हैदराबाद: भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात २८ धावांनी पराभव सहन करावा लागला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला विजयासाठी चौथ्या डावात २३१ धावांची आवश्यकता होती. मात्र त्यांना हे आव्हान पूर्ण करता आले नाही.
भारतीय संघाची दुसऱ्या डावातील सुरूवात संथ राहिली.यशस्वी जायसवाल आणि रोहित शर्माने मिळून पहिल्या विकेटसाठी ४२ धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यात खेळणार टॉम हार्टलेने यशस्वीला बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. हार्टलेने त्यानंतर शुभमन गिल, कर्णधार रोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांना बाद करत भारताचे टेन्शन वाढवले. केएल राहुल ज्यो रूटचा बळी ठरला. त्यानंतर रवींद्र जडेजाला बेन स्टोक्सने बाद केले.
श्रेयस अय्यरकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र तो लीचच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. ११९ धावांवर सात विकेट गेल्यानंतर केएस भरत आणि आर अश्विन यांच्यात ५७ धावांची भागीदारी झाली. असे वाटत होते दोघे भारताला विजय मिळवून देऊ शकतात. मात्र पुन्हा एकदा टॉम हार्टलेने त्यांना पॅव्हेलियनमध्ये धाडत भारताच्या आशांवर पाणी फिरवले.
चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी ओली पोपने शानदार १९६ धावा ठोकल्या. त्याने २७८ बॉलमध्ये २१ चौकार ठोकले. पोपशिवाय बेन डकेटने ४७ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार आणि आर अश्विनने ३ विकेट घेतल्या. इंग्लंडने पहिल्या डावात २४६ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारावर भारताला दुसऱ्या डावात १९० धावांची आघाडी मिळाली होती.