
भेसळयुक्त अन्न, औषधांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक विभागात प्रयोगशाळा उभारणार
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांनी दिली माहिती
नाशिक : हल्ली ऑनलाईन माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने फसवणुकीचे (Online Fraud) अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच एखाद्याच्या जीवावर बेतू शकणार्या औषधांच्या विक्रीतही (Online drug sales) फसवणुकींचे प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुळात डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय (Prescription) कोणतीही औषधे खरेदी व विक्री करणे चुकीचे आहे. तरीही ऑनलाईन माध्यामातून स्वस्त दरात औषधे उपलब्ध करुन दिली जातात व सामान्य नागरिकही याचा फारसा विचार न करता ती खरेदी करतात.
या पार्श्वभूमीवर अशा अवैध प्रकाराला आळा घालण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. राज्यातील सात विभागांमध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
ऑनलाईन औषधांच्या सुरू असलेल्या विक्रीविरोधात अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आलेल्या आहेत. या तक्रारींनुसार लवकरच अशा ऑनलाईन विक्री करण्यावर निर्बंध आणण्यासाठी शासन उपाययोजना करणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच ५०० पदाची भरती केली जाणार आहे. यामुळे विभागातील मनुष्यबळाची टंचाई दूर होऊन कामगिरीवरही चांगला परिणाम दिसून येईल असा विश्वास मंत्री आत्राम यांनी व्यक्त केला.
गुटखाबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश
मंत्री आत्राम म्हणाले, राज्यात गुटखा बंदी आदेश लागू असतानाही परराज्यातून गुटखा आणला जातो. याबाबत विभागातील अधिकाऱ्यांना पोलिसांच्या मदतीने संयुक्तरित्या मोहीम राबवून गुटखाबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. गुटख्यासंदर्भात एकावर तीन व त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांच्यावर मोकाअन्वये कारवाई केली जाणार असल्याचे सांगत, आत्तापर्यंत राज्यात ६० ते ७० कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आल्याचे मंत्री आत्राम यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक विभागात प्रयोगशाळा उभारणार
भेसळयुक्त मिठाई, अन्न व बनावट औषधी ड्रग्ज यांची तपासणी करण्यासाठी राज्यात फक्त तीन प्रयोगशाळा (Lab) आहेत. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे या प्रयोगशाळा असून, राज्यभरातून नमुने याठिकाणी तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचे अहवाल येण्यास विलंब होतो. त्यासाठी राज्यभरातील सातही विभागात प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २५ कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याचे मंत्री आत्राम यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, लॅब ऑन व्हिल ही मिनी प्रयोगशाळा असलेली व्हॅनही प्रत्येक विभागामध्ये उपलब्ध होणार असून, त्यामुळे जागेवर भेसळयुक्त पदार्थांची तपासणी करणे सोपे जाणार असल्याचेही मंत्री आत्राम म्हणाले.