Kingfisher : सर्वश्रेष्ठ गोताखोर खंड्या

Share
  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

आम्ही सिंधुदुर्गला मुंबईच्या ट्रेनची वाट पाहत बसलो होतो. तेवढ्यात तारेवर सुंदर पक्षी बसलेला दिसला. मुलाला त्याचं खूप अप्रूप वाटलं. मुंबईत त्याने हा पक्षी त्याच्या २२ वर्षांत अजून तरी पाहिला नव्हता. दुर्दैवच म्हणा.

थोडेसे मोठे डोके, डोक्यापेक्षा मोठी चोच, निळे हिरवट इंद्रधनुषी चमकदार पंख, त्यावर सुंदर असे कोरीव पांढरे ठिपके, चिमणीपेक्षा मोठा, गळ्याकडील आणि पोटाकडील तपकिरी रंगाचे तांब्यासारखे पंख, छोटीशी शेपूट, मजबूत मासल पाय असा सुंदरसा पक्षी खंड्या. असा अचानक खंड्या पाहायला मिळाला म्हणून खूप आनंद झाला. पण दुसऱ्याच क्षणाला वाईटही वाटले की, काही वर्षांनी हीच गत चिमण्यांची सुद्धा होईल. कारण शहरात तर किंगफिशर दिसेनासे झाले. चिमण्यांचे सुद्धा आवाज कानी पडत नाहीत. जेव्हा मला खंड्याचे चित्र काढायचे होते तेव्हा खंड्या शहरात शोधण्यासाठी नजर भिरभिरत होती पण खंड्या काय कुठे मला दिसला नाही.

किंगफिशर म्हणजे आपला खंड्या. म्हटलं तर जगात सगळीकडेच आढळणारा. युरेशिया, तुर्की, भारत, ऑस्ट्रेलिया, बल्गेरिया, फिलिपाईन्स अनेक ठिकाणी सर्व उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण भागात आढळणारा. बेलीज आणि कुकद्वीप या दोन्हींचा किंगफिशर हा “राष्ट्रीय पक्षी” आहे. याच्या ८९ प्रजाती आहेत. मँग्रोव किंगफिशर, निळ्या कानाचा, रुडी( जंगले), क्रिस्टेड, ब्लीथ, सारस, बिल्ड, काळी टोपी,भुरकट पंखांचा, कॉलरवाला, बुटका, चीतकबरा, तिबेटी, मलबारी अशा अनेक जाती आहेत. त्यातील भारतामध्ये नऊ प्रजाती दिसून येतात. नद्या, तलाव अशा पाणथळ जागेजवळ या पक्ष्याला राहायला खूप आवडते. कारण त्यांना त्यांच्या मनासारखे अन्न, मासे, खेकडे, बेडूक, किडे, साप, उभयचर प्राणी, कीटक येथे मिळतात.

परमेश्वरांनी या पक्ष्यांची रचना, यांची नैसर्गिक रंग निर्मिती ही जलाशी पूरक अशी बनवलेली आहे. त्याचा रंग, आकार सर्वकाही पाण्यासारखे. त्यांचे पंख हे तैलीय असतात ज्यामुळे यांच्या पंखांवर पाणी टिकून राहत नाही. त्यांची लहानशी शेपूट त्यांना सूर मारताना उपयोगी पडते. हे कुशल शिकारी असतात. हे दिवसा सक्रिय असणारे पक्षी आहेत . खंड्या नदी, तलाव येथील झाडांवर बसून पाण्यातील माशांचे निरीक्षण करीत असतात किंवा पाण्यावरच घिरट्या घालत राहतात. यांच्या तीक्ष्ण नजरेला पाण्यातील शिकार बरोबर दिसते. मासे बघताच पाण्यात अत्यंत गतीने सूर मारतात आणि ९९ टक्के शिकार घेऊनच बाहेर येतात. मग झाडांच्या डहाळीवर मासे आपटून आपटून मारतात आणि मगच गिळतात. हे माशांची शिकार करण्यात खूप पटाईत असतात. हवेत उडणारे कीटक जलद गतीने पकडतात. चाळीस मैल प्रति तास गतीने पाण्यात सूर लावतात. यांच्या शिकार करण्याच्या आणि जलद गतीने पाण्यात सूर लावण्याच्या पद्धतीमुळेच यांना जगातील बेस्ट डायव्हर किंगफिशर म्हणजेच सर्वोत्कृष्ट गोताखोर खंड्या म्हणतात. मी जेव्हा यांची कलाकृती बनविण्याचे ठरविले तेव्हा त्यांची वेगाने डुबकी मारण्याची आणि तेवढ्याच वेगाने बाहेर येण्याची क्रिया टिपण्याचा प्रयत्न केला.लाल पाठीचे किंगफिशर ऑस्ट्रेलियामध्ये वाळवंटात सुद्धा पाहायला मिळतात. सर्वात लहान प्रजाती इस्पिडिमा लंकोटी १५ ग्रॅम वजनी, ११ सें.मी. आणि सर्वात मोठी प्रजाती लाफिंग कुकाबुरा ४५० ग्रॅम ४६ सेंटीमीटरचा आहे. जंगलात बऱ्याचदा हसण्याचा आवाज येत असतो तो याच लाफिंग कुकाबुराचा असतो. ज्यामुळे जंगलात लोक यांना घाबरतात. हा पांढरा आणि तपकिरी रंगाचा असा असतो. डोळ्यांजवळ काळी रेषा असते, हसणाऱ्या नराच्या शेपटीचा टोकाचा रंग निळा असतो. असे ऐकले आहे की, सर्वात मोठा राक्षस किंगफिशर ४५ सेंटिमीटरचा असून त्याचे डोळे अतिशय भेदक आहेत. याचे डोके आणि चोच, पाय, पाठीचे पंख सारे काळे असते आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. पोटाचा भाग थोडा पांढरा केशरी असतो. मादीचा अर्ध्याच पोटाचा भाग केशरी दिसतो. खंड्याची वयोमर्यादा कमीत कमी ९ ते १० वर्षे असते. हे पक्षी दिवसभर खात असतात. आठ ते दहा मासे दिवसभरात खातातच आणि अति झाल्यास उलट्या करतात. स्वतःच्या वजनापेक्षा २४ पटीने जास्त खातात. हे पक्षी एकमेकांशी विशिष्ट आवाजात संवाद साधतात. खंड्या पाठीमागे पुढे आणि सर्व दिशेला उडू शकतो.

