Wednesday, March 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकोकणपट्टीतील तुरंबवचे एकमेव शारदा मंदिर

कोकणपट्टीतील तुरंबवचे एकमेव शारदा मंदिर

कोकणी बाणा: सतीश पाटणकर

कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील मंदिरे विशेष ठरली आहेत. पुरातन वास्तुरचनेचा ठेवा हे येथील मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथे प्रसिद्ध असे श्री शारदा देवीचे मंदिर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. विद्येची देवता असणाऱ्या श्रीदेवी शारदेचे मंदिर चिपळूण तालुक्यात तुरंबव येथे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कोकणपट्टीतील हे एकमेव शारदा मंदिर आहे. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी व संतती प्राप्त करून देणारी देवी म्हणून ओळख असलेल्या श्री शारदा देवीच्या नवरात्रोत्सवाला अवघ्या महाराष्ट्रातील भाविक आवर्जून उपस्थिती लावतात.

तुरंबव येथे भव्य असे राजस्थानी पद्धतीचे श्री शारदा देवीचे मंदिर आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस सखल भागात दाट वनराई व तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे. मंदिराची बांधणी राजस्थानी पद्धतीची असून नक्षीकामासाठी कोरलेल्या संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या मध्यभागी घुमटाकार चौथरा असून त्यावर ग्रामदेवता श्री देवी वरदायिनी, श्री देवी मानाई, श्री देवी चंडिका यांच्या मूर्तींसह त्यांच्या मध्यभागी श्री शारदा देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. गाभाऱ्या समोरील चौकटीत बसून सर्व प्रतिमांचे जवळून दर्शन होते. येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तींच्या दैनंदिन पूजाअर्चेचा मान याच गावचे स्थानिक गुरव गावकर यांच्याकडे आहे. दररोज सांजआरती होते. विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने देवतांची उपासना केली जाते. नवसाला पावणारी असल्याने इथे नेहमीच गर्दी होते. विशेषत: संतती प्राप्तीसाठी नवस करणाऱ्यांची वर्दळ असते.

नवरात्रात येथे दिमाखदार उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस येथे यात्रा भरते. नवसाला पावणाऱ्या देवीच्या लौकिकामुळे भाविकांची गर्दी उसळते. नवरात्रातील पहिले दोन दिवस देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य, भजन, दिंडी आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तिसऱ्या दिवसांपासून ‘गौराईचा नवस’ या कार्यक्रमाला प्रारंभ होतो. सकाळी ८ वाजल्यापासून दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम असतात. यानंतर दीपारत्यांचे नृत्य व जाखडी नृत्यास सुरुवात होते. या नृत्यासाठी विशिष्ट प्रकारचा पेहराव करणे ही येथील पारंपरिक पद्धत आहे. विशिष्ट प्रकारचे धोतर, कमरेला रंगीत शेला, डोक्यावर मराठेशाही पगडी, पायात चाळ असा गणवेश परिधान करून सर्व ग्रामस्थ मानकरी नृत्यात सहभागी होतात. या नृत्यानंतर रात्री नवसाचा कार्यक्रम सुरू होतो, तो पहाटेपर्यंत चालतो.

संतान प्राप्तीसाठी येथे नवस करणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अपत्य प्राप्तीची इच्छा गौराईदेवी पूर्ण करते, असा भक्तगणांचा ठाम विश्वास आहे. प्रत्यक्ष अपत्य प्राप्तीनंतर नवस फेडताना विविध वयोगटांतील बालकांना त्यांचे नातलग देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या नवरात्रीत घेऊन येतात. हा कार्यक्रम सुरू असताना ढोल, वाजंत्री व घंटाच्या निनादात मंदिर परिसरातील वातावरण भक्तांना मंत्रमुग्ध करणारे असते. विजयादशमीच्या दिवशी सोने लुटणे हा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी नऊ दिवस रुजविलेले धान्य (रोव) स्नेहभावाने एकमेकांना दिले जातात. दुसऱ्या दिवशी एकादशीला पहाटे जमविलेले नवधान्यांचे भक्तांना वाटप केले जाते. भक्तगण हा हुरडा धान्यवृद्धीच्या श्रद्धेने घरातील धान्यात मिसळतात. यानंतर सकाळी १० वा. साऱ्यांना प्रसाद वाटून या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाची सांगता होते. संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवी असा लौकिक असणाऱ्या या शारदा देवीच्या उत्सवाला अवघ्या महाराष्ट्रातील भाविक आवर्जून उपस्थिती लावतात. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -