Share

संक्रातीचा (Sankrant) सण म्हणजे एका प्रकाशपर्वाची सुरुवात. अंधाराकडून उजेडाकडे नेणारा, रात्रीचे प्रहर कमी करून दिवसकाळ वाढवणारा हा सण संक्रमणकाळ असतो. यात ऋतूबदल होतोच; खेरीज माणसाच्या नित्य उपचारांमध्येही काही बदल घडणे अपेक्षित असते. हे सर्व संकेत देणारा संक्रांतीचा सण एकमेकांप्रती स्नेह जपण्याची आणि ऋणानुबंध दृढ करण्याची शिकवणही देतो. आजच्या काळात ती अधिक महत्त्वाची ठरते.

वैष्णवी कुलकर्णी : प्रासंगिक

बदल हा काळाचा स्थायी भाव असला तरी मानवी स्वभाव आणि त्याची वैशिष्ट्ये मात्र सहजासहजी बदलत नाहीत. त्यामध्ये लक्षणीय बदल होण्यास बराच वेळ जावा लागतो. मातीच्या घड्याला आकार देताना कुंभार हलक्या हाताने थापड्या मारतो त्या पद्धतीने काळाच्या थापड्या सहन केल्याखेरीज माणसाला शहाणपण येत नाही. त्यामुळेच एकीकडे भरकटलेल्या मन, वृत्ती आणि विचार ताळ्यावर ठेवण्यासाठी एक तर अनुभवांची गरज असते किंवा संस्कारांमधून मिळालेली शहाणपणाची साथसंगत आवश्यक असते. काही काळ वापर केल्यानंतर एखाद्या निर्जीव यंत्रालाही देखभाल, दुरुस्तीची गरज भासते, तशीच एकमेकांच्या सानिध्यातून समजलेल्या बऱ्या-वाईट गुणवैशिष्ट्यांमुळे उबग आलेली, काहीशी मलूल वा मलिन झालेली नाती पॉलिश करण्याच्या भावनेने भरलेला एक हात फिरावा लागतो. वर्षभर साजऱ्या होणाऱ्या सणांद्वारे नेमका हाच हेतू साध्य होतो. संक्रांत त्याला अपवाद कसा असेल…!

सध्या नात्यांची वीण उचवण्याचे प्रमाण वाढले आहे. विभक्त कुटुंबपद्धतीने सख्खी, जीवाभावाची नातीही दूरच्या ध्रुवांवर नेमकी ठेवण्याची कला माणसाला प्रदान केली आहे. कारणाशिवाय भेटणे, लाभाशिवाय संबंध जोपासणे आणि गरजेशिवाय एकमेकांकडे जाणे जवळपास संपुष्टात आले आहे. व्यस्तता आणि व्यग्रतेच्या नावाखाली ऋणानुबंधाच्या गाठी जपण्यात मागे राहणारी पिढी सोशल मीडियाशी जोडलेली गाठ मात्र कसोशीने जोपासते तेव्हा माणसा-माणसांतील कमी होणाऱ्या भावनिक ओलाव्याबाबत काळजी वाटल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच नात्यातील गोडी वाढवणारा संक्रांतीसारखा सण आज अधिक महत्त्वाचा आणि गरजेचा वाटतो.

तिळावरचा काटेरी मोहोर, तिळवड्यांची स्निग्धता, गूूळपोळीचा खरपूस सुगंध, बाजरीच्या भाकरीतला किंचितसा कडवटपणा, भोगीच्या निमित्ताने केली जाणारी लेकुरवाळी भाजी, घरोघरी साजरी होणारे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम, बोरन्हाणासारखे विधी, पतंग उडवण्यासाठी घाई करणारे बालगोपाळ या सर्व आनंदोत्सवाचे एक नाव म्हणजे मकरसंक्रांती! परस्परांना गोड बोलण्याचे आर्जव करणारा, आवाहन करणारा आणि यानिमित्ताने स्नेहीजनांना एकत्र आणणारा हा उत्सव संपूर्ण भारतात अगदी उत्साह आणि आनंदात साजरा होतो. या दिवसापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि पृथ्वी परिभ्रमणाची दिशा बदलते. लांबलेल्या रात्री उत्तरोत्तर लहान होतात, तर दिवस मोठा होऊ लागतो. कृषिप्रधान भारतात याचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. या दृष्टीनेही हा सण आनंदाने साजरा केला जातो. देवदर्शन, एकमेकींना बोरं-उसाचे करवे-शेंगा-काही भाज्या यांचे वाण देणे, विस्तवावर दूध उतू घालवणे या आणि अशा पारंपरिक प्रथा आज फारशा दिसत नसल्या तरी घरोघरच्या स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावून तिळाचे लाडू वा वड्या अवश्य देतात. मुख्य म्हणजे रथसप्तमीपर्यंत हा आनंदोत्सव रंगत राहतो. स्नेहाचे प्रतीक म्हणून सगळेच एकमेकांना तिळगूळ देतात. ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ अशी प्रेमळ विनंती करतात. थोडक्यात, हेवे-दावे विसरून नव्याने एकत्र येण्याचा व असलेले बंध दृढ करण्याचा हा दिवस. त्यामुळेच आजच्या संघर्षमय जीवनात अशा सणाचे महत्त्व जपणे जास्त समर्पक ठरते.

संक्रांत आणि पतंग यांचे नाते अतूट आहे. निरभ्र आकाशात, आल्हाददायक वातावरणात तासनतास पतंग उडवण्याची कल्पना तरी किती छान! थंडीच्या सरत्या दिवसात उन्हे अंगावर झेलत पतंग उडवायचा! नभात लाल, निळे, पिवळे, हिरवे लहान-मोठे पतंग आकाशात उडत असतात. कुणाचे पतंग झरझर वर चढतात, तर कोणाचे आकाशात झेप घेता घेता झपकन खाली येतात. कुशल हातांनी आपल्या पतंगाला कधी ढील देत, कधी खेचत दिशा देता येते. कुणी दुसऱ्याचे पतंग कापतो आणि एकच ओरडा होतो. खरे म्हणजे आपल्या पतंगाची दोरी आपल्याच हातात असते. ज्याची दोरीवरची पकड जबरदस्त, तोच दुसऱ्याचे पतंग कापतो. एकाची जीत-दुसऱ्याची हार ! मग हे गरगरत खाली पडणारे पतंग पकडण्यासाठी कोण धावाधाव होते… साऱ्या आयुष्याच्या खेळाचेच नाही का हे प्रतीक? प्रत्येकजण आयुष्यभर हा खेळ खेळत असतो. आशेचे, ध्येयाचे पतंग आयुष्यभर उडवत असतो. कुवतीनुसार त्याला दिशा देतो. प्रयत्नपूर्वक साध्य केलेल्या कुशलतेने हे जमवणाऱ्याचा पतंग आकाशात उंच उंच जातो आणि उंचीवर असा काही स्थिरावतो की जणू त्याला अढळपदच मिळालेय. बाकीचे इतस्ततः विखुरलेले… कुठे ना कुठे अडकलेले… काही तर फाटके-तुटके… हे टाळायचे तर मुळात सूत्रधाराची पकड व्यवस्थित हवी, कौशल्य कमावलेले हवे. वाऱ्याची योग्य दिशा मिळताच सरसरून पुढे जाणारे हात हवे. महत्त्वाचे म्हणजे खेळाच्या मैदानातून बाहेर येताच हार-जीत विसरणारे मन हवे. हा जीत, हा जेता असा भेदाभेद पुसून टाकणारा तरल भाव हवा. आपण सारेच एका नावेचे प्रवासी आहोत. वल्हवणारा प्रवासी आपल्यातलाच वाटत असला तरी वाऱ्याची दिशा ठरवणारा… साऱ्या खेळाचा सूत्रधार? आपल्याहून वेगळा… ज्याच्या त्याच्या मनातला.

या सणांच्या निमित्ताने माणसाच्या सामाजिक संपर्कप्रियतेचे आविष्कार पूर्वीपासून होत आले आहेत. स्त्री वर्गाने घरोघर योजलेले हळदीकुंकू समारंभ हा देखील सामाजिक अभिसरणाचाच एक प्रकार आहे. हे कार्यक्रम समाजात रुढ झाले त्यामागे ही अभिसरणाचीच भावना अभिप्रेत नाही का? मानवजातीत झालेल्या थोर विचारवंतांनी विश्वकल्याणाची अनेक सूत्रे साध्यासुध्या धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक व्यवहारातून सामान्य माणसांपर्यंत आणून पोचवली. आज शिक्षणाच्या प्रसाराबरोबर सर्व जुने-नवे विचार समजून घेण्याचा आवाका वाढला आहे. त्याचा डोळस उपयोग केला पाहिजे.

जग प्रकाशपूजक आहेे. वनस्पती अंधारात ठेवली, तर प्रकाश मिळेल त्या झरोक्यातून उजेडाचा शोध घेत जाताना दिसते. जगाच्या चैतन्याचे मूळ प्रकाशातच आहे. प्रकाश आहे म्हणून दृष्टी आहे आणि दृष्टी आहे म्हणून सृष्टी आहे, हा तर आपला सर्वांचा अनुभव. सृष्टीच्या प्रत्येक घटकाला प्रकाशाची ओढ आहे. आपल्याला अंधार हवा असतो, पण तो तात्पुरताच, कायमचा नव्हे. आपण प्रकाशासाठी आतुर असतो, त्याच्याअभावी बैचेन होतो. रात्र संपणार आणि दिवस उजाडणार या भरवशावर आपण निर्धास्त असतो. सृष्टीतल्या प्रकाशाचा मूळ स्त्रोत आहे सूर्य. सूर्य म्हणजे तेजोमूर्तीच. ‘सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च!’ असे म्हटले आहे. म्हणजे चर आणि स्थिर अशा संपूर्ण सृष्टीचा आत्मा सूर्यच आहे. सृष्टीच्या सृजन-पालन-पोषणाची जबाबदारी तो नेमकेपणे सांभाळतो आहे. एक प्रचंड यंत्रणा अंतरिक्षात सुरू आहे.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

5 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

23 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

25 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

1 hour ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago