Saturday, April 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमुलीने घेतला गळफास; वडील नि भाऊ तुरुंगात!

मुलीने घेतला गळफास; वडील नि भाऊ तुरुंगात!

क्राइम: ॲड. रिया करंजकर

काळ बदलतो तसं माणसं आणि त्याचा स्वभाव, राहणीमान या सगळ्या गोष्टी आपोआप बदलत जातात. ४० वर्षांपूर्वी मोबाइल, टीव्ही यासारखी मनोरंजन करणारी साधने जेव्हा उपलब्ध नव्हती, तेव्हा माणूस एकत्र वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवत होता. पण काळ बदलत गेला आणि मनोरंजनाची साधने वाढत गेल्यानंतर माणूस माणसापासून तुटू लागला. लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांची शाळा मोबाइलमध्येच भरत होती. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर मुलं मोबाइलच्या अक्षरश: आहारी गेली व या सर्वामुळे मुलांची मानसिकता बदलत चाललेली आहे. जन्मदाते आई-वडील असताना ते आपले सर्वात मोठे शत्रू आहेत, असे वाटायला लागले. आई-वडील मोबाइल देत नाही म्हणून केलेली आत्महत्या, दोन दिवसांपूर्वीच मुलगा सतत मोबाइलमध्ये असतो, मस्ती करतो, ऐकत नाही म्हणून वडिलांनीच विष देऊन मुलाची केलेली हत्या, अशा अनेक बातम्या आपल्याला ऐकायला येतात.

मोबाईल हातात आल्याने शाळेत न-कळत्या वयातही मुलांची प्रेमप्रकरणे चालू झालेली आहेत. त्यामुळे नको त्या गोष्टीत लक्ष जास्त, असं मुलांचं अभ्यासावरील मन उडत चालले आहे. स्नेहा ही सातवीत शिकणारी हुशार मुलगी होती. महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होती. आई-वडील हे दोघेही कष्ट करून दोन वेळेच्या अन्नाचा बंदोबस्त करत होते. हातावर पोट असणारे कष्टकरी कुटुंब होते. स्नेहा, तिचा भाऊ आणि आई-वडील असे चौकोनी कुटुंब सुखात नांदत होतं. स्नेहाला वाटायचं आपण चांगला अभ्यास करावा, मोठा बनावं आणि आपल्या आई-वडिलांचे नशीब बदलावं अशी तिची इच्छा होती. ती सतत म्हणायची ‘मी मोठी ऑफिसर बनणार, मी मोठी ऑफिसर बनणार.’

आई-वडिलांनाही बरं वाटायचं की, आपली मुलगी फार हुशार आहे. मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, तर खरंच आपल्या घरची परिस्थिती बदलेल. पण स्नेहा हल्ली अभ्यास करत नव्हती. सतत तिचं लक्ष मोबाइलमध्ये असायचं. यावरून वडिलांनी अनेकदा तिला ओरडा दिलेला होता. आई-वडील कामावर गेल्यानंतर शाळेतून येऊन घरातलं सगळं आवरून अभ्यास करणारी मुलगी मात्र आता बदललेली होती. शाळेतून आल्यावर घरचा पसारा तसाच असायचा. अभ्यासही केलेला नसायचा, म्हणून एक दिवस आई-वडील दोघेही तिला ओरडले होते. रात्रीचे जेवण झाल्यावर सगळे झोपी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे वडील कामावर जाण्यासाठी सकाळी ५ वाजता उठले आणि बघतात तर काय किचनच्या ओट्याला उभे राहून स्नेहाने फाशी घेतली होती.

आपल्या मुलीने काय केले म्हणून धक्का बसून ते मोठ्याने ओरडले असता, मुलगा व बायको दोघेही जागे झाले आणि आपली बहीण जिवंत आहे याचा भास झाला म्हणून स्नेहाचा भाऊ व वडिलांनी तिला फासावरून खाली उतरवले.  स्नेहा जिवंत आहे, फासावरून उतरवलं नाही, तर तिचा जीव जाईल हा विचार त्यांनी केला. तोपर्यंत शेजारच्या कुणीतरी पोलिसांना माहिती दिली होती आणि पोलीस तिथे आले होते. तिला फासावरून खाली उतरवलं म्हणून स्नेहाच्या वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एवढ्या लहान वयात स्नेहाने हे पाऊल का उचलले? हा सर्वांसाठी एक मोठा प्रश्नच होता. पण आपली बहीण, आपली मुलगी जिवंत असेल या उद्देशाने फासावरून खाली उतरवणाऱ्या भावाला आणि वडिलांना मात्र पोलिसांच्या ताब्यात जावं लागलं. आपण करत असलेला हा फार मोठा गुन्हा आहे ही त्यावेळी त्या दोघांच्या ध्यानात आलं नाही. स्नेहाला वाचवावं हेच फक्त त्यांचे उद्दिष्ट होतं. स्नेहाने फाशी का घेतली? हा प्रश्न बाजूलाच राहिला आणि सरळ मनाच्या वडिलांना आणि भावांना मात्र तुरुंगात जावं लागलं. घरची परिस्थिती बदलण्याची स्वप्न बघणारी मुलगी, पण आता मात्र तिच्या चुकीच्या पावलामुळे घर उद्ध्वस्त झालेलं होतं. (सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -