Share

कथा: प्रा. देवबा पाटील

देशमुख सरांचा आठवीच्या विद्यार्थ्यांना “आपल्या पृथ्वीचे वातावरण” प्रकरण शिकण्याचा आज तेरावा दिवस उजाडला होता. तरीही मुलामुलींचा उत्साह कायम होता. सर येताबरोबर वर्गात उत्साहाचे वारे वाहू लागले. सरांची हजेरी पूर्ण झाली आणि… “वातावरणात धूळ कोठून येते सर?” कुंदाने उभे राहत आपली शंका विचारली. सर म्हणाले, “खडकांच्या होणाऱ्या झीजेतून, ज्वालामुखींच्या स्फोटांतून वर उडणाऱ्या राखेतून, आकाशातून पडणाऱ्या व जळून खाक होणाऱ्या लाखो उल्कांच्या राखेतून, पृथ्वीवरील असंख्य कारखान्यांतील धुरांतून व घरोघरच्या जळणातून उत्पन्न होणाऱ्या धुरातून, सोसाट्याच्या वादळवाऱ्यासोबत वर उडत असलेली पृथ्वीवरील धूळ अशा त­ऱ्हेने वातावरणात धुळीचे सूक्ष्म कण निर्माण होतात व ते वातावरणात इतस्तत: सतत फिरत असतात.”

“सर, धूळ म्हणजे खरोखर काय असते?” वर्गातील एका रद्दी मुलाने प्रश्न केला व सगळे त्याच्याकडे बघू लागले. “बरोबर प्रश्न विचारला तू.” सर म्हणाले, “मातीचे आणि इतर पदार्थांचे हवेसोबतही व वाऱ्याबरोबर सहज इकडून तिकडे उडू शकणारे अतिशय हलके व अत्यंत बारीक कण म्हणजे धूळ. आपण लहानपणी आपल्या घराच्या बंद दरवाजाच्या किंवा बंद खिडकीच्या फटीतून घरात येणाऱ्या प्रकाशाची शलाका बघितली, तर ती पाहताना आपणास एक प्रकारची वेगळीच मौज वाटते. तसेच आरशाने जर आपण सूर्यप्रकाशाचे तिरीप आपल्या घरात पाडले, तर सुद्धा आपणास तसाच आनंद होतो. त्याचे कारण म्हणजे या प्रकाश किरणांमध्ये आपणास त्या प्रकाशाने उजळून निघालेले व सतत खाली-वर, इकडे-तिकडे वर्तुळाकार फिरणारे कण दिसतात. हे कण धुळीचेच कण असतात.”

“ही धूळ कशी काय उपयोगी असते सर? धुळीत तर विविध प्रकारचे असंख्य रोगजंतू असतात ना?” जयेंद्राने प्रश्न विचारले. “हो बरोबर आहे.” सर सांगू लागले, “धुळीत असंख्य प्रकारचे अनेकविध रोगांचे अगणित जीवजंतू असतात हे खरे आहे. पण धुळीचे कण हे वातावरणातील उष्णता शोषून घेतात. तसेच ते जलशोषकही असतात. या धुळीच्या कणांवरच वाफेचे कण साचून त्यांपासून सूक्ष्म थेंब तयार होतात. असे अनेक सूक्ष्म थेंब एकत्र आल्यास त्यांचे ढग बनतात जे पावसाळ्यात आपणास पाऊस देतात. धूलिकणांवरूनच सूर्यप्रकाशाचे परावर्तन होऊन तो चोहीकडे पसरतो. त्यालाच प्रकाशाचे विकिरण किंवा विखुरणे म्हणतात. प्रकाशाच्या या धुळीवरून होणाऱ्या परावर्तनानेच आपणास दिवसा चोहिकडे उजेड दिसतो. आपल्या घरांमध्ये प्रकाश येतो. आकाशाला निळा रंग या धुळीच्या कणांवरून होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळेच लाभला. संध्याकाळी आपणास आकाश रंगीत दिसते तेही या धुळीच्या कणांवरील प्रकाश विकिरणामुळेच; परंतु धुळीतील रोगजंतूंमुळे आजार वाढू नयेत म्हणून आपणच आपले घरदार नेहमी स्वच्छ ठेवावे.”

“धूर कसा काय निर्माण होतो सर?” एका मुलीने प्रश्न केला. सर म्हणाले, “कोणत्याही इंधनाचे व्यवस्थित ज्वलन होण्यासाठी भरपूर हवा पाहिजे तसेच उच्च तापमानही पाहिजे. या दोन्हींपैकी एखाद्या गोष्टीची कमतरता असल्यास ते इंधन व्यवस्थित जळत नाही. त्याचे ज्वलन अपुरे होते. इंधनाच्या अपुऱ्या ज्वलनाचा परिणाम म्हणजेच धूर.”

“सर, आजकाल हवेत धूर कसा काय इतक्या झपाट्याने वाढत आहे?” रवींद्राने शंका विचारली. “तसाही धूर हा अल्प प्रमाणात आजच्या हवेचा घटक झाला आहे; परंतु तो जर जास्त प्रमाणात वाढला, तर हवेचे म्हणजे वातावरणाचे प्रदूषण होते. कारखाने धूर प्रचंड प्रमाणात बाहेर फेकतात. वाहनातूनही बाहेर पडणारा खूप धूर हवेत मिसळतो. आज कारखान्यांची व वाहनांची संख्या खूपच भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे वातावरणातील धुराचे प्रमाणही खूपच वाढले आहे. तसेच उठसूठ फटाके फोडण्यानेही त्यातून खूप मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो व त्याची आधीच्या धुरात भरच पडते. म्हणून हवेत धूर झपाट्याने वाढत आहे व वातावरण प्रदूषित होत आहे.” सरांनी सांगितले.

“हा धूर तर आपल्या आरोग्यास अपायकारक असतो ना सर? मग त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही का?” सुरेंद्राने प्रश्न केलेत. “हो.” सर म्हणाले, “हा धूर आरोग्यास खूपच अपायकारक असतो, कारण त्यामध्ये खूपच विषारी वायू असतात. तसेच धुरामध्ये रोगजंतूसुद्धा प्रचंड प्रमाणात असतात. ते मानवाचे आरोग्य खूपच खराब करतात. म्हणूनच या धुराचा नायनाट करून हवा शुद्ध राखावयास पाहिजे. वातावरण जर प्रदुषणमुक्त ठेवले तर मानवी जीवनही निरोगी व निकोप राहील. पण हे नियंत्रण ठेवण्यासाठी जनतेमध्येच सारासार वैचारिकता व सामंजस्याची भावना हवी.” असे शिकवणे सुरू असतानाच तास संपला आणि सर दुसऱ्या वर्गावर जाण्यासाठी या वर्गातून बाहेर पडले.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

16 minutes ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

46 minutes ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

3 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

4 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

4 hours ago