
हिंदूंची पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली!
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा (Ram Lalla Pran pratishtha) सोहळा पार पडला आणि हिंदूंची (Hindu) गेल्या पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा अभूतपूर्व सोहळ्याचे लाखो लोकांकडून थेट प्रक्षेपण पाहण्यात आले. ठिकठिकाणी रामजन्माचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात राजकीय नेत्यांसोबतच सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
गणेशपूजनाने या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला.