Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजSustainable lifestyle : शाश्वत जीवनशैली

Sustainable lifestyle : शाश्वत जीवनशैली

  • विशेष : डॉ. श्वेता चिटणीस

२०२३ हे वर्ष संपता संपता जगात सर्व ठिकाणी उत्पात, गडबड, गोंधळ आणि एकूणच बजबजपुरी माजली आहे, असे आपण पाहतो. काही ठिकाणी युद्धामुळे, काही नैसर्गिक आपत्तींमुळे, कुठे रोगराई पसरल्यामुळे. Cop २८ ही हवामान बदल या विषयी परिषद दुबई येथे भरवण्यात आली होती. विकसित देश आणि विकसशील देश यांच्यात नेहमीप्रमाणे ठोस पावले कुणी उचलावी यात वाद होतात. तसे ते या परिषदेमध्ये झाले.

सद्यस्थिती अशी आहे की, तापमान वाढ ही जागतिक पातळीवर होत असून त्यामुळे उच्च शिखारांवरचे हिम वितळत आहे व त्यामुळे समुद्रसपाटीमध्ये वाढ होते आहे. यामुळे भविष्यात अनेक समुद्राकाठी वसलेली शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी व पूरपरस्थिती, वादळ, दुष्काळ, वणवे वाढून त्यामुळे पीक हानी, जैवविविधता व परिसर नष्ट होणे अशी अनेक संकटे निर्माण झाली आहेत. अजूनही बऱ्याच लोकांना असे वाटते की, हवामान बदल कुठे तरी दूरच्या देशात होत असेल. आपला काय संबंध? मी का प्लास्टिक वापरणे बंद करू? मीच का एकट्याने प्लास्टिकचा कचरा, इतर कचरा रस्त्यावर टाकू नये, सर्व लोक टाकतात.

मी प्लास्टिक वापरल्याने काय मोठा फरक पडणार आहे? नवीन वर्षात आपली अशी विचारसरणी बदलायला हवी. प्रत्येक माणूस विचारपूर्वक वागून शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करेल तर नक्कीच बदल घडून येतील. प्रत्येकजण आपला परिसर जपेल, त्यातील पक्षी, वृक्ष, झाडे, वेली जपेल तर नक्कीच आपल्याला मिळालेला जैवविविधतेचा वारसा जपला जाईल.

त्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, भ्रमण करणे, विविध प्रजातींची माहिती करून घेणे उत्तम आहे. राजकीय इच्छशक्तीचा आधार तेव्हाच मिळेल, जेव्हा प्रत्येक व्यक्ती जे जे उपाय हवामान बदल सुसह्य करण्यासाठी योग्य आहेत ते प्रत्यक्षात वापर करेल.

काही सोपे उपाय आहेत झाडे लावणे, वृक्षतोड थांबवणे, पर्यावरणस्नेही इंधन वापरणे इत्यादी. मुंबईसारख्या समुद्र सपाटीच्या जवळ असणाऱ्या शहरातील तिवरांची जंगले वाचवणे व जैवविविधता वाचवणे. त्यासाठी प्राणी-पक्षी आणि वनस्पतींच्या अनेक प्रजातींची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे.

नवी मुंबईतल्या वाशीला जरी ‘flamingo city’ असे नाव आहे, तरीही इतर अनेक ठिकाणी आपण विविध पक्षी बघू शकतो. उदाहरणार्थ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्र नेचर पार्क, कुलाबा इथले तलाव, अंधेरीत असलेले लोखंडवाला तलाव, विमानतळाजवळ असणारी एअरपोर्ट कॉलनी आणि इतर आपल्या परसामध्ये असणारी वृक्ष, झाडे, उद्याने, जॉगर्स पार्क इत्यादी ठिकाणी विविध पक्षी दिसतात. पक्षी निरीक्षण करण्यासाठी आपल्याला जंगलात जावे लागत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा झाडांवर भारद्वाज पक्षी, तांबट, सुतार पक्षी, शेपूट फुलवून नाचणारे नाचण पक्षी, खंड्या, रॉबिन, कोकीळ, वेडे राघू, मैना, पोपट paradise flycatcher, hornbill असे अनेक सुंदर पक्षी आपण पाहू शकतो. पिवळा धम्मक हळद्या, लाल बुडाचा बुलबुल, डौलदार शेपटीचा काळा कोतवाल, वट वट करणारा वटवट्या अशा पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. हे पक्षी भारतात गावोगावी दिसतात, शहरात दिसतात. तसेच मांसाहारी पक्षी जसे की – घार, शिक्रा, ससाणे इत्यादी पक्षी परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.

आपण किती भाग्यवान आहोत की, पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येते. अन्यथा युरोप-अमेरिकासारख्या प्रगत देशात पक्षी नव्हे माणूस दिसणे देखील दुर्मीळ झाले आहे.

एक महत्त्वाची नोंद अशी आहे की, पक्षी सहसा जागा बदलत नाहीत. त्यांचे राहण्याचे झाड, परिसर सोडून जात नाहीत; परंतु इमारतींचे बांधकाम, परिसरातील नवीन घडामोडी ज्या वातावरण कलुषित करतात, अशा वेळेस पक्षी जागा व परिसर सोडून इतर नैसर्गिक अधिवासात जातात. त्यामुळे हे पक्षी ज्या झाडांवर घरटी बांधतात, ती झाडं जपणे आवश्यक आहे.

हवामान बदलामुळे होणाऱ्या बदलांचा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी आपण सकारात्मक उपाययोजना करू या आणि जैवविविधता जपणे हा त्या सकारात्मक उपाययोजनांचा मुख्य दुवा आहे. चला तर नवीन वर्षात आपण शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने एकत्र मार्गक्रमण करूया.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -