Tuesday, July 9, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलChild story : उंदरांची सभा

Child story : उंदरांची सभा

  • कथा : रमेश तांबे

सभेच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. सारे उंदीर नटून-थटून सभेला जमले. पाहुण्या उंदराचा रुबाब एकदम भारी होता. पाहुण्यांच्या सोबत उंदीर मामीदेखील आली होती. पाहुण्यांची गाडी सभामंडपी आली. पाच-सहा भाषणे झाली. मग प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाला सुरुवात झाली.

एक होतं गाव. त्या गावात खूप उंदीर राहायचे. उंदरांच्या कित्येक पिढ्या त्या गावात लहानांच्या मोठ्या झाल्या होत्या. या आधी कधीही त्यांना गावातल्या माणसांकडून त्रास झाला नव्हता. पण गेल्या काही महिन्यांपासून चित्र एकदम पालटले. गावात नाक्या-नाक्यावर बोर्ड लागले. “उंदीर मारा आणि शंभर रुपये मिळवा.” मग काय पैशाच्या लोभाने लोक उंदीर मारू लागले. गावातील उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. गावातल्या उंदरांना, त्यांच्या नेत्यांना चिंता वाटू लागली. असेच उंदर पटापटा मरू लागले, तर उद्या गावात उंदीर औषधालाही सापडणार नाहीत. उंदरांची सारी नेते मंडळी मोठ्या चिंतेत सापडली. हे संकट कसे परतवायचे याचा विचार ती करू लागली.

शेवटी विचारांती असे ठरले की, आपण एक सभा भरवू. मोठ-मोठ्या उंदीर नेत्यांना सभेला बोलवू. विचारविनिमय करू. आलेले मोठे संकट परतवून लावू. माणसांना चांगलाच धडा शिकवू. संध्याकाळच्या वेळी गावाच्या बाहेर एका भल्या मोठ्या मैदानात उंदरांची सभा घेण्याचे ठरले. पाहुणा कोणाला बोलवावे यावर भलताच खल झाला. शेवटी गणपती बाप्पाचा उंदीर मामा उंदरांच्या सभेचा प्रमुख पाहुणा ठरला! साऱ्या उंदीर लोकात बातमी पसरली. उंदरांच्या सभेत प्रमुख पाहुणा गणपती बाप्पाचा उंदीर मामा! मग काय गावात, गल्ली-बोळात, चौका-चौकांत दवंडी पिटवली. सभेची बातमी साऱ्यांना कळवली.

सभेचा दिवस उजाडला. सगळीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. उंदीर नटून-थटून सभेला जमले. काही उंदीर पाहुण्यांना बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिले होते. खूप उत्साह, खूप आनंद उंदरांच्या चेहऱ्यावर दिसत होता. तितक्यात पाहुण्यांची स्वारी आली. गणपती बाप्पाचा उंदीर कसा दिसतो! हे बघण्यासाठी रस्त्यावर नुसती झुंबड उडाली. एका उंदरांच्याच गाडीत बसून पाहुणे आले. पाहुण्या उंदराचा रुबाब एकदम भारी होता. धोतर, जॅकेट आणि डोक्यावर जरीची टोपी होती. ते गाडीत लोडाला टेकून बसले होते. रस्त्यावरच्या उंदरांना हात करीत अभिवादन स्वीकारत होती. पाहुण्यांच्या सोबत उंदीर मामीदेखील आली होती. तिने काळी-निळी साडी नेसली होती. गाडीत उभी राहून उंदीरमामी सगळीकडे बघत होती. जमलेल्या उंदरांना अभिवादन करीत होती. पाहुण्यांची गाडी सभामंडपी आली. पाहुण्यांचा चहा-पाणी, नाष्टा झाला.

नंतर सभेला सुरुवात झाली. हजारो उंदीर नेत्यांचे विचार ऐकू लागले. माईकपुढे हातवारे करीत मोठमोठ्याने चीं चीं चू चू आवाजात आपले भाषण करू लागले. माणसांना आपण घाबरायचं नाही, त्यांना बळी पडायचं नाही, त्रास दिला तर आपण दुप्पट हल्ला चढवायचा. त्यांचे कपडे, पुस्तके, नोटा कुरतडून फस्त करायच्या. पाच-सहा भाषणे झाली. पुढाऱ्यांनी सभा जबरदस्त तापवली. मग प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाला सुरुवात झाली. गणपती बाप्पाच्या उंदीर मामाने पुन्हा एकदा चीं चीं चू चू करीत भाषण केले. साऱ्यांचे त्याने कान उपटले. पाहुणे म्हणाले, “अरे उंदरांनो आपण आहोत महान. समजू नका स्वतःला लहान. माझ्या पाठीवर बसून गणपती बाप्पा फिरतो. रोज माणूस माझ्या कानात त्याचे दुःख सांगतो.” पाहुण्यांचे जबरदस्त भाषण ऐकून सभेत उत्साह संचारला. “उंदीरमामा की जय” अशा घोषणा दिल्या गेल्या. आक्रमक विचारांनी सारी सभा भारावून गेली. सभेच्या उंदरांचे हात काहीतरी करण्यासाठी शिवशिवू लागले. पुढाऱ्यांना वाटले, चला आजची सभा आपण जिंकली! सभा यशस्वी झाली. सारे उंदीर माणसांच्या प्रतिकारासाठी तयार झाले. पाहुण्या उंदीरमामाच्या चेहऱ्यावर मोठा आनंद आणि समाधान दिसत होते.

पण, तेवढ्यात उंदराचं एक छोटसं पिल्लू व्यासपीठावरती आलं आणि माईक समोर उभं राहून चक्क मांजरीसारखा “म्याऊ-म्याऊ” असा आवाज काढू लागलं आणि काय सांगता राव; मग सभेत एकच धांदल उडाली! म्याव म्याव असा आवाज ऐकताच व्यासपीठावरचे सगळे पुढारी, गणपती बाप्पाच्या उंदीरमामासकट एकाच मिनिटात तेथून गायब झाले आणि साऱ्या सभेत एकच गोंधळ उडाला. माणसाला धडा शिकवण्यासाठी ज्यांचे हात शिवशिवत होते, तेच उंदर जीव मुठीत धरून पळू लागले. भलतीच चेंगराचेंगरी झाली. शेकडो उंदीर त्या धावपळीत मरण पावले. पाचच मिनिटांत सारी सभा उधळली गेली. सगळेच उंदीर गायब झाले. आता व्यासपीठासमोर मृत उंदरांचा खच पडला होता आणि माईकवर “म्याऊ म्याऊ” आवाज काढणारं उंदराचं छोटसं पिल्लू अजूनही आवाज काढतच होतं! म्हणतात ना, उंदर काय अन् माणसे काय सगळी सारखीच. शेवटी स्वभाव महत्त्वाचा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -