Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखन जावे कुणी अपघातांच्या गावा...

न जावे कुणी अपघातांच्या गावा…

पूर्वीच्या काळी लोकांना मैलापेक्षा अधिक अंतर चालत जावे लागत असे. देवदर्शनासाठी किंवा तालुक्याच्या ठिकाणी घरातून गाठोडे घेऊन पायवाटेने पुढे चालत राहायचे. याच पायवाट्याचे पुढे रस्त्यात रूपांतर झाले. दुचाकी, चारचाकी वाहने आली तसा जनतेचा एक-दोन किलोमीटर चालण्याचा सराव बंद झाला आणि खासगी वाहने किंवा सार्वजनिक वाहनांतून प्रवास सुरू झाला; परंतु गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत वाहनांची संख्या एवढी वाढली आहे की, त्यातून अपघातांची संख्या वाढत गेली, याकडे स्वतंत्रपणे पाहण्याची गरज आहे. ९०च्या दशकात दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची निर्मिती झाली. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी उड्डाण पूल निर्माण झाले. २०२३ मध्ये मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग तयार झाला. पण, अपघातांचे प्रमाणही वाढताना दिसले.

अपघाताला एकच नाही तर अनेक कारणे सकृतदर्शनी दिसत असली, तरी ती रोखण्यासाठी जनजागृतीची आवश्यक भासते. राज्य सरकारकडून दरवर्षी सुरक्षा सप्ताह आठवडा, पंधरवडा असे कार्यक्रम घेतले जातात. खरंतर, सुरक्षितता हा जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या कार्यक्रमातून वाहनचालकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न होतो. तसा राज्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ या एक महिन्याच्या कालावधीसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचे कारण एकूण मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ता अपघातांमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्ता अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे.

परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली असली तरी, विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. स्पीड गनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणणे किती महत्त्वाचे आहे. तसेच चालकांनी कटाक्षाने वाहतूक नियम पाळावेत. त्यामुळे निश्चितच अपघात कमी होतील, असा विश्वास महामार्ग पोलिसांना वाटतो. तसेच राज्यात होत असलेल्या अपघातांमधील आकडेवाडी पाहता ६० टक्के अपघात हे दुचाकीचे असतात. दुचाकी अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठीही वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अपघातग्रस्ताला उपचार देण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र, आता चित्र बदलत आहे. अनेक नागरिक पुढे येऊन ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार देऊन अपघातग्रस्तांचे प्राण वाचवत आहेत, ही चांगली बाब आहे. रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकतात. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविणे गरजे आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे लागणार आहे. या आधी महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. या मोहिमेद्वारे अपघातांच्या संख्येत घट होताना दिसून आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२च्या तुलनेत जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात घटले आहेत. महामार्ग पोलीस, आरटीओ विभागाकडून वारंवार जनजागृती कार्यक्रम, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याने, अपघातांना ब्रेक लागल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एकूण ३२९ अपघातांची नोंद झाली होती. यातील १५२ प्राणांतिक अपघात झाले असून यात १८६ जणांचा मृत्यू झाला, तर जानेवारी ते डिसेंबर २०२३ यादरम्यान २७१ अपघात झाले. यात १०३ अपघात हे प्राणांतिक असून यामध्ये १२६ जणांना आपला जीव गमावला. दोन वर्षांच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत १७.६२ टक्क्यांनी, प्राणांतिक अपघातांत ३२.२३ टक्क्यांनी आणि मृतांच्या संख्येत ३२.२५ टक्क्यांनी घट झाली.

वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगात वाहन चालवणे, वाहन चालवताना झोप येणे, रस्त्याची मार्गिका वारंवार बदलणे अशा प्रकारांमुळे अपघात वाढतात. मात्र हे प्रकार आरटीओ विभाग आणि महामार्ग पोलिसांकडून रोखले जात आहेत. यासह रस्ता सुरक्षा मोहीम राबवून वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली जात आहे. रस्ता सुरक्षा अभियानात संपूर्ण महिनाभरात विशेष तपासणी मोहिमा योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र व पी.यू.सी. तपासणी करणे. ओव्हरलोड/रिफ्लेक्टर तपासणी, सिटबेल्ट, हेल्मेट, टेललाईट / हेडलाईट इत्यादी तपासणी करण्यात येणार आहे.रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती व्हावी याकरिता चौका-चौकांत भिंतीपत्रके वाटप, चौक सभा, पथनाट्य प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नेत्र तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, अवयवदान जागृती अभियान राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे आपल्या परिसरातील रस्त्यावर (गावात) अपघात होऊ नये यासाठी रस्ता सुरक्षा अभियान एक महिन्याकरिता मर्यादित न ठेवता वर्षभर प्रत्येक कार्यालयाकडून, प्रत्येक नागरिकांकडून व वाहनचालकांकडून राबवणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -