगले असाल असे नाही, असे त्या सांगतात. मी तशी अल्पसंतुष्ट आहे. जे काही मला मिळते त्यात मी खूश असते. अभिनयाची हौस मी यू ट्यूब चॅनेलवरून पूर्ण करते आहे. चित्रपट हा दिग्दर्शकाच्या नावाने ओळखला जातो, निर्मात्याच्या नावाने ओळखला जात नाही, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
आज हजारो न्यूज चॅनल वेगवेगळ्या भाषेत आहेत, पण मोजक्या काही जणांना सोडले तर न्यूज रिडर कोण आहे हे कळणार नाही. २४ तास काहीतरी बातम्या दाखवायच्या असल्याने कोणत्याही गोष्टीची बातमी होत आहे, याची खंत वाटते.
यापूर्वी केलेला मानिनी हा चित्रपट आवडीचा आहेच. पण त्यावेळी चित्रपट निर्मितीबद्दल फारसे काही माहीत नव्हते. चित्रपट रिलीजबाबत माहिती नव्हती. ज्या वेळी मानिनी रिलीज केला. त्याच दिवशी शाहरूख खानचा ‘स्वदेश’ चित्रपट रिलीज झाला. एक आठवडा ‘मानिनी’ चित्रपटगृहात राहिला. जेवढा खर्च झाला, तेवढेही पैसे मिळाले नाहीत. त्यावेळी आपण चित्रपट करून फसलो, अशी माझी धारणा झाली. चित्रपट हे आपले क्षेत्र नसून यातले आपल्याला काही येत नाही, म्हणून मी घरी बसले. माझी मुले परदेशातून घरी आल्यानंतर माझे रुटीन पाहून त्यांच्या पप्पांना म्हणाले की, मम्मीला चित्रपट निर्मितीकरिता पैसे द्या. माझ्या पतीची बाप कमाई नव्हती. त्यांनी मेहनतीने कमावलेले पैसे मी पहिल्या चित्रपटात घालवले याचे मला वाईट वाटत होते. त्यांनी मला सांगितले की, तुला लोकांनी फसवले हे तू डोक्यातून काढून टाक. तुला माहीत नव्हते, ही तुझी चूक आहे. पुन्हा फसायचे नाही म्हणून मी या क्षेत्रातील लहान लहान कोर्सेस केले. फिल्म मेकिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग, डिरेक्शन असे सर्व तीन, सहा महिन्यांचे कोर्स केले. त्यानंतर मी ‘वादळ वारा सुटला’ हा चित्रपट केला. शिक्षणामुळे या चित्रपटात आर्थिक नुकसान झाले नाही. मी म्हणते सरकारने चित्रपटासाठीचे अनुदान बंद करावे. या अनुदानाच्या मोहापायी अनेक लोक चित्रपट बनवतात. चित्रपट बनविण्यापेक्षा चित्रपट रिलीज करण्यात अधिक खर्च होतो, हे अनेकांना माहीत नसते. त्यामुळे अनेक निर्मात्यांना या क्षेत्रात वेडे बनविण्यात येते. आता लोक ओटीटी माध्यमाकडे वळले आहेत. राजकीय हस्तक्षेप असणारे चित्रपट थिएटरमध्ये तुफान चालतात. पण इतर चित्रपट थिएटरमध्ये अधिक दिवस चालत नाहीत. हे तेवढेच खरे आहे.
…अन् महिला बॉस म्हणून कर्मचाऱ्यांनी स्वीकारले नाही
मानसी खांबे
वृत्तनिवेदिका ही ओळख असलेल्या अमृता राव या ‘अमृता इन्डस्ट्री’ या त्यांच्या केमिकल इंडस्ट्रीकडे वळल्या. लग्नबंधनात अडकल्यानंतर आणि सतत बातम्यांचे वाचन केल्यानंतर स्वत:च्या उद्योगाकडे वळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी अमृता केमिकल इंडस्ट्रीज नावाची कंपनी अगोदरच सुरू केली होती. पण घरगुती कारणांनी कंपनीचे काम पाहणे थांबविले होते. ५-६ वर्षांच्या अंतराने पुन्हा कंपनीत जाऊ लागल्यानंतर महिला बॉस म्हणून कामगार वर्ग स्वीकारत नव्हता. नेहमी मॅडम आल्या म्हणून आदरपूर्वक चौकशी करणारे, अवतीभवती वावरणारे कर्मचारी महिलेला बॉस म्हणून स्वीकारायला तयार नव्हता. ‘मॅडम आम्हाला व्यावहारिकदृष्ट्या कसे शिकवणार’ असे कामगारांचे म्हणणे होते. ते कानी पडल्यावर मी ते मान्य केले. कितीही मोठे शिक्षण घेतले असूनही व्यावहारिकदृष्ट्या शिकवता न येण्याची जाणीव झाल्याने अमृता राव यांनी उद्योगामधून काढता पाय घेतला.