किंगफिशरमध्ये नर आणि मादी कायम एकत्रित राहतात. नर हा एकनिष्ठ असतो आणि कुटुंब वत्सल सुद्धा. वसंत ऋतू हा यांचा प्रजनन काळ. मादीसाठी नर चोचीत मासा घेऊन येतो. माशाचे डोके बाहेरच्या बाजूला ठेवतो आणि मादीला मासा खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो. जर मादीने नकार दिला तरच तो स्वतः खातो पण मादीला प्रेमालाप करून फुलवतो. यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे नदीवर एक मीटर ते तीन मीटरपर्यंत बिळ करतात किंवा वाळवी लागलेल्या झाडांचा उपयोग घरटी म्हणून करतात. यांच्या घरट्यात माशांचे काटे, कीटक आढळतात. यांची अंडी चमकदार पांढरी असतात. यांची पिल्ले मोठी होईपर्यंत त्यांच्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे नर आणि मादी दोघे मिळून पिल्लांचे संगोपन करतात आणि त्यांना मासे खाऊ घालतात. असं म्हणतात की, कमीत कमी १०० मासे सुद्धा ही पिल्ले खातात. पिल्ल मोठी झाल्यावर शिकारीसाठी पाण्यात सूर लावतात तेव्हा बऱ्याचदा ते स्वतः शिकार होतात. त्यामुळे दोन ते तीन पिल्ले जगतात.

खंड्या एकनिष्ठ, कुटुंबवत्सल, आकर्षक सुंदर पंखाचा, तेजस्वी, बुद्धिमान, तीक्ष्ण नजरेचा असा असणारा पक्षी असल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियामध्ये पवित्र मानतात. समुद्र देवतेचा आवडता पक्षी म्हणून आदिवासी ह्या पक्ष्याला देवता मानतात तर इंडोनेशियामध्ये अपशकुनी सुद्धा मानतात. खंड्या शांती, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे.

वायोमिंगमधील लोअर इओसिन खडक आणि जर्मनीतील मध्य इओसीन खडकांमध्ये किंगफिशरचे जीवाश्म सापडले आहेत, जे ३०-४० दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. यांना पर्यावरणीय परिवर्तन लगेच समजते. यांचा उपयोग जल गुणवत्ता ओळखण्यासाठी सुद्धा करतात. सध्या पक्षी संकटग्रस्त आणि नामशेष पक्ष्यांच्या यादीमध्ये गणला जातो. याची अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण वाढत्या लोकवस्तीमुळे झालेली जंगलतोड, नद्या व तलाव आटणे, प्राण्यांची शिकार, यांची पंखांसाठी असलेली शिकार, यांच्या पंखांचा उपयोग फॅशन आणि सजावटीमध्ये केला जातो, पारंपरिक चिनी औषधांमध्ये सुद्धा यांचा उपयोग होतो. मानवाने निर्माण केलेल्या संकटांमुळे निसर्गात अामूलाग्र बदल झाला. पर्यावरण संतुलन ढासळले साहजिकच आता नद्या, नाले, तलाव कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे यांना अन्न मिळेनासे झाले. अशा वेळेला हे पक्षी जगतील का? पक्षी हा नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी असलेला या जीवसृष्टीतील एक घटक आहे हे मानवाला विसरून चालणार नाही.

dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

53 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago