सेवाव्रती: शिबानी जोशी
स्थान, मान, पद, प्रतिष्ठा याकडे लक्ष न देता मला माझे काम करायचे आहे, या एकाच भावनेने पछाडलेले, मालूताई जोशींसारखे तपस्वी लोक आपल्या देशात आहेत. म्हणूनच लोककल्याणाची इच्छा धरून उत्पत्ती झालेले आपले राष्ट्र उन्नत होत आहे. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश केवळ त्यांचा सत्कार एवढाच नसून त्यांच्या तपाची आपल्याला ओळख व्हावी, त्या मार्गावर थोडे का होईना… चालण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांनी दाखवलेला कर्मयोग आपणही यथाशक्ती आचरावा हाच आहे. भक्ती, समर्पण, आपलेपण यातूनच अशा संस्था निर्माण होतात. संस्था वाढते ती कार्यकर्त्यांमुळे! हे ‘मी’ माझ्यामुळे झाले असे न मानता केवळ परमेश्वरी योजनेतला एक दुवा एवढेच मानून मालूताई जोशींसारखी माणसे काम करतात असे गौरवोद्गार सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत यांनी ज्यांच्याबद्दल त्यांच्या पंचाहत्तरीला काढले, त्यांनी जे काम केले त्या संस्थेची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
सांगली इथल्या संघ कार्यकर्ते असलेल्या जोशी दाम्पत्याने ४५ वर्षांपूर्वी औद्योगिक वसाहत, सांगली येथे स्वतःचे वर्कशॉप सुरू केले होते आणि सोयीसाठी जवळचे पंचशील नगर येथे जागा घेऊन घर बांधले. त्यावेळी पंचशील नगर हा भाग पुढारलेला नव्हता. एका बाजूला लांबपर्यंत उसाची शेती आणि तिन्ही बाजूंना शेतमजूर, कामगार, हमाल यांच्या झोपड्या होत्या. दिवसभर कष्टकरी आई-बाप कामावर जायचे. रोजगार जाऊ नये म्हणून लहान बाळांना नाईलाजाने अफू घालून वयाने थोड्याशाच मोठ्या भावंडांवर सोपवून आई कामावर जायची. वडील संध्याकाळी दारूच्या नशेतच घरी आल्यावर पत्नीला मारहाण, शिव्या, भांडणं हेच त्या लहानग्या जीवांना दिसायचे. रोजचे हे दृश्य पाहून जोशी दाम्पत्याला फार वाईट वाटायचे. ज्यांचे स्वतःचे जगणे सुखरूप नाही ते इतरांना सुखाने कसे जगू देणार? त्यांना मुद्दाम ठरवूनच ‘घडवायला’ हवे या ध्यासातून रोज संध्याकाळी त्या मुलांना शुभं करोति आणि पाढे शिकवायच्या.
अस्वच्छ आणि खरूज झालेल्या मुलांना औषधपाणी करून आंघोळ घालून घरी पाठवायच्या. मोठी मुले शाळेत जायला लागल्यावर दिवसभर लहानग्यांना सांभाळायच्या.दरम्यान १९७९-८० मध्ये प्रौढ शिक्षण वर्ग चालवून बऱ्याच महिलांना त्यांनी साक्षर केले. त्यांना शिवणकाम, विणकाम, पापड करणे, मोत्यांचे दागिने करणे वगैरे कोर्सेस देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. दहा बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना एकत्र आणले आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून दिले. हे सगळे करत असतानाच जुलै ८२ मध्ये त्यांनी ‘श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ’ ही रजिस्टर्ड संस्था स्थापन केली आणि लहान मुलांसाठी पाळणाघर, अभ्यासिका, संस्कार वर्ग हे काम वैयक्तिक पातळीवरून संस्था पातळीवर सुरू झाले.
समाजातील समविचारी मंडळींना सोबत घेऊन त्यांच्या मदतीने संस्थेचे कार्य आणखी जोमाने सुरू केले. राष्ट्राचा उद्याचा नागरिक हा सुसंस्कारित, दीर्घोद्योगी, चारित्र्यसंपन्न असावा आणि तो घडवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे या भावनेतून संस्थेच्या बीजाचा आज वृक्ष झाला आहे. संस्थेने असंख्य मुलांना आजवर जगायची ताकद दिली आहे. उदाहरण द्यायचे तर अगदी अशक्त अवस्थेत घरी आलेल्या रेखाताईंना जोशीताईंनी स्वतःच्या घरी अडतीस वर्षे सांभाळले. किंवा जत सारख्या दुष्काळी प्रदेशातून आलेल्या दोघी जावा आणि त्यांची चार मुले असतील किंवा संगीतासारखी एखादी मतिमंद मुलगी असेल, फातिमासारखी एखादी निराधार स्त्री असेल… सर्वांना आधार दिला आहे. हे सगळे करताना खूप अडचणी आल्या, अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरी न डगमगता त्यांनी आपले समाजसेवा हे व्रत सुरू ठेवले. संस्थेत संगोपन झालेल्यांपैकी अनेकजण यशस्वी उद्योजक झाले आहेत. शिक्षणाधिकारी पदापर्यंतसुद्धा पोहोचले आहेत. हे विद्यार्थी आजही संस्थेशी संपर्कात असतात आणि संस्थेने त्यांच्यावर घडवलेल्या संस्कारांमुळेच ते संस्थेसाठी मदत करायलाही तत्पर असतात.जेव्हा हे कार्य जोशींनी पंचशील नगर भागात सुरू केले तेव्हाची तिथली परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात खूप फरक आहे. आता तेथील रहिवाशांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.
आज मुलांच्या हातात मोबाइल आले, अनावश्यक अनेक गोष्टींचे ज्ञान उमलत्या वयातच मिळायला लागले. व्यायाम, मैदानी खेळ कमी व्हायला लागलेत. आजच्या मुलांना चांगले आदर्श डोळ्यांसमोर नाहीत, आपली उज्ज्वल परंपरा माहीत नाही, सण उत्सव यांचे स्वरूपही बदलत चालले आहे. तरुण पिढीसमोर वेगळी आव्हाने आहेत. त्यामुळेच आजही मालूताई जोशींच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ’ या संस्थेचे काम पाळणाघर आणि संस्कार वर्ग या दोन मुख्य कार्यक्षेत्रात सुरू आहे. संस्थेच्या पाळणाघरात एक ते पाच वयोगटातले १०० विद्यार्थी, दहा ते पाच या वेळेत आई-वडील विश्वासाने सोडून जातात. दूध, सात्त्विक चौरस आहाराबरोबरच खेळ, गाणी-गोष्टी यांतून त्यांच्या सुदृढ व्यक्तिमत्त्वाचा पाया रचला जात आहे. आजही मालूताईंच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ’ येथे आज शिक्षिका, मदतनीस, स्वयंपाक करणारी असा दहा जणींचा स्टाफ कार्यरत आहे. जवळ जवळ १५० मुले संस्कार वर्गांचा लाभ घेत आहेत. त्यात विविध श्लोक, स्तोत्र, मनाचे श्लोक… याबरोबरच राष्ट्रपुरुषांच्या कार्याची ओळख, अनेकविध छंद, कौशल्यांची ओळख, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ यांचा समावेश असतो. मे महिन्यात सर्व ठिकाणच्या संस्कार वर्गातील मुलांचे ३ ते ४ दिवसांचे शिबीर घेतले जाते.
या दोन प्रमुख कामांशिवाय संस्थेत वाचनालय, योगासन वर्ग आणि पर्यावरणपूरक अनेकविध उपक्रम राबविले जातात. योगासन वर्गाचा लाभ केवळ विद्यार्थीच घेतात असे नाही तर पालक, आजी-आजोबादेखील घेतात. त्यातून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभत असल्यामुळे त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेली २५ वर्षे संस्थेतर्फे ४ बचत गट सुरू आहेत. यांतून आर्थिक सहाय्य घेऊन महिला आपापले छोटे घरगुती व्यवसाय सुरू करून अर्थार्जन करीत आहेत. कोरोना काळात संस्थेने महिलांकडून मास्क शिवून घेतले. त्याशिवाय महापालिका आणि संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण केंद्रही संस्था परिसरात चालवले जाते. संस्थेतर्फे गरजूंसाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून योग्य तो सल्ला आणि शक्य त्या औषधांचे मोफत वाटपही केले जाते. झोपडपट्टीतील किशोरवयीन मुलींना स्वच्छतेचे महत्त्व सांगून, सॅनिटरी पॅडचे वाटप असेही कार्यकम इतर संस्थांच्या मदतीने पार पाडले आहेत. हे सर्व करण्यासाठी मुख्य म्हणजे जागा हवी म्हणून मालूताई जोशींनी केवळ स्वतःचे जीवनच नव्हे, तर आपली मालमत्ता, जागा संस्थेला दान केली आहे. त्याशिवाय तत्कालीन खासदार वेदप्रकाश गोयल यांनी त्यांच्या विकास निधीतून वरचा मजला बांधण्यासाठी निधी दिला. त्यामुळे एक सुसज्ज हॉल तयार झाला आहे. तिथे ध्यान, योगासने, सूर्य नमस्कार, आरोग्य शिबिरे, बचत गटाच्या महिलांच्या मीटिंग, व्याख्याने, प्रशिक्षण शिबिरे हे सर्व करणे सुलभ झाले आहे.
संस्थेला देशभरातल्या अनेक संत-सज्जनांचे आशीर्वाद लाभले आहेत. विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे पाठबळ लाभले आहे. चांगल्या, प्रमाणिक कार्याची दखल घेतली जातेच. आजवर मालूताई जोशींना वैयक्तिक आणि श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळाला अनेक नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशन पुरस्कार, महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड यांचा एस. एल. गद्रे पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र केसरी सेवा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मारक सेवा पुरस्कार, सह्याद्री वाहिनी दूरदर्शन यांचा हिरकणी पुरस्कार, मातृत्व गौरव पुरस्कार, माऊली आनंदी पुरस्कार यांसारखे तीसहून अधिक गौरव पुरस्कार प्राप्त आहेत.
संस्थेच्या भविष्यातल्या योजना म्हणजे सध्या जे दोन मुख्य उपक्रम म्हणजे पाळणाघर आणि संस्कार वर्ग सुरू आहेत त्यांची संख्या वाढवणे. कारण आजदेखील वेगवेगळ्या भागात कामगार, हमाल किंवा रोजीरोटीसाठी झगडणाऱ्या महिला आहेत आणि त्यांची मुले सांभाळायची नीट सोय नसते, तर जिथे त्या निर्धास्तपणे आपली मुले सोपवून जाऊ शकतील अशी पाळणाघरे वाढवणे आणि संस्कार वर्गांची संख्या वाढवणे ही संस्थेसमोरील प्रमुख उद्दिष्टे आहेत. केवळ झोपडपट्टीतच नव्हे, तर सर्व भागात संस्कार वर्ग वाढवणे हासुद्धा प्रयत्न आहे. राष्ट्रीय विचारांनी भारलेला सुदृढ, संस्कारी समाज घडवणे हे संघासह अशा संस्थांचे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे आणि त्यादृष्टीनेच सांगलीच्या या संस्थेची वाटचाल सुरू आहे.
joshishibani@yahoo. com