चित्रपट करमणूक म्हणून नव्हे, तर लोकांपर्यंत काही संदेश गेला पाहिजे या गोष्टींचा विचार करून त्यांनी ८ ते ९ चित्रपटांची निर्मिती केली. अलीकडेच सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या निर्मात्या अमृता राव आहेत. ‘श्यामची आई’ या विषयावरचा हा चौथा चित्रपट होता. मात्र तरीही त्याची निर्मिती करण्याचे धाडस अमृता राव यांनी केले. या चित्रपटातून नवीन विषय लोकांपर्यंत गेला पाहिजे असा त्यांचा मानस होता. त्यातूनच या चित्रपटाची निर्मिती झाल्याचे त्या सांगतात. अनेक लोकांना श्याम म्हणजेच साने गुरुजी हे माहीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अमृता राव, बहुआयामी वृत्तनिवेदिका
वैष्णवी भोगले
दैनिक प्रहारच्या गजाली कार्यक्रमात अमृता राव यांच्यातला नेटकेपणा, बोलण्याची शैली यातून त्यांच्यातील वेगळेपण ठळकपणे दिसून आले.
‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या…’ असे प्रेझेंटेशन सादर करत त्यांच्यातली वृत्तनिवेदिका जागी झाली. अमृता राव या मराठी चित्रपटांच्या निर्मात्या, उद्योजिका असल्या तरी दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका म्हणून त्यांची ओळख आहे. दूरदर्शनवर १९७९ ते २००४ या कालावधीत वृत्तनिवेदिका म्हणूनच्या प्रदीर्घ प्रवासात शब्दफेक, स्पष्ट उच्चार, बोलण्याची कसब, देहबोली या कौशल्याला देखण्या रूपातून मांडणाऱ्या अमृता राव अनेकांच्या मनात घर करून गेल्या.
अमृता राव यांच्या बहिणीचे लग्न असताना त्यांचा मेकअप करण्यासाठी जया केळकर ब्युटिशियन म्हणून घरी आल्या होत्या. तेव्हा जया केळकर म्हणाल्या, दूरदर्शनवर एक हेअरस्टाईल आणि ब्राइड मेकअपसाठी तरुणी हवी आहे. तुझी बहीण करेल का? तेव्हा दुसऱ्या दिवशी अमृता राव बहिणीसोबत दूरदर्शनमध्ये गेल्या असता त्यांच्या बाजूला तब्बसूम बसल्या होत्या. तब्बसूम यांनी अमृता यांच्या सौंदर्याची स्तुती करून दिग्दर्शकांना भेटायला सांगितले. दिग्दर्शकांनी गप्पागोष्टींमध्ये सहज अमृता राव यांना विचारले की, तुम्ही वृत्तनिवेदिका म्हणून काम का करत नाही. तेव्हा अमृता राव यांनी वृत्तनिवेदिकेसाठी अर्ज केला. ७ वेळा निवड होऊनही मराठी बोलीभाषेत कन्नड भाषेचा टोन येत असल्यामुळे त्यांना नाकारले जात होते. त्यावेळी मराठी भाषातज्ज्ञ अशोक रानडे यांच्याकडे त्या मराठी भाषा शिकू लागल्या. संस्कृत नाटके, संस्कृत उताऱ्याचे वाचन करणे, उच्चाराचा व्यायाम याचे संस्कार त्यांच्यावर झाले. भाषेचा अभ्यास केल्यावर त्यांना शब्दांमधील फरक समजू लागला. अमृता राव यांनी एक उदाहरण सांगितले की, ‘पुण्याच्या पुलावरून फटफटी पटापट पळाली’ या वाक्यातील प्रत्येक शब्दांचा उच्चार वेगळा आहे. मराठीचा अभ्यास केल्यावर त्यांना या शब्दांमधील अर्थ समजत गेले. दीड वर्षांनंतर त्यांनी बातम्या वाचायला सुरुवात केली. प्रेक्षकांच्या मनात वृत्तनिवेदिकेबाबत आदर असतो. अमृता राव यांना आजही लोक वृत्तनिवेदिका म्हणूनच ओळखतात. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असूनही दूरदर्शनवरील २४ वर्षांतील अनुभवांशी अमृता यांचे एक अनोखे नाते जोडले गेले आहे. कारण पूर्वीचा काळ असा होता की, सहा, सात वृत्तनिवेदिका एकाच वाहिनीवरती बघितल्या जायच्या. दूरदर्शनवर प्रदीप भिडे, चारूशिला पटवर्धन, वासंती वर्तक, स्मिता तळवलकर, अनंत भावे इतके मोजकेच वृत्तनिवेदक त्यावेळी होते. दूरदर्शनवर सायंकाळचे ७ वाजले की मराठी असूदेत किंवा अमराठी लोक बातम्या नक्कीच पाहायचे. त्यामुळे लोकांना चेहरा माहीत नसला तरी नावानेच वृत्तनिवेदिकांना ओळखले जायचे. आता बातम्यांच्या हजारो वाहिन्या आहेत. प्रत्येक सेकंदाला आजची ताजा खबर लोकांपर्यंत पोहोचते. आजच्या वाहिन्या लोकांचे लक्ष वेधण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींवर अधिक भर देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.