भगीरथाने गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली म्हणून त्याचे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दृष्टीने विकासाची गंगा आणली म्हणून आधुनिक भगीरथ म्हणावे लागेल. केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी मुंबईत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, त्यांनी सांगितले की, पुढील वर्षी पनवेलच्या जवळचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ साकार होत आहे. १८ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, त्याच्या पहिला व दुसरा टप्प्याच्या कामास ३१ मार्च २०२५ रोजी सुरुवात केली जाईल.
प्रकल्पाचे सर्व पाच टप्पे कार्यान्वित झाल्यावर ९ कोटी प्रवाशांच्या विमान वाहतुकीस सुरुवात होईल आणि नवी मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय जगाशी जोडले जाईल. पुढील वर्षी दोन टप्प्यांच्या कामाला एकदम सुरुवात होईल, असेही शिंदे यांनी सांगितले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरांच्या एकूण परिसराला यामुळे नवीन झळाळी मिळणार असून, हा परिसर भविष्यात मिनी अमेरिका म्हणून ओळखला जाईल. मुंबईच्या टर्मिनलची जागा तेथे रोज उड्डाण करीत असलेल्या विमानांची संख्या पाहता कमी पडत आहे. अनेकदा तर असे होते की, लाईन क्लिअर मिळत नसल्याने मुंबईकडे येणाऱ्या विमानांना बराच वेळ आकाशात घिरट्या घालत राहावे लागते. आता तसे होणार नाही आणि नवी मुंबई विमानतळ झाल्यावर कोणत्याही विमानाला थांबावे लागणार नाही.
आंतरराष्ट्रीय विमातळामुळे नवी मुंबई शहर अनेक आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडले जाणार आहे, त्यामुळे या भागाचा कायापालट तर होणारच आहे, पण नवी मुंबईत व्यावसायिक संधी आणि प्रचंड गतीने विकास साकारला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांची एक योजना गती – शक्ती ही संकल्पना आहे आणि त्यानुसारच हा विमानतळ साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी येणार असल्याने गुंतवणुकीला प्रचंड संधी आणि रोजगार निर्माण होणार आहेत. खरे तर हे अगोदरच व्हायला हवे होते, पण पनवेल आणि नवी मुंबई परिसरात काही स्थानिक पक्ष असे आहेत की ज्यांचा प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध असतो. कोणताही प्रकल्प येणार असला की मोर्चे काढायचे, आमच्या प्रेतावरून जावे लागेल, अशी आगखाऊ भाषणे करायची आणि प्रकल्प येऊ द्यायचा नाही, असे राजकारण हे सातत्याने स्थानिक राजकीय पक्ष खेळत असत. पण कंत्राटे याच पक्षांचे पुढारी हडपत असत.
नवी मुंबई विमानतळ हा अगोदर रेवसला होणार होता. तेथे जागाही आहे, पण या राजकीय पक्षांनी अशीच धमकावणीची भाषा केली आणि तो प्रकल्प बारगळला. अर्थात तेव्हा देशात काँग्रेसचे नतद्रष्ट सरकार होते. त्यालाही अशा प्रकारे विकास नकोच होता. त्याला काँग्रेस सरकार हमखास बळी पडायचे आणि हे प्रकल्प प्रत्यक्षात कधीच आले नाहीत. अलिबाग आणि रेवस परिसरातील तरुण अजूनही रोजगारावाचून खितपत पडले आहेत. तसे नवी मुंबई विमानतळाबाबत घडले नाही, कारण आता केंद्रात मोदी यांचे मजबूत सरकार आहे. त्यांचा विकासाचा दृष्टिकोन सर्व परिचित आहे आणि विशेष म्हणजे मोदी यांचा विकासाचा दृष्टिकोन जनतेला पटलाही आहे आणि भावलाही आहे. त्यामुळे आता कुणी कितीही धमकावणीची भाषा केली, तरीही जनताच त्यांना महत्त्व देणार नाही.
नवी मुंबई विमानतळ तयार होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर आंतरराष्ट्रीय शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेतच सोबतच या परिसराचा कसा कायापालट होणार आहे याची कल्पना येण्यासाठी हा विमानतळ एकदा कार्यान्वित झाला की, कुठूनही कुठेही जाण्यासाठी सर्व प्रवासाच्या सुविधा उपलब्ध असतील. अटल सेतू असेल, बेलापूर ते तळोजा मेट्रो असेल, मुंबईत तर ठिकठिकाणी मेट्रो कार्यान्वित झाल्या असतील आणि बस वाहतूक तर असेलच. असा सर्व प्रकारे वाहतुकीनी परिपूर्ण असा हा भाग असेल. ज्या सरकारने वाहतुकीच्या सुविधांचे महत्त्व ओळखले त्या सरकारला नागरिकांचा पाठिंबा असतोच. हे विमानतळ सर्व मार्गांना जोडलेले असेल. ज्यात सायन-पनवेल हायवे आहे, अटल सेतू तारघर येथून जोडलेला असेल आणि वाहतुकीचे जाळे असेल. आधुनिकीकरणाची हीच तर व्याख्या आहे. असा आधुनिक आणि परिवहन सुविधांनी संपूर्ण असा हा परिसर येत्या काही वर्षांत साकारला जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या राजवटीत परिवहन सुविधांचे जाळे तयार केले जाईल आणि त्याच वेळेस विरार – अलिबाग कॉरिडॉर ही मार्गिकाही विकसित केली जाणार आहे. सारा परिसर आधुनिक सुविधांनी उपयुक्त असा साकारला जाणार असून, त्यामुळे किती रोजगार निर्मिती केली जाणार आहे याची तर कल्पनाही न केलेली बरी. अलिबागसारखे शहरही मुंबईला जोडले जाणार आहे. केवळ एक खंत रायगडवासीयांना आहे आणि ती म्हणजे मुंबई – गोवा महामार्ग प्रकल्प अजूनही पूर्णपणे सुधारलेला नाही. काही तरी अगम्य कारणामुळे या प्रकल्पाचे काम रखडले ते रखडलेलेच आहे. कधी कंत्राटदार पळून गेला, तर कधी साहित्यच मिळाले नाही, म्हणून हा प्रकल्प आज कितीतरी वर्षे रखडलेला आहे. त्याचे काम पूर्णगतीने सुरू झाले तर पनवेल आणि कोकणलाही जोडले जाईल. रस्ते हे भावी पंचवीस वर्षांतील वाहनांच्या संख्येच्या अंदाजावरून तयार करायचे असतात, पण असे नियोजन याच मार्गाच्या बाबतीत केले गेले नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
विमानतळ साकारला जात असतानाच अर्थव्यवस्थेच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या माणसाला त्याचा लाभ मिळणेही आवश्यक आहे. त्याचा विचार करणेही अनिवार्य आहे. अन्यथा त्या विकासात सामान्य माणसासाठी उपयुक्त न ठरल्याचे गालबोट लागते. तसे होऊ नये आणि विकासाचा हा प्रचंड ओघ अनुभवत असतानाही सामान्य माणसालाही या प्रक्रियेत सामील करून घेणे आवश्यक आहे. याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतीलच, त्यात काही शंका नाही. या दृष्टीने मोदी यांना आधुनिक भगीरथ म्हणावे लागेल.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…