
आमदार नितेश राणे यांचा घणाघात
मुंबई : माजी शिवसैनिक, सामनाचे माजी संपादक आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अतिशय जवळचे जुने सहकारी संजय निरुपमच (Sanjay Nirupam) आता उबाठा आणि उद्धव ठाकरेंची लायकी काढत आहेत. शिवाय काँग्रसने (Congress) उबाठाला त्यांच्यात विलीन होण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे येत्या काळात उबाठाचे उमेदवार हाताच्या पंजावर निवडणूक लढवताना दिसतील, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.
नितेश राणे म्हणाले, मी मुंबईकर ही संकल्पना जेव्हा उद्धव ठाकरेंनी मांडली त्याचे मूळ सूत्रधार संजय निरुपम होते. म्हणजे मराठी माणसाच्या बरोबर मुंबईकर म्हणून उत्तर भारतीय, बिहारच्या लोकांनाही जोडायचं या संकल्पनेला उद्धव ठाकरेंसोबत संजय निरुपम आकार देत होते. आता ते संजय निरुपम जेव्हा उबाठाची लायकी काढतात की तुमच्याकडे २३ माणंसही नाहीत. कालही त्यांनी एका पत्रकार परिषदेत उबाठा महाराष्ट्रात एकही सीट जिंकू शकत नाही, असा दावा केला. म्हणजेच ते उद्धव ठाकरेंची क्षमता चांगली ओळखून आहेत, म्हणूनच असं बोलतात.
पुढे नितेश राणे म्हणाले, त्यांना सामनामधून काढण्यासाठी कारणीभूत कोण होता? तर हा संजय राजाराम राऊत. त्याने बाळासाहेबांचे कान भरले आणि काड्या लावण्याची त्याची जी जुनी सवय आहे, त्यामुळे संजय निरुपम यांना सामना सोडावा लागला. आणि आज तेच संजय निरुपम उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि उबाठाची लायकी काढतायत ते बघून निश्चितच समाधान होतंय. सत्या चित्रपटात एक डायलॉग आहे की, मौका सभी को मिलता है, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय निरुपम यांची वक्तव्यं आहेत.
उबाठाचे उमेदवार हाताच्या पंजावर निवडणूक लढवणार
पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, की उबाठाला काँग्रेस पक्षश्रेष्ठी पाचपेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत. शेवटी नाक रगडत रगडत त्यांना पाच जागांवरच होकार द्यावा लागेल. त्यांची काल जी दिल्लीमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये जो प्रस्ताव काँग्रेसकडून मातोश्रीकडे आलेला आहे, त्याबद्दल खरं तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी खुलासा करायला हवा. किंवा संजय राऊतने बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावं की उबाठाला काँग्रेसमध्ये विलीन करुन टाका असा प्रस्ताव दिल्लीवरुन मातोश्रीवर आला आहे की नाही? याचं स्पष्टीकरण द्यावं. म्हणजे पाच तर सोडाच उद्धव ठाकरेचे जे काही उमेदवार आहेत, ते हाताच्या पंजावरच निवडणूक लढवणार आहेत, अशी शक्यता निर्माण झाली आहे, असं नितेश राणे म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत संजय राऊत दुतोंडी
तुम्हाला काँग्रेस काही पाचच्या वर जागा देणार नाही. तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत कितीही प्रेम दाखवा पण हयातमध्ये झालेल्या इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा जेव्हा विषय आला तेव्हा याच संजय राऊतने तेव्हा उठून सांगितलं की हा विषय इतका महत्त्वाचा नाही, त्याबद्दल आपण नंतर चर्चा करु. हे मला तिथेच उपस्थित असलेल्या एका काँग्रेस नेत्याने सांगितलं आहे. एका बाजूला प्रकाश आंबेडकरांचे गोडवे गायचे आणि दुसर्या बाजूला त्यांची इज्जत काढायची हे घाणेरडं धोरण संजय राऊतचं आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेचं नावच मिटून जाईल
तेव्हा संजय निरुपम यांना सामनातून बाहेर काढण्यासाठी तू काड्या लावल्यास पण आज त्यांनी तुमचीच लायकी काढण्यासाठी तोंड उघडलं. म्हणून भाजप, एनडीए किंवा राम मंदिराचा कार्यक्रम हा भाजपचा इव्हेंट आहे असं बोंबलणार्या संजय राऊत आणि त्याच्या मालकाला रामदेवता असा मोठा शाप देणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेचं नावच मिटून जाईल, अशी परिस्थिती २०२४ ला दिसेल, असं नितेश राणे म्हणाले.
पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणार्यांनी...
मी पुन्हा येईन म्हणत अडीच वर्षांनी आले तर अर्धेच आले, असं वक्तव्य अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केलं. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी अमोल कोल्हे यांना चांगलेच खडसावले. ते म्हणाले, पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणार्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांबाबत बोलू नये. तू आधी शिरुर मतदारसंघात पुन्हा २०२४ला खासदार म्हणून निवडून येणार आहेस का, याची चिंता कर. ज्या अजित पवारांमुळे तुझ्या नावापुढे खासदार लागलंय त्यांना उलट बोलशील तर तितक्या लवकर तुझ्या नावापुढे माजी खासदार लागेल, त्यामुळे जागा हो, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.