Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखपंतप्रधान मोदींनी घडवला इतिहास...

पंतप्रधान मोदींनी घडवला इतिहास…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

दिनांक २२ जानेवारी २०२४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या साक्षीने दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली, या क्षणाची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर नरेंद्र मोदींनी रामलल्लासमोर साक्षात दंडवत घातला. त्या क्षणाला देशभर फटाक्यांची आतषबाजी झाली. गावागावांत आणि शहरात नाक्या-नाक्यावर नि चौकाचौकात लाडू, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्वत्र ‘जय श्रीराम’ अशा घोषणांनी सारा देश दुमदुमून गेला. पाचशे वर्षे वनवासात असलेल्या श्रीरामाला त्याच्या जन्मभूमीच्या जागेवर हक्काचे घर मिळाले. मोदींनी पुढाकार घेऊन प्रभू रामचंद्राचे भव्य-दिव्य मंदिर उभारले. “कालचक्र बदल रहा हैं”, हा संदेश एकशे चाळीस कोटी भारतीयांचे जननायक ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व जगाला दिला. राम जन्मभूमीवर रामलल्लाच्या झालेल्या शानदार प्राणप्रतिष्ठापनेच्या दिमाखदार सोहळ्याने प्रत्येकजण सुखावला.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असाच देशभर उत्स्फूर्तपणे साजरा झाला होता. तेव्हा देशभर सर्वत्र भारताचा तिरंगा घरोघरी फडकताना दिसला. या वर्षी २२ जानेवारीला घराघरांवर, चाळीत, टॉवर्समधील फ्लॅटवर, मोटार, टेम्पो, ट्रक्स, रिक्षा-टॅक्सी, बसेसवर प्रभू रामचंद्राचे चित्र असलेले भगवे ध्वज फडकताना दिसत होते. श्रीमंताच्या बंगल्यांपासून ते झोपडपट्टीपर्यंत सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. २२ जानेवारीला तर तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे रामभक्त होऊन रामाचे चित्र असलेले झेंडे बाईक्सवर फडकवत मिरवणुका काढताना दिसत होते. राम मंदिर, हनुमान मंदिर व अन्य मंदिरांवरही रामाचे झेंडे फडकताना दिसले व तेथे पूजा-अर्चा, प्रसाद वाटप झाले. देशभर सर्व राममय वातावरण होते व आजही आहे. याचे श्रेय राम मंदिर उभारणाऱ्या हातांना आहे, वर्षानुवर्षे आंदोलन करणाऱ्या लक्षावधी कारसेवकांना आहे, ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले, त्या हुतात्म्यांना आहे, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत चिकाटीने वर्षानुवर्षे कायदेशीर लढा दिला, त्या रामसेवकांना आणि कायदे पंडितांना आहे आणि ज्यांनी बाबरी मशिदीवर चढून ती उद्ध्वस्त केली त्यांना तर आहेच आहे.

अयोध्येत राम जन्मभूमी अतिक्रमणातून मुक्त करणे व तेथे प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभारायचे हा भारतीय जनसंघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष, संघ परिवाराचा अगदी सुरुवातीपासूनच अजेंडा होता. काँग्रेसने या देशावर सहा दशकांहून अधिक काळ सत्ता उपभोगली, पण काँग्रेसने राम मंदिर उभारू असे कधीच म्हटले नाही. जनतेच्या मनात काय आहे, हे काँग्रेसला कधीच कळले नाही आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरल्यामुळे राम मंदिर व रामलल्ला यांच्याविषयी काँग्रेसला कधीच काही वाटले नाही. पण भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राम मंदिर हा मुद्दा नेहमीच आघाडीवर ठेवला. “मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नही बताऐंगे”, अशी विरोधी पक्षांनी भाजपाची नेहमीच टिंगल केली. पण जे शक्य वाटले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आणि अयोध्येत राम मंदिर उभारणीचे स्वप्न साकारले. दि. ६ डिसेंबर रोजी अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली तरी त्यापूर्वीपासून कित्येक वर्षे राम मंदिराचा लढा चालूच होता.

अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका।
पुरी द्वारावती चैव सप्तैताः मोक्षदायिकाः॥
अयोध्या, मथुरा, माया म्हणजेच गया (हरिद्वार), काशी (वाराणसी), कांची, अवंतिकापुरी (उज्जैन), द्वारवती (द्वारका) ही सात नगरे मोक्ष देणारी असून, ही हिंदूंची सात आस्था, श्रद्धास्थळे आहेत. त्यातील अयोध्या येथे राम जन्मभूमी रक्षणासाठी ७६ वेळा तरी संघर्ष, लढाई, युद्ध झाले. हजारो संत, साधू, महंत व रामभक्तांनी बलिदान केले. १९९० मध्ये कामसेवक समिती स्थापन झाली. १९९१ मध्ये राम जन्मभूमी आंदोलन तीव्र झाले. तेव्हा कारसेवकांवर गोळीबार झाला. सपाचे सरकार असताना, मुख्यमंत्री मुलायम सिंग यांच्या कारकिर्दीत पोलिसांनी कारसेवकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात शरयू नदी अनेकदा रक्तरंजित झाली. अल्पसंख्याकांच्या मतांसाठी हिंदूंवर गोळीबार केला गेला, हे वास्तव होते. पोलिसांना न जुमानता, प्राणाची पर्वा न करता, हजारो कारसेवक ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी ढाच्यावर चढले व ढाचा उद्ध्वस्त केला. आपल्याच देशात, आपल्या भूमीवर राम जन्मभूमीसाठी वर्षानुवर्षे आंदोलन करावे लागले, हीच मोठी शोकांतिका होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला, कोट्यवधी रामभक्तांना न्याय मिळवून दिला, हे त्यांच्या शत्रूलाही मान्य करावेच लागेल.

डिसेंबर १९९२ ते ऑगस्ट २०१९ या काळात राम जन्मभूमीसाठी अगदी सर्वोच्च न्यायालापर्यंत निकराचा लढा द्यावा लागला. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर हिंदुत्वाचा अजेंडा म्हणून राम मंदिराचा मुद्दा खऱ्या अर्थाने पुढे आला. ६ मार्च १९८३ रोजी मुजफ्फरनगर येथे हिंदू जागरण मंचचे अधिवेशन झाले. त्यात अयोध्येतील राम जन्मभूमी, मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिर (अतिक्रमण) मुक्त करण्यात यावे असा ठराव करण्यात आला. १९८४ मध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात हिंदू साधू संमेलन झाले व त्यात या ठरावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. १९८४ मध्ये प्रयागराजमध्ये तत्कालीन सरसंघचालकांनी राम जन्मभूमी किती दिवस बंद राहणार, असा प्रश्न विचारला होता. नंतर दिल्लीत झालेल्या धर्मसंसदेत संतांनी राम जन्मभूमीचा मुद्दा उपस्थित केला. त्याच वर्षी राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती स्थापन झाली. दि. १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद जिल्हा न्यायाधीश के. एम. पांडे यांनी अॅड. उमेशचंद्र यांच्या अर्जावर निकाल देताना वादग्रस्त जागेवर हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली. त्यानंतर ६ फेब्रुवारी १९८६ रोजी बाबरी मशीद कृती समिती स्थापन झाली. त्या दिवसात राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेकडे होते. जून १९८९ मध्ये पालमपूर येथे झालेल्या अधिवेशनात भाजपाने राम जन्मभूमी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आणि राम मंदिराच्या मुद्याला चालना मिळाली.

