संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणाऱ्या ठरावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची अक्षरश: धुलाई केली. लोकसभेच्या निवडणुका जेमतेम दोन-अडीच महिन्यांवर अपेक्षित आहेत. अशा वेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत झालेल्या चर्चेत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी राजकीय भाषणे केली आणि मोदी सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानली. आपल्या पक्षाच्या व आपल्या सरकारच्या कोणी वाट्याला गेल्यावर मोदी काय शांतपणे ऐकून घेतील असा कोणी समज करून घेत असेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरतात असेच म्हणावे लागेल.
मोदींनी आपल्या भाषणात ‘अबकी बार ४०० पार’चा दावा केला. संसदेत तसा दावा करण्याची हिम्मत दाखवली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे ३७० आणि एनडीएचे मिळून ४०० पेक्षा अधिक खासदार निवडून येतील अशी फोडही करून सांगितली. स्वत: पंतप्रधानांनीच संसदेत असा दावा केल्याने काँग्रेस व डाव्या पक्षांचे पित्त खवळले. त्यांच्या पायाखालची वाळूच घसरली. भविष्यात कसे होणार, येणाऱ्या निवडणुकीनंतर आपण कुठे असणार, आपले व आपल्या पक्षाचे काय होणार या चिंतेने काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना ग्रासले आहे.
काँग्रेसचे नेते मोदी सरकारच्या विरोधात जो दिल्लीत थयथयाट करीत आहेत तसाच हल्ला-गुल्ला उबाठा सेनेने महाराष्ट्रात चालवला आहे. मोदींचे भाषण शंभर मिनिटांचे होते. त्यात त्यांनी सर्वाधिक टार्गेट काँग्रेस पक्षाला व घराणेशाहीला केले. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने २००४ ते २०१४ या दहा वर्षांत काय केले व भाजपाप्रणीत एनडीए सरकारने गेल्या दशकांत काय केले, असा तुलनात्मक आलेखच त्यांनी मांडला. भ्रष्टाचार, रोजगार, महिला, शेतकरी, महागाई, पर्यटन अशा विविध मुद्द्यांवर आपल्या सरकारने कशी वेगवान प्रगती केली हे त्यांनी अभिमानाने सांगितले.
एकच प्रॉडक्ट अनेकदा लॉँच केल्यामुळे काँग्रेसला दुकान बंद करण्याची वेळ आली आहे, त्यांच्या घराणेशाहीचा फटका काँग्रेसबरोबर देशालाही बसतो आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर आसूड ओढले. संसदीय लोकशाही कार्यपद्धतीत संसदेत राष्ट्रपतींचे अभिभाषण व राज्यातील विधिमंडळात राज्यपालांचे अभिभाषण हा महत्त्वाचा दस्तऐवज असतो. अभिभाषणाचा मसुदा हा सरकार तयार करते, केलेल्या कामाचा आढावा व नवीन कामाचा अजेंडा याचे प्रतिबिंब अभिभाषणात असते. खरे तर अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षाला सरकारवर टीका करण्याचा जरूर अधिकार आहे, पण जनतेसाठी आणखी काय करायला हवे हे विरोधी पक्षाने सांगावे अशी अपेक्षा असते.
प्रत्यक्षात मोदी सरकारला शत्रू मानणाऱ्या विरोधी पक्षाने चर्चेत नुसता हल्लाबोल चालवला होता. निवडणुकीच्या मैदानात करायची भाषणे विरोधी पक्षाने संसदेत केली. त्यामुळे अभिभाषणावरील चर्चा ही राजकीय जास्त झाली, पण या चर्चेला मोदी पुरून उरले व त्यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची पिसेच काढली. महिला, युवा, गरीब, शेतकरी, मच्छीमार, पशुपालक यांच्या सक्षमीकरणाने देश विकसित होईल, असा मुद्दा पंतप्रधानांनी मांडला. सतत व्होट बँकेची काळजी असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अल्पसंख्य कुठे आहे, असा प्रश्न केला. मग मात्र मोदींचा पारा चढला. किती दिवस देशाचे तुकडे पाडणार असा खडा सवाल यांनी काँग्रेस पक्षाला विचारला तेव्हा त्या पक्षाचे खासदार चिडीचूप झाले.
संसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष हा मजबूत असला पाहिजे, तशी भारतातही गरज आहे. पण सक्षम विरोधी पक्ष बनण्याची संधीही काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत गमावली हे वास्तव मोदींनी आपल्या भाषणातून मांडले. काँग्रेस पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली नाही, नव्या पिढीकडे सूत्रे सोपवली नाहीत, तेच चेहरे व नेतृत्व करणारी तीच घराणेशाही यात पक्षाचे अतोनात नुकसान झाले तरी काँग्रेस काही बोध घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वत: मल्लिकार्जून खरगे यांना राज्यसभेत का जावे लागले, गुलाम नबी आजाद यांना काँग्रेस पक्ष सोडण्याची का पाळी आली, हे प्रश्न पंतप्रधानांनीच काँग्रेसला विचारले आहेत. आपण सत्तेवरच आहोत, आपण म्हणजे सरकार आहोत, अशा मानसिकतेत काँग्रेस आजही वावरत आहे, हाच पक्षाला मोठा धोका आहे.
धराणेशाहीला विरोध म्हणजे एकाच कुटुंबातील अनेकांनी स्वबळावर केलेल्या प्रगतीला विरोध नव्हे हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. घराणेशाहीच पक्ष चालवत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे हे मोदींनी स्पष्ट केले. अमित शहा किंवा राजनाथ सिंग यांच्या कुटुंबातील कोणीही पक्ष चालवत नाही, अशी दोन उदाहरणे मोठ्या खुबीने पंतप्रधानांनी दिली. या दोन्ही नेत्यांची मुले सार्वजनिक जीवनात सत्ता पदांवर आहे म्हणून विरोधी पक्ष नेहमीच घराणेशाहीच्या नावाने टीका करीत असतो. पण त्यांची मुले स्वबळावर पुढे आली आहेत हे मोदींनी लक्षात आणून दिले. त्यांची मुले पक्ष चालवत नाहीत हे सांगितले. गरिबांसाठी घरे, रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरण, किंवा गरिबांना घरगुती गॅस असा केंद्राच्या योजनांचा देशातील कोट्यवधी लोकांना लाभ झाला त्याची यादीच पंतप्रधानांनी दिली पण काँग्रेसच्या कार्यपद्धतीप्रमाणे हेच काम करायचे झाले, तर आणि चार पिढ्या लागल्या असत्या अशीही त्यांनी खिल्ली उडवली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींच्या लोकप्रियतेचा देशातील विरोधी पक्षाने मोठा धसका घेतला आहे. विरोधी पक्षांतील अनेक जण सुरक्षित मतदारसंघ शोधत आहे, कोणी राज्यसभेवर जाण्यास उत्सुक आहे, कोणी निवडणूक लढवायलाच नको असे म्हणते आहे. आता विरोधी पक्षाला सभागृहात नाही तर निवडणुकीनंतर प्रेक्षा गॅलरीत बसावे लागेल, अशी भविष्यवाणी पंतप्रधान मोदींनी उच्चारली तेव्हा विरोधी बाकांवर बसलेल्या अनेकांची चिंता वाढली…