हलकं-फुलकं: राजश्री वटे
संताची चाहूल लागते… आंब्याच्या झाडावरून कोकिळेची मंजूळ तान साद घालते… पिवळ्या मोहरानं बहरलेलं आंब्याचं झाड, जवळून गेलं तरी आंब्याचा वास नाकात घमघमतो…
(आला गं… बाई आला गं…)
रस्त्याच्या दुतर्फा पिवळा बहावा फुलला आहे… जणू झुंबरं लटकली आहेत सोनेरी… अंबराला!
कडुनिंबाच्या झाडाला छोटी-छोटी चांदण्यांसारखी फुलं टोकाला डोलताहेत… निंबोणी धरायच्या आधी… त्याचा जरासा कडूसर आंबूस वास वातावरणात पसरलेला!
पिवळा धम्म सोनचाफा… तुझं रूपच नाजूक… झुळझुळणारं… आणि तुझा दरवळ… सुगंधमय ऐश्वर्य… सोन्यासारखा तुझा भाव!!
गंध फुलांचा गेला सांगून…
खरंच, हा गंध फुलांचंं मनोगत सांगतो जणू!
वा! वा! वसंता… तुझं असं पिवळं सोनसळी रूप… अन् चंदनासारखं दरवळणं… आसमंत गंधाळून जातं… ही तुझी श्रीमंती भारावून टाकते मनाला!
चाफ्याचंं बहरणं जरा हटके… डोक्यावर उंच तुरे घेऊन फुलायचं गुच्छा-गुच्छाने… पानगळती झाल्यावरही… वेगवेगळे म्हणजे लाल, पिवळा, पांढरा असे अनेक रंग लेवूनसुद्धा… स्थितप्रज्ञ!!
खरंच का, चाफा बोलेना, चाफा चालेना…! पण फुलला आहे मात्र मनसोक्त!
लाल गुलमोहराची तर शानच वेगळी. झाड लालचुटूक फुलांनी डवरतंं अन् पायथ्याशी गालीचा… रेड कार्पेट… शानदार मखमली… याचं दिसणंंच देखणं… राजेशाही!!
दुतर्फा बहावा आणि गुलमोहराची झाडं… लाल-पिवळी बहरलेली असतात. त्यावेळी हळदी-कुंकू सजवलंय जणू… असा पवित्र आभास निर्माण होतो सृष्टीमध्ये!
उंचच उंच दरवळणाऱ्या फुलांमध्ये जमिनीशी लगट करत फुलणारा शुभ्र मोगरा, वसंत आणि ग्रीष्माच्या वेशीवर स्वागताला हजर असतो… सुगंध लेवून…
मोगरा फुलला… मोगरा फुलला!!
अरे पळसा… या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का…? तुझ्या लालभडक फुलांचंंं रूपच जरा आगळं-वेगळं, तुझ्या या रंगावर भाळली आहे दुनिया… तुझं पाण्यात भिजून, त्या पाण्याला तुझा रंग देणं ही वेगळीच किमया तुझी!!
रंगपंचमीला तुला भारी भाव…
खेळताना रंग बाई होळीचा… होळीचा!
असं आसमंत सुगंधी करत जाणारी ही फुलं, आपला सुवास, रूप, देखणेपण मिरवत वसंतोत्सव साजरा करत असतात… लाल-पिवळा रंगसंगती असलेल्या फुलांच्या फुलण्याने दरवळणाऱ्या आसमंताच्या साक्षीने नव्या नवरीच्या पावलांनी चैत्रगौर अवतरते… आंब्याचा, मोगऱ्याचा सुगंध लुटायला…
जाईन विचारीत रानफुला…
भेटेल तिथे गं सजण मला…
मग… चैत्रही खुलतो, बहरतो, ढोलताशाने दुमदुमून जातो!
फुलले रे क्षण माझे… फुलले रे!!!