१९८५ मध्ये लोकसभेत भाजपाचे केवळ दोन खासदार होते. राम मंदिरावर भाजपाने आंदोलन सुरू केले व त्याचा फार मोठा राजकीय लाभ भाजपाला मिळाला. किंबहुना राम मंदिराने भाजपाला दिल्लीची सत्ता काबीज करण्याच्या मार्गावर नेले. १९८९ मध्ये भाजपाचे लोकसभेत ८५ खासदार निवडून आले. भाजपाने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावरच विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे १२० खासदार निवडून आले, तर त्याच वर्षी झालेल्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे २२१ आमदार विजयी झाले. १९९१ मध्ये केंद्रात नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे, तर उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार होते. कल्याण सिंह सरकारने १९९२ मध्ये राम कथा पार्क उभारण्यासाठी ४२ एकर जमीन एक रुपया भाड्याने ९९ वर्षांच्या कराराने दिली. कल्याण सिंह यांनी वादग्रस्त जागेवर काहीही होणार नाही, असे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले होते, पण दुसरीकडे, ‘एक धक्का और दो, बाबरी मस्जीद तोड दो’, अशा कारसेवकांच्या घोषणांच्या गजरात बाबरी उद्ध्वस्त झाली.

या घटनेने लखनऊ व दिल्लीलाच नव्हे; तर देशाला हादरा बसला. कल्याण सिंह यांनी लालकृष्ण अडवाणींना फोन केला, “माझ्यासमोर आता कोणताही पर्याय उरलेला नाही, मी राजीनामा देत आहे”, असे सांगितले. विनय कटियार यांनी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “जो हुआ वो अच्छा नही हुआ…” बाबरी पाडली जात असताना पोलीस सुरक्षा दले शांत होती. ६ डिसेंबरला बाबरी पडली. दि. ८ डिसेंबरला लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विष्णू हरी डालमिया, अशोक सिंघल, उमा भारती, विनय कटियार यांना अटक झाली. या सर्वांना माता टिला डॅम ललितपूरच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले होते. त्यानंतर काही दिवसांतच ललितपूरच्या न्यायालयाने त्यांची सुटका केली. बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर उत्तर प्रदेशची निवडणूक काशीराम व मुलायम सिंह यादव यांनी (बसपा व सपा) यांनी एकत्र येऊन लढवली. त्या निवडणूक प्रचारात, “मिले मुलायम सिंह-कांशीराम, हवा में उड गयें जय श्रीराम…” अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. राम मंदिराविषयी किती द्वेष आणि मत्सर विरोधकांचा होता त्याचे हे उदाहरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली, त्यालाही अनेकांचा विरोध होता. जे विरोध करणारे आहेत, त्यांनी राम मंदिरासाठी काय केले? हे जनतेपुढे येऊन सांगावे.

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मोदींनी ११ दिवस अनुष्ठान केले, उपवास केला. अन्न व पाणी घेतले नाही, केवळ नारळाचे पाणी घेऊन व्रत केले. रोज जमिनीवर खाली चादर टाकून ते झोपत होते. रोजची कामे व दौरे यांत मात्र खंड पडला नाही. १२ जानेवारी- नाशिकला काळाराम मंदिर (महाराष्ट्र), १६ जानेवारी- वीरभद्र मंदिर लेणाक्षी (आंध्र प्रदेश), १७ जानेवारी- गुरूवाचूर मंदिर, त्रिपयार, श्रीराम मंदिर (केरळ) २० जानेवारी – अरूमिल्गु रामनाथ स्वामी मंदिर, रामेश्वरम, रंगनाथ स्वामी मंदिर, श्रीरंगम त्रिची (तामिळनाडू), २१ जानेवारी – कोदंड रामस्वामी मंदिर, धनुष्यकोडी (तामिळनाडू) अशा मंदिरांत जाऊन त्यांनी दर्शन घेतले. आजवरच्या कोणत्याही पक्षाच्या सरकारच्या पंतप्रधानांना शक्य झाले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले. कोट्यवधी भारतीयांचे राम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न साकार केले. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवर अगोदर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी नंतर मोदींवर स्तुतिसुमने उधळली. “मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंचा अभिमान जागा झाला, मोदींची हिम्मत कौतुकास्पद आहेच, पण हिंदूंच्या पाठीशी उभे राहणारा असा पंतप्रधान देशात झाला नाही”, अशा शब्दांत त्यांनी प्रशंसा केली आहे.
जय श्रीराम…

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -