
मागण्या पूर्ण झाल्या तरच शाळेच्या इमारती केंद्र म्हणून उपलब्ध करुन देणार
मुंबई : दहावी (SSC Exam) आणि बारावी (HSC Exam) बोर्डाच्या परीक्षा (Board Exams) तोंडावर आलेल्या असताना राज्यभरातील शिक्षण संस्था (Educational institutions) काही गोष्टींमुळे नाराज आहेत. या नाराजीतून त्यांनी बोर्डाच्या परिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी परिक्षांसाठी शाळेच्या इमारती केंद्र म्हणून उपलब्ध करुन देण्यास नकार दिला आहे. तसेच परिक्षेच्या कामासाठी आमचा कर्मचारी वर्ग देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने (Maharashtra State Educational Institution Corporation) घेतली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर वेगळंच संकट येण्याची शक्यता आहे.
वर्षानुवर्षे रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान यासारख्या कारणामुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईस आल्या आहेत, शिक्षणाची गुणवत्ता घसरली आहे, असा आरोप शिक्षा संस्थाचालकांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही, दहावी बारावीच्या परीक्षांसाठी आमच्या शाळा आणि आमचा कर्मचारी वर्ग देणार नाही, अशी भूमिका शिक्षा संस्थाचालकांनी घेतली आहे.
बळजबरीने शाळांना परीक्षा केंद्र केल्यास...
महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने बळजबरीने शाळांना अधिगृहीत करून परीक्षा केंद्र उभारण्याचे प्रयत्न केल्यास महामंडळाने आक्रमक पावित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. असे केल्यास शाळांना कुलूप लावू मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत शाळेची इमारत देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
शिक्षण संस्थाचालकांच्या मागण्या काय आहेत ?
- राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. २०१२ पासून अजूनपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही. ती ताबडतोब करण्यात यावी.
- महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे २००४ ते २०१३ पर्यंतचे थकीत वेतनोत्तर अनुदान द्यावे
- प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध
- नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदींबाबत माहिती द्यावी.
कधीपासून सुरु होतायत परीक्षा?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.