
नवी मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील हे २६ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा (APMC market) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेले मराठा बांधवांचे वादळ दोन दिवसात मुंबईमध्ये धडकणार आहे. २५ जानेवारीला जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये प्रवेश करतील. मराठा आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्याचदृष्टीने २५ तारखेला नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी दिली. २५ तारखेला बाजार समितीतील पाचही बाजारपेठा बंद राहणार आहेत. एपीएमसी मार्केट बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच २५ तारखेला मराठा आंदोलकांसाठी तर २६ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी असल्याने मार्केट बंद राहणार आहे.