मुंबई: भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यात आज १७ जानेवारीला ३ सामन्यांची टी-२० मालिकेतील शेवटचा सामना रंगणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. भारतीय संघाला या वर्षी जूनमध्ये टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. याआधी भारताची ही शेवटची टी-२० मालिका आहे.
भारतीय संघाने या मालिकेत सुरूवातीचे २ सामने जिंकत अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. जर भारतीय संघ तिसरा सामना जिंकत असेल तर अफगाणिस्तानला ते क्लीन स्वीप करतील.
भारत-अफगाणिस्तान ऐतिहासिक मालिका
भारताविरुद्ध अफगाणिस्तानची ही ऐतिहासिक मालिका आहे. खरंतर, दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय द्वीपक्षीय मालिका खेळवण्यात आली. ही कसोटी मालिका होती जी १८ जून २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळेस या द्विपक्षीय मालिकेदरम्यान केवळ एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता. हा सामना भारतीय संघाने एक डाव आणि २६२ धावांनी जिंकला होता.
याशिवाय भारत आणि अफगाणिस्ता यांच्यात आतापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. तर दोन्ही संघादरम्यान टी-२० मालिकेतील ही पहिली मालिका आहे. अशातच अफगाणिस्तानही भारताविरुद्धची पहिली मालिका क्लीन स्वीपने हरण्यापासून बचाव करेल. त्यामुळे शेवटचा सामना जिंकण्यासाठी ते पूर्णपणे जोर लावतील.
विश्वचषकाआधी शेवटचा सामना
दुसरीकडून पाहिले तर भारतीय संघासाठी ही मालिका खास आहे कारण भारतीय संघ या वर्षी जूनमध्ये टी-२० विश्वचषक खेळणार आहे. त्याआधी भारताची ही शेवटची टी-२० मालिका आहे. अफगाणिस्तान मालिकेनंतर भारतीय संघाला आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
यानंतर मार्च आणि मे दरम्यान भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीग खेळण्यास उतरतील. यानंतर भारतीय संघ थेट टी-२० विश्वचषकात खेळेल.