ख्रिस्तपूर्व ४११ साली अॅरिस्टोफेनेस या ग्रीक विनोदी लेखकाने ‘लिसिस्ट्राटा’ नावाचे एक अजरामर नाटक लिहिले जे आजही पाहावयास मिळते. ‘लिसिस्ट्राटा’ नामक स्त्रीने सातत्याने युद्धाची चटक लागलेल्या आपल्या राज्यातील सैनिकांना लैंगिक बंधन घालून वठणीवर आणल्याची ही एक गंमतीशीर कथा आहे. लिसिस्ट्राटा आणि तिची मैत्रीण कॅलोनिस दोघी चक्क लैंगिक उपासमारीवर बोलताहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे आपले पती आपल्यापाशी नाहीत. ते राजाने सवय लावून दिलेल्या युद्ध मैदानात सातत्याने विजयाच्या उन्मादात जगत असतात. युद्धावरून परतल्यावरच त्यांच्याकडून मिळणाऱ्या कौटुंबिक आणि लैंगिक सुखावर आपण किती काळ काढायचा? या इर्षेने केलेल्या एका लैंगिक उठावाची ही कथा अत्यंत रंजकपणे शेवटी युद्धविरामाकडे घेऊन जाते. युद्धामुळे कुणाचेच भले झालेले नाही. ज्याचा पराजय होतो त्याची अवस्था एखाद्या मांडलिकापेक्षाही वाईट होते. तेथील नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची गणना कदाचित मूल्यांकित होऊ शकेल. मात्र मानसिक आघातांचे परिणाम दूरगामी असतात, हे सांगणारं “लिसिस्ट्राटा” नाटक मराठीत “गजब तिची अदा” या नावाने प्रकाशित झालंय. पद्मश्री वामन केंद्रेनी एका सामाजिक बांधिलकीने या नाट्याची निर्मिती करण्याचा घेतलेला हा निर्णय सद्यस्थितीतील युद्धजन्य परीस्थितीच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा वाटतो.
भारतात सध्या सुरू असलेल्या “भारंगम” या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा नाट्यमहोत्सव सुरू असून त्यात २०२४ वर्षातील सादरीकरणासाठी निवड झालेले हे एकमेव मराठी नाटक आहे. केंद्रेसरांनी मूळ लिसिस्ट्राटाचा चेहरा बदलून त्या जागी भारतीय चेहरा लावलाय. लिसिस्ट्राटा आपल्या मैत्रीण कॅलोनिसच्या सहाय्याने राज्यातील सर्व स्त्रियांना लादल्या गेलेल्या युद्धाचे दुष्परिणाम पटवून आपापल्या पुरुषांना वठणीवर आणण्याच्या शपथेच्या प्रसंगाने “गजब तिची अदा”चे कथानक खऱ्या अर्थाने सुरू होते. लिसिस्ट्राटा राज्यातील पुरुष लैंगिक उपासमारीमुळे वेश्यांकडे जाऊ लागतील हा अंदाज आल्याने ती त्यांनाही समजावते व पुरुषांची कोंडी करते. या उठावाची बातमी राणीपर्यंत जाते व ती आपल्या नवऱ्याला म्हणजेच राजालाही त्याच अटी घालून त्यालाही जेरीस आणते. या लिसिस्ट्राच्या प्रवासात अनेक नाट्यमय प्रसंग नाटकाचा पेहराव भारतीय झाल्याने उत्सुकता निर्माण करतात.
भारतीय स्त्रीवादाची मांडणी करीत असताना ती, भारतीय वर्णव्यवस्था, सामाजिक तथा सांस्कृतिक वास्तव, सद्य राजकीय वास्तव आणि सामाजिक स्वीकृती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर करावी लागते. स्त्रीवादी नाटकांवर आलेली बंधने ही आजच्या समाज व्यवस्थेनेच निर्माण केली आहेत. त्यातही स्त्रीने लैंगिकतेविषयी बोलणे आजही “टॅबू”च मानले जाते. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा त्या काळच्या समाज व्यवस्थेवर जसा होता, तसा तो गेल्या काही काळापर्यंत बघायला मिळंत होता. स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू असून तिच्या भावना-संवेदना दडपण्यात पुरुषप्रधान संस्कृतीने कायम धन्यता मानली आहे. या मानसिकतेला छेद देणारी काल्पनिक उपहासिका लिहिणे सोपी गोष्ट नव्हती. जागतिक साहित्यात हे नाटक जरी ओल्ड काॅमेडी म्हणून जरी गणले गेले असले तरी त्याचे संदर्भ आजही ताजे व पुरोगामी आहेत. कदाचित हेच कारण असावे की ज्यामुळे केंद्रेसरांना हे नाटक लिहून दिग्दर्शित करण्याचा मोह आवरला नसावा. नवविचार देणारी ओल्ड “स्टाईल” ओल्ड काॅमेडी असे या “गजब तेरी अदा”चे वर्णन करता येईल. स्टाईल हा शब्द मुद्दामहूनच अवतरणात लिहिण्याचे कारण म्हणजे मराठीत या शब्दाला रित, पद्धत आणि शैली असा अर्थ प्राप्त होतो. गजब तेरी अदा हे नाटक कुठल्या रीतीने सादर व्हावं, कोणत्या पद्धतीत बसवावं आणि कुठली शैली वापरावी या एकत्रित अभ्यासानुसार दिग्दर्शित केलं गेलंय. आताच्या पिढीला नाटकाची “स्टाईल” पाहून वाटू शकतं की अशा आऊटडेटेड सादरीकरणाची गरज आहे का? तर आम्हा अभ्यासकांचे उत्तर “ती गरज आहेच” असेच असेल. कारण स्टाईलला अभिप्रेत असलेल्या तीनही (रित, पद्धत, शैली) भारतीय मूलतत्त्वांचा तो अभ्यास आहे.
तसं पाहायला गेलं एक साधे, सोपे, सरळ कथानक संगीतमय निवेदन शैलीने आपल्या समोर सादर होते आणि संपते; परंतु त्या मधल्या अनुभूतीची रित तुम्हाला जे विचार करायला भाग पाडते त्यात दृष्यात्मकतेचा सर्वांगाने केला गेलेला विचार हा दिग्दर्शकीयच ठरतो. नाटकाचे अॅस्थेटिक्स वाढवणारे नेपथ्य, प्रकाशयोजना, कोरिओग्राफी, वेशभूषेसाठी जरी जबाबदार व्यक्ती असल्या तरी त्या एक पद्धती दिग्दर्शकीय विचारांपुढे गौण आहेत. राजाची भूमिका सादर करणारा ऋत्विक केंद्रे व महिलांचे नेतृत्व करणारी करिश्मा शामकांत देसले हे दोन्ही कलावंत भविष्यकाळात मराठी रंगभूमीला या नाटकाच्या निमित्ताने प्राप्त झालेले एक वरदान ठरावे. जवळपास पन्नासहून अधिक नटसंच असलेल्या नाटकाबाबत निर्माते दिनू पेडणेकर, श्रीकांत तटकरे आणि गौरी केंद्रे यांचे अभिनंदन करावेच लागेल. २०१४ साली हे नाटक हिंदीमध्ये बघण्याचा योग आला होता. दिल्लीला हे नाटक एन.एस.डी.च्या रेपर्टरीद्वारा सादर केले जाई. त्यावेळी भारावून जाऊन बघितलेली त्या नाट्याची दृष्यात्मकता आणि “गजब तेरी अदा”ची अदाकारी आलेख उंचावणारीच आहे, यात शंका नाही.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…